A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निसर्गासारखा नाही रे

निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणांत आपोआप

त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य

त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली
गीत - सुधीर मोघे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- रवींद्र साठे
गीत प्रकार - भावगीत
संकीर्तन - स्तुती.
संदेह - शंका.
'एक दिवस असा येतो की सारा मोहरा फिरून जातो' असं एक कविवचन आहे. तो दिवस तसा होता.. एका अनाकलनीय आणि अनामिक बेचैनीनं सगळं अस्तित्व ढवळून निघालं होतं.. ती कुठल्याही लौकिक, व्यावहारिक किंवा भावनिक कारणातून जन्मलेली बेचैनी निश्चित नव्हती.. ती फक्त होती आणि होती; एवढंच सत्य होतं. संगीत, पुस्तकं ही एरवीची जादूची साधनं तेव्हां निष्प्रभ झाली होती.. गंमत म्हणजे अगदी जवळच्या, जिव्हाळ्याच्या व्यक्तींनादेखील तिचा सुगावा नव्हता. 'मोजलेली चाल आहे, मापलेला पंथ आहे' हे सुरक्षित वर्तमान वरच्या थरावर बिनधास्त वाहत होतं आणि आत मात्र उलथापालथ.. सगळा दिवस तसाच गेला.. रात्रही तशीच चालली होती.. उशीवर डोकं टेकलं की डायरेक्ट टेक-ऑफ ही रोजची स्वय आपली चाल जणू विसरून गेली होती.. रात्र, मध्यरात्र, उत्तररात्र..

.. 'काळोखाच्या काळजाला व्हावा उजेडाचा दंश' अशी ती साक्षात्कारी वेळ होती.. कवी हलकेच उठला.. कुणालाही चाहूल न देता हलकेच दार उघडून बाहेर पडला आणि निरुद्देश चालत राहिला.. एक आडबाजूचं छोटेखानी मैदान, मध्ये छोटं देऊळ, भोवती मोजकी तरूराजी.. तिथल्या एका बाकड्यावर निवांत बैठक मारली आणि नकळे काय जादू झाली.. जणू त्या नीरव आसमंतातून एक अबोल अव्यक्त शांतता चहूदिशांनी त्याच्या अस्तित्वात झिरपू लागली. पाहतापाहता त्या शांततेने त्याचं सगळं अस्तित्व काठोकाठ भरून गेलं.. त्याच्या अंतरंगातून कवितांची लड अचानक उलगडू लागली.

निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू, सखा, बंधू, मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणांत आपोआप

त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य

त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायांखाली

निळे नि सावळे मोकळे आभाळ
भिजते रंगांत सांजवेळी
सुदूर रुळते डोंगराची माळ
मधेच गुलाल सांडलेली

जवळ नि दूर उभे तरुवर
सय पावसाची साठवूनी
श्वास ओलसर वार्‍याचा मंदसा
मातीस सुगंधी आठवणी

दिठीची लेऊन नाजुक चौकट
चित्रमय जग उभे आहे
अशब्द नि:शब्द विश्वरूप मौन
भासते सचित्र बोलू पाहे

पाऊस चौफेर आंत नि बाहेर
पावसाचा उर दुभंगला
पाऊस कणांत पाऊस क्षणात
पाऊस मनांत ओसंडला

अंधार दाटतो पाऊस वाजतो
पाऊस भिजतो काळोखात
पावसाची सुप्त परतीची वाट
झाली पुरी लुप्त पावसांत

पाऊस कोसळे चौखूर उधळे
घरटे आपुले शोधताहे
त्रिखंडात आज पावसाची गाज
पावसाचा षड्‌ज नादताहे

थांब ना जराशी ऐक ती चाहूल
वाजते पाऊल कुठेतरी
जरासा कान दे जरासे भान घे
तरंगे झुळूक वेणूपरी

यमुनेचे जळ आतुर वेल्हाळ
वेढते ओढाळ पाऊलांसी
भिजले वसन अंगा बिलगून
वेध घे कोण ये कोणापाशी

येईल सावळी लाट अनावर
सर्वांग क्षणात भिजवेल
होशील केशरी पहाट साक्षात..
साक्षात तुझ्यात उजाडेल

तनमनानं पिसासारखा हलका झालेला कवी 'पुन्हा मूळवाट पायाखाली' म्हणत-गुणगुणत पूर्वायुष्य लपेटून पुढे चालू लागला. अनेक कविता आणि गीतांचे पक्षी वेळोवेळी त्याच्या खांद्यावर, मनगटावर पुन्हा पुर्वीप्रमाणेच उतरू लागले.. सिलसिला पुढे चालू झाला.
(संपादित)

सुधीर मोघे
सौजन्य- दै. लोकसत्ता (२२ डिसेंबर, २०१३)
(Referenced page was accessed on 1 Feb 2017)

  इतर संदर्भ लेख