हर्षाच्या उन्मादे मीलनाचा संकेत केला
कस्तुरीच्या गंधाने भारावुनी धुंद झालो
वसंताच्या रंगात रंगुनिया दंग झालो
खेळत खेळत, नाचत नाचत रे, मदनाने भेद केला
कोकिळेच्या गंधर्वगायनाने वेडा झालो
मीलनाच्या आतुर कल्पनेचा गंध प्यालो
हसत हसत, डोलत डोलत रे, छेडितो गीतमाला
गीत | - | उमाकांत काणेकर |
संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
स्वर | - | सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
कस्तुरी | - | एक अतिशय सुगंधी द्रव्य. |
सुमन | - | फूल. |
वेळेवर बेल वाजली. "मी सुरेश वाडकर." समोर २०/२१ वर्षांचा मुलगा पाहून चाटच पडलो "अरे तू काय?" आत आला. मला वाटले कुणीतरी भला मोठा माणूस असेल बाप्या. त्याला चहा देऊन बाजा काढून एक तर्ज सांगितली. ती त्याने चांगली गायली. त्याच्या आवाजाची धारणा पाहून गाणं बनवलं. उमाकांत काणेकरांनी लिहिलं 'प्रीतीचा फुलबाग सुमनांनी बहरून आला'. याचंही रेकॉर्डिंग मी शशांक स्टुडिओत केलं. इथे मीपणा आला कारण अरेंजिंग सुद्धा मीच केलं होतं त्यात ओशाळेपणा कसला?
हे यशस्वी झाल्यावर त्याचं ग्रामोफोन कंपनीत रेकॉर्ड करावं असं वाटलं. त्यात एनेको कंपनीचे रेळे घरी आले होते. त्यांना विचारलं, "उद्या सांगतो" असे सांगून ते गेले. आले ते अशा मूडमध्ये की, "हे पहा, ठीक आहे पण अण्णा रेकॉर्डिंग करताहेत."
मी चटकन अण्णा (सी. रामचंद्र) यांना फोन फिरवला. "अण्णा, तुम्ही सुरेश वाडकरचं रेकॉर्डिंग करताय का 'एनेको'मध्ये? इथे रेळे आलेत ते म्हणताहेत."
अण्णा म्हणाले, "छे हो श्रीकांतकाका, मी कधीच असं म्हणालो नाही."
मी लगेच रेळ्याकडे फिरून म्हणालो, "काय हो, अण्णा नाही म्हणतात. आता तुम्ही काय म्हणता?"
रेळे वदले, "नाही हो, असं करा दोन गाणी तुम्ही करा, दोन गाणी जोग करतील."
माझा संताप ११० डिग्रीच्या वर गेला. "हे बघा, बस झाली तुमच्या पळवापळवीची भाषा ! कृपा करून उठा. मला तुमच्याकडे रेकॉर्डिंगची भाषा करायची नाही. कधी आला तर फक्त चहा मिळेल पण आणखी काही बोलाल तर काय मिळेल ते सांगता येत नाही !"
याच माणसाशी मी एच.एम.व्ही. मध्ये भांडलो होतो सत्यासाठी. कारण सगळ्या रेकॉर्डस्च्या कव्हरवर संगीतकाराचे नाव असायचे. मग रफीसाहेबांच्या रेकॉर्डच्या कव्हरवर नाही, असं सांगितले. मी बाजारातून अनेक कव्हरं आणून दाखवली. ते म्हणाले, "ही हिंदी आहेत." त्यांच्यासमोर अतिफालतू संगीतकारांची कव्हरं धरून विचारलं, "मग हे काय, हे कोण आहेत ज्यांचं नाव लोकांना माहीत नाही. आता बोला." काय कपाळाचं बोला, ज्यांचं नाव रेळे आहे ते फक्त अश्रूंचे रेळेच काढणार. असा हा रेळे.
मग तडक खळ्यांकडे गेलो. रेळे नाहीतर खळे. त्यांना सांगितलं. त्याबरोबर त्यांनी हो म्हटलं, "फक्त सुरेशला सांगा की आमच्या फॉर्मवर सही कर." सुरेशला तसं सांगितलं तर तो हो म्हणायचा पण सही करायला जायचाच नाही. मी खळ्यांना फोन करायचो. "काय हो केली का सही?" उत्तर "नाही हो." सुरेशला विचारले, "हे बघ तुला कॉन्ट्रॅक्टचा अर्थ समजत नसेल तर तुझ्या वकिलाला किंवा सॉलिसिटरला विचार की अंगठा उठवू का?" तेव्हा कुठे त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. दोन दिवसात एच.एम.व्ही. मध्ये जाऊन त्याने सही करून कॉन्ट्रॅक्ट फॉर्म दिला. खळे यांचा फोन आला. "आजच सुरेशने फॉर्म पाठवला. तुम्ही गाणी तयार करायला घ्या. मी तारीख देतो."
काणेकरांना बोलावून गाणी तयार करायला बसलो. एक गाणं तयार होतंच. दुसरी तीन गाणी बनवायची होती. त्यात 'तुझेच रूप सखे पाहुनिया’, एक गजल ’रातभर तो चंद्र असा’, एक भजन 'वासना सुखाच्या रंगी रंगुनिया गेलो’. प्रत्येक गाण्यात एक वेगळे वैशिष्ट्य होते. या गाण्यांच्या वेळीही अरेंजर मीच होतो.
(संपादित)
श्रीकांत ठाकरे
'जसं घडलं तसं' या श्रीकांत ठाकरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- चिनार पब्लिशर्स, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.