A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पोवाडा (२)

हिंदवी राज्य स्थापून
मोठ्या हिमतीनं, शूर शिवाजीनं
राज्याभिषेक समारंभ खास
केला यथाविधी रायगड किल्ल्यास
ऐका शिवशाहीचा इतिहास.. जी ऽऽ जी जी ऽऽ

कोण मानीत नाही कोणाला
देवादिकाला, देश, धर्माला
जुलुम जबरदस्ती अन्याय फार
असा भूमीवर वाढता भार
देवाला घ्यावा लागतो अवतार.. जी ऽऽ जी जी ऽऽ

या न्यायाने शहाजी राजे व जिजाईचे पोटी शीव-अवतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातील बाजी, तानाजी, येसाजी, सूर्याजी, फिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्यांनी,

स्वराज्याचं बांधून तोरण प्रथम तोरण्याला
गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकला
पण आर्थिक प्रश्‍न महत्त्वाचा भासू लागला.. जी ऽऽ जी जी ऽऽ

हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा
याचवेळी विजापूराहून निघालेला 'कल्याण' खजिना, स्वराज्याच्या कल्याणाकरता लुटण्याचा सुयोग आला आणि या लुटीत,

शिवाजीचे वर्णु गूण किती
न्याय आणि नीती, सदाचार-प्रीती
कल्याण खजिन्याच्या लुटीत एक महान
तरुणी लाभली रूपाची खाण
पण तिच्यापुढे नमुनी मान
मानुनी तिला मातेसमान
परस्‍त्रीचा या केला बहुमान
असा शिवराय चारित्र्यवान.. जी ऽऽ जी जी ऽऽ

विजापूरचा अफझुल खान
शिवाजीला करण्या हैराण
किंवा त्याचा घ्यावया प्राण
पैजेचा विडा उचलून
आला प्रतापगडावर जाण
पण त्या अफझुल खानाला शिवाजी राजानं
कायमचा बसविला तिथंच कबर बांधून.. जी ऽऽ जी जी ऽऽ

मग फाजिल सिद्दी आला
पन्हाळगडी वेढा टाकला
त्यातून शिवबा निसटला
विशाळगडी पोचता झाला, पोचता झाला.. जी ऽऽ जी जी ऽऽ

मग दिल्लीहून तडफेनं
चाळीस हजार फौज घेऊन
आला मामा शाहिस्तेखान
पुण्यामधे कडक शिस्तीनं
बैसला तळ ठोकून
पण त्याला शिवाजी राजानं
अचानक रात्री गाठून
घेतली बोटे कापून
जिवावरील संकट बोटावर भागवून
शाहिस्ता पळाला पार पुणे सोडून.. जी ऽऽ जी जी ऽऽ

पुढे औरंगजेबाने आपला
राजकारणी डाव खेळलेला
मुत्‍सदी व धोरणी असलेला
मिर्झाराजा जयसिंग आला
शिवाजीवर पाठवून दिला
त्यानं पुरंदर वेढिला
तोफांचा भडिमार केला
जोराचा हल्ला चढविला
शिवाजीनं अशा वेळेला
जाणून भविष्यकाला
माघारी पाय घेतला
तडजोडीने किल्ले दिले-गेले एकमेकाला
त्यामुळे मिर्झा राजा तो मानी शिवबाला.. जी ऽऽ जी जी ऽऽ

शिवाजीचे नाव गाजले
शत्रूही मित्र जाहले
जसे पोथ्या-पुराणे आपुले
तसे बायबल-कुराण मानिले, कुराण मानिले.. जी ऽऽ जी जी ऽऽ

शिवाजीची कीर्ती पसरली
चहूकडे भली, सहन नाही झाली
दिल्लीपती औरंगजेब बादशहास
मिर्झा राजा जो दक्षिण भागात
त्याच्या मार्फत शिवाजी राजास
वाढदिवसाच्या निमित्ताने खास
हिकमतीने बोलावून शिवबास
नजरर्कैदेत ठेविले आग्र्यास.. जी ऽऽ जी जी ऽऽ

पण शिवाजीही शेराला सव्‍वाशेर होता.

हातोहात फसवून जाळ्यातून सिंह बाहेर पडला
दिल्ली सम्राट थक्क झाला
म्हणे, “ये क्या हुआ अल्‍ला?” हो.. जी ऽऽ जी जी ऽऽ

दिल्लीच्या बादशहाची कायमची झोप उडवून शिवाजी महाराष्ट्रात आल्याची बातमी पसरताच,

विजापूरच्या आदिलशहाला
परस्पर धक्का हा बसला
जशास तसे वागण्याला
शिवाजीने विचार केला
आणि तडजोडीने त्याला
दिलेले किल्ले मोंगलाला
पुन्हा फिरून सर करण्याचा प्रारंभ केला.. जी ऽऽ जी जी ऽऽ

वीस वर्ष परकीय सत्तेशी सामना देऊन
महाराष्ट्राचा मुलुख शिवाजीनं घेतला जिंकून
स्वराज्याचे स्वप्‍न साकार झाले मानून.. जी ऽऽ जी जी ऽऽ

शिवाजीच्या राज्याभिषेकाला
शास्‍त्र निपूण भारतभूला
अशा गागाभटाने अपुला
संपूर्ण पाठिंबा दिला
आणि सांगितले सर्वाला
चार यवनी पातशाहीला
शिवाजीनं सुरुंग लावला
असा मराठा राजा अपला
छत्रपती जहाला पाहिजे महाराष्ट्राला
ऐकून विरोधकांचा विरोध विरघळला.. जी ऽऽ जी जी ऽऽ

रायगडावर अष्टप्रधानांनी
वैदिक ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्रांनी
अभिषेक केला शिवाजी राजास
विजापूर इंग्रज पोर्तुगीज खास
प्रतिनिधी हजर समारंभास.. जी ऽऽ जी जी ऽऽ

शिवशक सुरू जाहला, राज्याभिषेकाला
आणा ध्यानाला, अशा शिवछत्रपती चरणास-
मुजरा त्रिवार करून समयास
शाहिर पिराजी गातो कवनास.. जी ऽऽ जी जी ऽऽ

 

  शाहीर पिराजीराव सरनाईक