A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पाऊस असा रुणझुणता

पाऊस असा रुणझुणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली

ओलेत्याने दरवळले
अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध
नि:स्तब्ध मनाची वेस

पाऊस सोहळा झाला
कोसळत्या आठवणींचा
कधी उधाणता अन्‌ केव्हा
थेंबांच्या संथ लयीचा !

नभ 'नको नको' म्हणताना
पाऊस कशाने आला?
गात्रांतुन स्वच्छंदी अन्‌
अंतरात घुसमटलेला
गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- सलील कुलकर्णी
अल्बम - सांग सख्या रे
गीत प्रकार - कविता, ऋतू बरवा
गात्र - शरीराचा अवयव.
पाऊस किती दिवसांत फिरकला नाही
पाऊस कुणाला कधीच कळला नाही
पाऊस ऋतूचे निमित्त होऊन दिसतो
पाऊस पापणीआड कधीचा असतो..

सुधीर मोघेंच्या कवितेतला हा पाऊस सगळ्यांच्याच मनातला आणि पापणीआड सदैव लपलेला.

पाऊस हा निसर्गाचा सर्वात सर्जनशील अवतार, जणू सृष्टीच्या कर्त्याला सुचलेली कविताच. आणि पाऊस हे निसर्गातील सर्वांत उत्कट संगीत. तेव्हा 'कवितेचं गाणं होताना' मधला, कविताही पाऊस आणि गाणंसुद्धा पाऊसच !

लहानपणी, चिखलात चालताना साचलेल्या पाण्यातून मुद्दाम उड्या मारत-मारत, छोटे-छोटे रेनकोट घातलेल्या बच्चेकंपनीसारखा निरागस पाऊस भेटतो. तशीच पावसाची निरागस बालगीतं आणि बालकविता आपल्याला भेटतात-
वारा वारा गरा गरा सो सो सुम्म
ढोल्या ढोल्या ढगांत ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोर्‍यामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर चम चम छडी

कागदाच्या होड्या, बेडूकराव एवढेच विचार मनात असताना पाऊससुद्धा गोजिरवाणा, हसरा दिसतो आणि अचानक एका वळणावर,
अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे
अशी संदीपच्या 'सरीवर सर'मधली ओळ पुन्हा पुन्हा गावीशी वाटते आणि मग-
पाऊस असा रुणझुणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली

ह्या वळणावर एक नवीन पाऊस भेटतो. आभाळाने धरतीला मिठीत घ्यावं तसा पाऊस. पावसाची गाणी करताना मल्हारच्या वेगवेगळ्या प्रकारात चाल बांधणं हा फारच स्वाभाविक विचार आहे. 'पाऊस असा रुणझुणता' ह्या संदीपच्या कवितेचं गाणं झालं तेव्हा लहानपणापासून असलेल्या 'पाऊस' ह्या प्रकाराशी नातं असलेल्या मल्हारच्या प्रकारात चाल सुचली. पण जरी पाऊस असला, मल्हार असला तरी ती स्वतंत्र रचना वाटायला हवी, रागातली बंदिश नाही !

या ठिकाणी रागनियम पाळणं हा अंतिम उद्देश नाही, तर त्या कवितेचं गाणं करणं हा विचार असेल तर त्याची बंदिश होणार नाही. मल्हार आणि त्याचे प्रकार ह्यातून दिसणारी व्याकूळता, त्या स्वरांचा उत्कट अनुभव, ह्याचा वापर ज्यात पाऊस नाही अशा रचना संगीतबद्ध करताना वापरलेल्या अनेक ठिकाणी आढळतो आणि अनेकदा पावसाची कविता असूनही त्यात मल्हार शिवाय वेगवेगळ्या सुरावटी समर्थपणे वापरलेल्या दिसतात. सलिलदांचं 'ओ सजना बरखा बहार आयी' असेल अथवा हृदयनाथजींचं 'नभ उतरू आलं' असेल, ह्या स्वररचनांनी पाऊस अतिशय प्रभावीपणे पोचवला.

निसर्ग आणि प्रेम ह्याचा उत्कट आविष्कार म्हणजे बा. भ. बोरकरांच्या कविता.
सरीवर सरी आल्या गं
सचैल गोपी न्हाल्या गं

ही कविता २००३ साली ध्वनिमुद्रित केली, तेव्हाही त्या सरींचं कोसळणं गाण्यातून व्यक्त करणं जास्त महत्त्वाचं वाटलं, ह्यातही पाऊस हा विषय असूनही, मल्हारचा वापर करावासा वाटला नाही.
बोरकरांचीच-
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले

ही कदाचित मराठी साहित्यामधल्या सर्वोत्तम कवितांमधली एक. 'अनिलगण' हा शब्द इतका सुंदर पद्धतीने वापरला गेलाय ह्यात.

पाऊस कविता म्हणून भेटतो, सुरांमधून भेटतो, तसा व्यक्ती किंवा एखाद्या घटनेमागे उभं असलेलं वातावरण म्हणूनसुद्धा भेटतो.
पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दुःखाच्या मंद स्वराने

ह्या ग्रेसच्या कवितेमधला पाऊस, यशवंत देवसरांनी अचूक पकडला आहे.

'तूर्तास' या दासू वैद्य यांच्या काव्यसंग्रहात एक आगळावेगळा पाऊस सापडतो.

कवितेमधून मला भेटलेलं पावसाचं भयावह चित्र मी १९९९ मध्ये स्वरबद्ध केलं होतं, कोसळणार्‍या पावसाला जर परतीची वाटच सापडली नाही तर? पाऊस एखाद्या जंगलात चकवा लागावा तसा अडकून पडला तर?
अंधार दाटतो, पाऊस वाजतो, पाऊस भिजतो काळोखात
पावसाची सुप्त परतीची वाट, झाली पुरी लुप्त पावसांत

(संपादित)

सलील कुलकर्णी
सदर- कवितेचं गाणं होताना
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाईम्स (२३ जुलै, २०१७)
(Referenced page was accessed on 08 August 2025)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.