A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निळें हें व्योम

निळें हें व्योम निळें हें सप्रेम । निळेपणें सम आकारलें ॥१॥

नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म । नीळवर्ण आश्रम गुरु देखे ॥२॥

निळेपणें वर्तो नीळेपणें खातों । निळपण पाहातो निळे पणें ॥३॥

निळिये रजनी वाहे मोतिया सारणी । निळेपणें खाणीं सांपडली ॥४॥

मन तो निळिये गोविंदाचिये सोसे । विरहिणी पाहे वाटुलि ऐसी ॥५॥

ज्ञानदेव आला नीळवर्ण शाळा । निळेपण गोंवळा रातलीये ॥६॥
गोंवळा - गोपाळ, गुराखी.
रातणें - रत होणे.
व्योम - आकाश.
ज्ञानदेवांच्या दोन स्वतंत्र रचना एकत्र करून हे पद तयार झाले आहे. त्या रचना अशा आहेत-

(१)
निळें हें व्योम निळें हें सप्रेम । निळेपणें सम आकारलें ॥१॥
नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म । नीळवर्ण आश्रम गुरु देखे ॥२॥
निळेपणें वर्तो नीळेपणें खातों । निळपण पाहातो निळे पणें ॥३॥
ज्ञानदेव आला नीळवर्ण शाळा । निळे पण गोंवळा रातलीये ॥४॥

(२)
निळिये रजनी वाहे मोतिया सारणी । निळेपणें खाणीं सांपडली ॥१॥
आंगणीं चिंतामणि जळधरु सिंपणी । अमृतसाजणी जीवनकळा ॥२॥
सुमनाचे शेजे विरहिणी विराजे । शयनीं सुलजे आरळ सेज ॥३॥
माजयानें हटीं मुखकमळ टेंकी । निळिये अवलोकी कृष्णमूर्ति ॥४॥
कमळणी आमोद सुस्वाद मकरंद । चंदनाची अभेद उटी अंगी ॥५॥
कर्पूरपरिमळें दिव्य खाद्य फ़ळें । ठेऊनि सोज्वळें वाट पाहे ॥६॥
मन तो निळिये गोविंदाचिये सोसे । विरहिणी पाहे वाटुलि ऐसी ॥७॥
ज्ञानदेवी निळिये वाटुले गोविंदीं । कृष्ण निळिये पदीं ठाव जाला ॥८॥


भावार्थ-

ध्यानावास्थेत योग-मायेने वेढलेल्या ईश्वराचा कृष्णवर्ण साक्षात्कार होत असतो. तसा आकाश-प्रतीक-द्वारा त्याच्या व्यापकतेवर धारणा-ध्यानादि करीत असतांना त्याचा नीलवर्ण-साक्षात्कार होत असतो. तो अनुभव वर्णित असता ज्ञानदेव म्हणतात-
ईश्वर-स्वरूप निळेंच निळें सगळीकडे दिसत आहे. आकाशाप्रमाणे व्यापक, पण आकाश पोकळ असते तसे पोकळ नव्हे, प्रेमळ ! पण प्रेमात पक्षपाताची कल्पना येऊ पाहाते, तसेही नव्हे, समत्वयुक्त ! अशा या प्रातिभ दर्शनात सर्व साधना निळ्या रंगाने रंगलेली. सारे व्यवहारातही त्याच रंगात. ज्ञानदेव जणू नीलवर्णाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. गोपी श्रीकृष्णाच्या ध्यासाने स्वत: तशीच बनून त्याच्याशी समरस होते- तीच ही स्थिती !
(संपादित)

आचार्य विनोबा भावे
ज्ञानेश्वरांची भजनें
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा

  इतर भावार्थ