A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पप्पा सांगा कुणाचे

ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला

पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्याइवल्या घरट्यात, चिमणाचिमणी राहतात
चिमणाचिमणी अन्‌ भवती चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर-भिंती-दारे !
'घरकुल' चित्रपटासाठी गाणी मी लिहीत होते. संगीत दिग्‍दर्शक होते सी. रामचंद्र. एवढ्या नामवंत संगीत दिग्‍दर्शकाबरोबर गाणी करायची, या कल्पनेचे विलक्षण दडपण माझ्या मनावर आले होते. पण सी. रामचंद्र यांनी सहजपणे व कसलीही धास्ती मला वाटू न देता माझ्याकडून गाणी करवून घेतली. त्यांतले एक गाणे कॉलेजच्या मुलामुलींचे पिकनिकच्या वेळचे होते, तर दुसरे कौटुंबिक स्वरूपाचे होते. सी. रामचंद्रांनी मला एक कॅसेट दिली. तिच्यावर एकीकडे 'हाऊस ऑफ बॅम्बू' आणि दुसर्‍या बाजूला 'पप्पा ही लव्हज्‌ मम्मा' ही दोन इंग्रजी गाणी होती.

सी. रामचंद्र म्हणाले, "ही कॅसेट घरी घेऊन जा. दोन्ही गाणी ऐका आणि त्यावरून सुचतील तशी गाणी लिहा. अगदी मूळ इंग्रजी धृपद वापरले तरी चालेल."
मला ते सगळेच काम फार अवघड वाटले. धृपद मूळ इंग्रजीतले ठेवून पुढचे गाणे मराठी लिहिले तर तो प्रकार धेडगुजरी वाटणार नाही का? गाणे हास्यास्पद तर होणार नाही? असे अनेक प्रश्‍न माझ्यापुढे उभे राहिले.
पण सी. रामचंद्र म्हणाले, "गाणी चांगली होतील. तुम्ही तुमच्या मनात येईल तसा मूळ गाण्यांचा वापर करा. पुढे त्यांना कसे संगीत द्यायचे ते मी पाहीन. त्याची सर्व जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवा."

त्यांनी दिलेली कॅसेट मी चार-पाच वेळा ऐकली आणि 'पप्पा ही लव्हज्‌ मम्मा' या गाण्याचा मुखडा एकदम सुचला. 'पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे'. सी. रामचंद्रांना फोनवरून ती ओळ मी ऐकवली. ते म्हणाले, "छान ! आता लिहा पुढचं गाणं." - आणि मी ते लिहिले.

'हाउस ऑफ बॅम्बू' गाण्याबाबत मी जरा वेगळी युक्ती करून पाहिली. 'नंबर फिफ्टिफोर, हाऊस वुइथ द बॅम्बू डोअर' हे मूळचे इंग्रजी धृपद जसेच्या तसे कायम ठेवून पुढचे गाणे मी पूर्ण मराठीत लिहिले. सी. रामचंद्र यांनी त्या गाण्यांना आकर्षक चाली दिल्या आणि नंतर ती खूप लोकप्रियही झाली.
(संपादित)

शान्‍ता शेळके
'चित्रगीते' या गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- उत्‍कर्ष प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

  अरुण सरनाईक, राणी वर्मा, प्रमिला दातार