आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या ग जाईजुई
मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले मायलेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता गाऊ कशी मी अंगाई
गीत | - | मधुसूदन कालेलकर |
संगीत | - | एन्. दत्ता |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | बाळा गाऊ कशी अंगाई |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
गाणं लोकप्रिय होण्याचे निकषही कोणालाही छातीठोकपणे सांगता येतील असं नाही. 'मीलन' चित्रपटातलं 'सावनका महीना..' गाणं अमाप गाजलं पण त्याच चित्रपटातलं 'आज दिलपे कोई जोर चलता नही..' हे लताजींनी गायलेलं सुंदर गीत दुर्लक्षित राहिलं. 'हा माझा मार्ग एकला' हे शीर्षकगीत सगळ्यांना माहित आहे पण त्याच चित्रपटातलं 'संपली कहाणी माझी' हे अप्रतिम गाणं मागेच राहिलं. यशापयशाची कारणे विविध असतील पण 'नशीबानं खावं' म्हणतात हेच खरं; 'जो जीता वोही सिकंदर !' Nothing succeeds like success !
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई' या यशस्वी, लोकप्रिय गाण्याची हकीकतही त्याच्या नशीबाशीही जोडली आहे.
'निंबोणीच्या झाडामागे..' ची जी सुरावट आपल्या सगळ्यांच्या कानात आहे ते गीत 'बाळा गाऊ कशी अंगाई' या चित्रपटातलं जरी असलं तरी, मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं हे गीत प्रथम आलं ते त्याही आधीच्या काही वर्षांपूर्वीच्या 'शुभमंगल' या चित्रपटात. ते त्यावेळेला संगीतकार वसंत पवारांनी संगीतबध्द केलं होतं आणि गायिका उषा अत्रे यांनी गायलं होतं. दुर्दैवानी 'शुभमंगल' साफ कोसळला आणि 'निंबोणीच्या झाडामागे..' अर्थातच कुणाच्या लक्षातही राहिलं नाही. 'बाळा गाऊ कशी अंगाई' च्या वेळेला मधुसूदन कालेलकरांनी हेच गाणं निर्माते कमलाकर तोरणे यांना दाखवलं आणि त्यांना ते पसंत पडलं. चित्रपटाच्या कथेत ते बेमालूम बसणारं ठरलं. चित्रपट पाहिलेला असणार्यांना अशी जराही शंका येणार नाही की हे आयात केलेलं गीत आहे.
यशोगाथा इथे संपत नाही. त्या वर्षीच्या शासनाच्या चित्रपट महोत्सवातला सर्वोत्कृष्ठ गीतकाराचा पुरस्कार मधुसूदन कालेलकारांना, 'बाळा गाऊ कशी अंगाई' चे गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याबरोबर विभागून मिळाला. संगीतकार एन. दत्ता. म्हणजे दत्ता नाईक यांना संगीताचा पुरस्कार मिळाला. नशीब तर खरंच पण गुणवत्तेच्या निकषावरही अतिशय दर्जेदार असंच हे गाणं आहे. या गीताला सुमन कल्याणपूरांचा परीपक्व, भावपूर्ण आवाज लाभला आहे. व्हायोलीनच्या गोड सुरावटीने सुरु होणार्या या गीतात, तारसनई या अभावाने ऐकू येणार्या वाद्याचा अतिशय सुंदर वापर संगीत संयोजकाने आणि त्या कुशल वादकाने केला आहे. यात वाजलेली गायकी अंगाची सतार आपल्याला संगीतकार मदन मोहन यांच्या 'रस्म-ए-उल्फतको' आणि 'हम है मता-अ कुचाओ..' मधल्या रईस खान साहेबांच्या सतारीची आठवण करून देते. गाण्यातल्या नजाकतीने वाजलेल्या तबल्याच्या जोडीने वाजलेला कोंगो गाण्याच्या ताल सौंदर्यात भर घालतो. 'धडकने लगी दिलके तारोन्की दुनिया'–'धूलका फूल', 'मै तुम्हीसे पूछती हुं'–'Black Cat' अशी अजरामर गाणी देणार्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अधिक काम केलेल्या संगीतकार एन. दत्ता. यांचं मराठीतही, या आणि काही अन्य गीतांच्या रुपाने महत्त्वाचं योगदान आहे.
संगीतकार राम कदम यांचं 'छन्नी हातोड्याचा घाव' किंवा सुधीर फडक्यांचं 'जगाच्या पाठीवर' अशी आत्मचरित्रे वाचल्यावर त्यांच्या कलाकृती अधिकच महान वाटायला लागतात. या गाण्याचा हा किस्सा कळल्यावर असंच वाटलं. एक गाणं जे आधी झालं आहे, तेच पुन्हा वेगळ्या कलाकारांनी आपल्या हातात घेऊन यशस्वी करून दाखवणं हे विशेषच आहे. वात्सल्यपूर्ण, लडिवाळ शब्द आणि गोड सुरावटी यांमुळे आत्तापर्यंतची 'धीरेसे आजा..' पासून 'मी गाताना गीत तुला लडीवाळा'पर्यंत बरीचशी अंगाईगीते आपल्या ओठांवर आहेतच. 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही?' या गाण्याची ही गोष्ट ऐकल्यावर हे गीत त्याच्या सांगितिक गोडव्याबरोबरच संगीताव्यतिरिक्त असलेल्या वेगळेपणामुळे अधिकच लक्षात राहील.
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.