A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पूर्तता माझ्या व्यथेची

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी !
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.

वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही..
गांजणार्‍या वासनांची बंधने सारी तुटावी.

संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा..
कापलेले पंख माझे.. लोचने आता मिटावी.

सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला,
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी.

काय सांगावे तुला मी? काय मी बोलू तुझ्याशी?
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी !
गांजणे - छळणे, जाचणे.
सुरेश भट यांची गझल म्हणजे मराठी कवितेच्या क्षेत्रात घडलेली एक अद्भुत घटनाच म्हणायला हवी. गझल या काव्यप्रकाराचा मुळापर्यंत ते शोध घेत गेले. गझल लिहायची म्हणजे कवितेतून नेमके काय निर्माण करायला हवे, नेमके काय साधायला हवे याचे त्यांना अचूक उत्तर मिळाले. गझलच्या सर्व नियमांचे पालन करूनच त्यांनी गझल लिहिली; पण कधीही ती चौकटबंद झाली नाही. आपले विमुक्त संचारीपण तिने कधी सोडले नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांचे व्यक्तित्व. प्रभावी व्यक्तित्वाखेरीज प्रभावी गझल निर्माण होऊच शकत नाही. अनेक आशाआकांक्षांनी भरलेली मनातील स्वप्‍ने आणि विदारक स्वप्‍नभंग यांचा अनुभव घेतलेली, आत्यंतिक कृतार्थता-धन्यता आणि आत्यंतिक नैराश्य या दोन्ही टोकांना जाऊ शकणारी, अतिशय उत्कट काहीशी बेफिकीर आणि कलंदर, आपल्याच मस्तीत आणि धुंदीत जगणारी हळुवार आणि दयार्द्र, अशी व्यक्तीच उत्तम गझलकार होऊ शकते. तिच्याच गझलरचनेत आवेशयुक्त आणि आक्रमक असा अभिनिवेश येऊ शकतो. यशस्वी गझल लिहिणारी सर्व आयुधे सुरेश भटांपाशी, म्हणजे त्यांच्या व्यक्तित्वात आहेत. मस्ती, बेफिकिरी, फकिरी वृत्ती, बेदरकारपणा, प्रवाहित्व, जीवनप्रवाहासह वाहत जाणे आणि वाहवणे, प्रांजलपणा, मोकळेपणा, बंडखोरी, उपरोधिकता, स्वत:च्या चुकांचे परिणाम भोगण्याची सिद्धता, प्रेमात झोकून देणे आणि प्रेमभंग पचवणे, आयुष्य वार्‍यावर उधळून देणे, मीरेसारखे विषप्याला पिण्यातच 'मगन' होणे, असे किती गुण सांगावे ! कदाचित जगाच्या दृष्टीने हे अवगुण ठरतील. कारण समाजाच्या हिशोबी व्यवहारात यातले काहीही बसत नाही. पण सुरेश भट या व्यक्तीचे हेच गुण आहेत. (त्यामुळेच त्यांची गझल पौरुषयुक्त झाली आहे !) नेहमीच टोकाला जाण्याची वृत्ती, परिणामांची खंत न बाळगता ईर्षेने, बेगुमानपणे अफाटपणे वागण्याकडे त्यांचा असलेला कल. जगताना या विशिष्ट स्वभावामुळे नेहमी टोकाचे निष्कर्ष काढण्याची त्यांची सवय, हे त्यांच्यातले विक्षिप्तपण त्यांच्या गझलेत एक आगळीच मस्ती आणि धुंदी उतरवून गेले. नितळ झर्‍याच्या तळाशी असलेल्या शंखवाळूसारखे त्यांच्या गझलमधून त्यांचे व्यक्तीत्व दृगोचर होते.

'स्मरण'- मृत्यूलाही स्वप्‍नाच्या पातळीवर नेणारी सुरेश भटांची ही साधी, सरळ पण कल्पनारम्य गझल आहे. माझ्या मृत्यूतच माझ्या दु:खाचा शेवट व्हावा. एरवी ती दु:खे संपणार नाहीत असे करुण उद्‌गार कवी काढतो-
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी !
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.

आपल्या मृत्यूविषयीही कवीने काही रमणीय कल्पना केल्या आहेत. आपल्या मरणोत्तर फक्त आपल्या जीवलगांनीच आपल्याला न्यावयास यावे. आपली चिता त्यांनी तारकांच्या मांडावाखालीच पेटवावी. आपली समाधी दूर रानात बांधावी आणि फुलांचीच आसवे तिच्यावर ओघळावीत. आपली चौकशी फक्त धुळीने करावी आणि आपली राख झाल्यावर आपल्या प्रेयसीने आपली गीते मात्र स्मरावीत.
हे एका कवीचे आपल्या मृत्यूविषयीचे स्वप्‍न आहे. इथे मृत्यूही मनोरम कविकल्पना आहे. मृत्यूविषयी बोलताना अखेर कवी आपल्या कवितेपाशी आला आहे. यातच त्याची आपल्या कवितेविषयीची आशा लपली आहे. ती अशी की आपल्या मरणोत्तर का होईना, निदान आपल्या जीवलगांना का होईना पण आपली कविता तरी आठवावी. कवीचे कवितेवर इतके प्रेम असते !
(संपादित)

शिरीष पै
'सुरेश भट ह्यांची निवडक कविता' या शिरीष पै संपादित कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.