A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पालखी हाले डुले

भास एक स्वप्‍नातला, रंग हळदीचा ओला

नवरी मी सजुन अशी, निघाले कोण्या देशी?
घेउनी मला कुठे पालखी चाले कशी !

चांद उतरला खाली, रात पहाटेला आली
वारा वाहे झुळूझुळू, पालखी चाले हळू !
वरखाली वाट वळे, गोंडा रेशमी झुले
दूर का गाती पर्‍या? सूर ते कानी आले
पालखी हाले डोले !

हळूहळू सांज झाली, पालखी उतरे खाली
भुलूनी गेले डोळे भिरभिर भवताली !

थोर नगरीत वसे, सात तालांचा असे
वाडा सामोरा उभा कुण्या राजाचा दिसे !
खांब केळीचे उभे, वरती तोरण शोभे
दारी चौघडा गाजे, सूर सनईचा वाजे !

तनूलागी कंप सुटे ! बाई मी आले कुठे?
डवरला घाम भाळी, लवले डोळे खाली !
अवचित कोणी आला, वरमाला घाळी गळा
हात कधी हाती दिला, नाही कळले मला

हनुला धरून माझ्या काहीसे बोले राजा
वाटे मजला भीती, ऊर धडधडे किती
नजरेसी मिळे नजर, नकळत ढळे पदर
घडली जादू अशी, झाले ग वेडीपिशी !

ऊठ पोरी ऊठ आता,
(काय सारे स्वप्‍न होते?)
जायचे नं शेतावरी
जागवीत बाबा होते,
स्वप्‍न सरलेले होते !

चला बिगीबिगी चला,
शेत नांगराया चला
डोईवर दिसं आला !

हळूहळू बाबासंगे चालायचे, चालायचे
ऋतू येती, ऋतू जाती, शेतावरी राबायाचे !
सोनियाचे स्वप्‍न माझे, सोनेरी या धानासंगे
रंगायाचे, उरायाचे, सरायाचे, विरायाचे
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - मानस मुखर्जी
स्वर- उषा मंगेशकर
गीत प्रकार - भावगीत
ताल - घराचा मजला / ताडाचा वृक्ष.
धाना - साळ (भात)

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.