घालू सडा अंगणी चल ताई
सकाळ आली बाई
त्यावर काढू चल रांगोळी
ठिपके देऊ आळीपाळी
घेईन गरगर गिरक्या ताई
मी तर भवरी बाई
पूजिन तुलसीवृंदावन मी
मागीन वर लवलाही
गीत | - | बाबुराव गोखले |
संगीत | - | दादा चांदेकर |
स्वर | - | लता मंगेशकर, स्नेहप्रभा प्रधान |
चित्रपट | - | पहिली मंगळागौर |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
लवलाही | - | लवकर. |
पण दैवाच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. त्या रेषा वाचायला आता बाबा नव्हते. कुणी सांगावं, बाबांनी हे सारं आधीच जाणलं असेल आणि भविष्यकारांच्या अलिखित संकेतांनुसार प्रकट बोलून दाखवलं नसेल. सिनेमासृष्टीनं त्यांना स्वतःला दिलेल्या कटू अनुभवांमुळे ते आम्हां मुलांना या वाटेवर जायला मनाई करत राहिले. त्यांचं भांडण चित्रपटकलेशी नव्हतं, त्यातल्या अव्यवहाराशी होतं. ते म्हणत 'गाणं ऐकायचं असेल, तर चांगल्या शास्त्रीय गवयाचं ऐका. चित्रपटातलंच गाणं ऐकायचं असेल, तर मात्र फक्त कुंदनलाल सैगलांचं ऐका. पण तुम्ही चित्रपटांत गायलेलं मला चालणार नाही.'
विनायकरावांनी बाबांच्या निधनानंतरची आमची सारी परिस्थिती जाणली. पुण्यात त्यांच्या नवीन सिनेमाची मांडामांड चालू होती. त्या काळी चित्रपटात काम करणं म्हणजे सिनेमा कंपनीचा पगारी नोकर होणं अशीच पद्धत होती. विनायकरावांनी दीदीला काम द्यायचं आश्वासन दिलं. नुसतं बोलून थांबले नाहीत, तर त्या चित्रपटात एक छोटी भूमिका आणि गाणंही दिलं.
बाबा गेले त्याच वर्षी दीदीनं काम केलेला आणि गाणं गायलेला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला 'पहिली मंगळागौर'. चित्रपटाचे संगीतकार होते दादा चांदेकर. गाणं होतं 'नटली चैत्राची नवलाई'.
कुणी म्हणेल; ही जणू एका सुवर्णयुगाची नांदीच होती. कोवळी चैत्रपालवी फुलून आली होती. चित्रपटसृष्टीला नवीन स्वरस्वप्न पडत होतं. चंद्रबिंब अजून पूर्ण विकसित व्हायचं होतं, चांदण्याचा पहिला किरण पडला होता, वगैरे वगैरे वगैरे. तिच्या त्या पहिल्या गाण्याची अशी काव्यपूर्ण वर्णनं कितीही करता येतील; पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.
दीदीचा चित्रपटप्रवेश झाला ते कंपनीची पगारी नोकर म्हणून. तिला चित्रपटात पहिलं गाणं गायला मिळालं म्हणण्यापेक्षा तिला चित्रपटात गाणं गायला लागलं, असं म्हणणं जास्त बरोबर. नाइलाजच होता तो. ते बाबांच्या इच्छेविरुद्ध होतं. शिवाय मास्टर दीनानाथरावांच्या मुलीनं, लता मंगेशकरनं दुसर्याच्या कंपनीत नोकरी करणं हे चित्रपटात गाणं मिळण्याच्या आनंदापेक्षा अधिक क्लेशदायक असणार. आज वाटतं की; अपरिमित वैभव पाहिलेल्या, अनेकांची आयुष्यं उभी केलेल्या मालकांची मुलगी म्हणून मिरवलेल्या दीदीला हे तथाकथित क्षणिक यश टोचलं असेल. महिन्याचा पगार हाती घेताना बाबांची आठवण येत असेल. भावंडांचे चेहरे दिसत असतील. तिला नेमका किती पगार होता हे विचारण्याचं धाडस आम्ही आजवर केलेलं नाही.
आपण अनाथ झालो आहोत अशी प्रखर जाणीव आम्हा पाच जणांमध्ये प्रथम दीदीला झाली.
विनायकरावांच्याकडची नोकरी ही दीदीची पहिली आणि अखेरची नोकरी. मोठी झेप घेण्याआधी काही पावलं मागे यावं लागतं हा नियम ती पाळत होती. काहीही असो, पण संधीचं एक दार उघडलं गेलं होतं एवढं मात्र खरं.
(संपादित)
मीना मंगेशकर-खडीकर
'मोठी तिची सावली' या पुस्तकातून.
शब्दांकन- प्रवीण जोशी
सौजन्य- परचुरे प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.