A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रिये ये निघोनी (१)

प्रिये ये निघोनी घनांच्याकडेनी
मला एकटेसे अता वाटताहे
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे

असे वाटते की तुझ्यापास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे
परंतु मला वेळ बांधून नेते
कधी मुक्तता हे कुणाला न ठावे !

सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो
न देई कधी घेतल्याविण त्याला
नमस्कार नेमस्त देऊन येतो

असे वाटते की कधी कोणी नव्हतो,
न आहे, न वाहे उरातून श्वास..
उराअंतरातून यांत्रिकतेने
फिरे फक्त वारा.. किंवा तोही भास !!

दिसे जे कवीला, न दिसते रविला
सांगून गेले कुणीसे शहाणे !
मला तू न दिसशी परंतु तयांच्या-
नशीबी कसे सांग तुजला पहाणे?

असे वाटणे.. ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत:शी.. तुझ्याशी दुरावा !
किती फाटतो जीव सगळ्यात यात
मिठीतून देईन सगळा पुरावा !!

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी
मला एकटेसे अता वाटताहे
गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- सलील कुलकर्णी, संदीप खरे
अल्बम - सांग सख्या रे
गीत प्रकार - कविता
नेमस्त - नेमका / बरोबर / बेताचा / मवाळ.
नीर - पाणी.