भाव दाटले मनी अनामिक, साद तयांना देशिल का?
या डोळ्यांचे गूढ इशारे
शब्दांवाचुन जाणुन सारे
'राणी अपुली' मला म्हणोनी तुझियासंगे नेशिल का?
मूर्त मनोरम मनी रेखिली
दिवसा रात्री नित्य देखिली
त्या रूपाची साक्ष जिवाला प्रत्यक्षातुन देशिल का?
लाजुन डोळे लवविन खाली
नवख्या गाली येईल लाली
फुलापरी ही तनू कापरी हृदयापाशी घेशील का?
लाजबावरी मिटुन पापणी
साठवीन ते चित्र लोचनी
नवरंगी त्या चित्रामधले स्वप्नच माझे होशील का?
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | अनिल मोहिले |
स्वर | - | कृष्णा कल्ले |
गीत प्रकार | - | भावगीत, कल्पनेचा कुंचला |
मी सहज म्हंटलं, "म्हणजे परीकथा, स्वप्ननगरी, राजकुमार असं काहीतरी लिहावं लागेल मला."
"हां हां. असंच काहीतरी पाहिजे."
मी त्यावेळी अद्भुतरम्य वातावरणात वावरत होते. मुलांसाठी लिहिलेल्या माझ्या एका कल्पनारम्य नाटकाची निर्मिती चालली होती. त्याच तंद्रीत मी विचारलं,
"परीकथेतिल राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल का?
भाव दाटले मनी अनामिक, साद तयांना देशिल का?
अशा ओळी कशा वाटतात?"
"वा वा ! फारच छान ! हाच मुखडा ठेवू आपण. पुढं लिहा." अनिलजी म्हणाले.
मी पुढची कडवी लिहून काढली. अनिलजींनी गाणं उतरवून घेतलं नि ते गुणगुणतच घरी निघाले. जाता जाता बसमध्ये त्यांना चाल सुचली सुद्धा ! गाण्यासरखीच तरल, हळुवार, स्वप्नरम्य ! सुप्रसिद्ध गायिका कृष्णा कल्ले यांनी अत्यंत रसीलेपणानं गायलं. त्यांचा लाडिक आवाज आणि अनिलजींची रसीली स्वररचना यांचा सुंदर संगम या गाण्यात झाला आहे.
आम्हा तिघांची आणखीही काही गाणी यशस्वी झाली पण 'राजकुमारा'चा क्रमांक पहिलाच राहिला.
(संपादित)
वंदना विटणकर
'हे गीत जीवनाचे' या गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.