A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रक्तामध्ये ओढ मातिची

रक्तामध्ये ओढ मातिची,
मनास मातीचें ताजेपण,
मातींतुन मी आलें वरती,
मातीचें मम अधुरें जीवन.

कोसळतांना वर्षा अविरत,
स्‍नान समाधीमधे डुबावें;
दंवात भिजल्या प्राजक्तापरी
ओल्या शरदामधि निथळावें;

हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओलें अंग टिपावें;
वसंतांतलें फुलाफुलांचें
छापिल उंची पातळ ल्यावें;

ग्रीष्माची नाजूक टोपली,
उदवावा कचभार तिच्यावर;
जर्द विजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर;

आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरांत काजवे,
उभें राहुनी असें अधांतरिं
तुजला ध्यावें, तुजला ध्यावें.
उदविणे - केसांना उदाची धुरी देणे.
कच - केस / बृहस्पतीपुत्र. हा पुष्कळ दिवस शुक्राचार्यांजवळ राहून संजीवनी विद्या शिकला. शुक्राचार्यांच्या कन्येचे, देवयानीचे, याच्यावर प्रेम होते.
जर्द - अतिशय गहिरा.
मत्त - माजलेला, दांडगा.
'मृण्‍मयी' ही इंदिरा संतांची सर्वाधिक प्रसिद्ध कविता आहे. कारण अनेक रसिकांनी, अभ्यासकांनी आणि समीक्षकांनी या कवितेचे सौंदर्य उलगडून पाहण्याचे प्रयत्‍न केलेले दिसतात. काव्यविषयक खाजगी चर्चांमधून, इतकेच नव्हे तर खाजगी पत्रव्यवहारांतूनही या कवितासंबंधाने बोलले, लिहिले गेले आहे. चित्रकार द. ग. गोडसे यांना कवितेच्या निर्मितिप्रक्रियेचा पुन:पुन्‍हा वेध घ्यावासा वाटला आहे. कारण या कवितेला एक रूपसौष्ठव आहे. ती नवनवीन लोभसवाणी दर्शने देत राहते आणि आस्वादकांना स्वत:कडे खेचत असते.

रक्तात मातीची ओढ आहे आणि मनास मातीचे ताजेपण आहे. याचे मुख्य कारण आपले अस्तित्‍व मातीतून उगवून वर आलेले आहे. आपले जीवन मातीचे आहे आणि मातीप्रमाणेच ते अपुरे म्हणजे विकासोन्‍मुख आहे.

माती ऋतुचक्र झेलत असते आणि त्या त्या ऋतूत स्वत:चा असा एक आविष्कार घडवीत असते. वर्षाऋतूत ती स्‍नानसमाधीत मग्‍न होते तर शरद ऋतूत ती दंवात भिजलेल्या प्राजक्तासारखी निथळत राहते. वसंत ऋतूमध्ये सर्वत्र फुललेली फुले ती अंगावर परिधान करते आणि ग्रीष्म ऋतूत आपला कचभार उदवून घेते, विजेचा केवडा वेणीवर तिरकस माळते. जणू प्रत्येक ऋतुला अनुकूल अशी क्रीडा ही मृण्मयी करत असते. एखाद्या रमणीने मनसोक्त स्‍नान करावे, मग आपले शरीर निथळत स्वत:च स्वत:च्या शरीराचे हलकेफुलकेपण अनुभवावे, हळुवारपणे अंग टिपावे, उंची वस्त्रप्रावरणे ल्यावीत, न्हाऊन मोकळा सोडलेला आपला केशसंभार नाजुकपणे उदवावा, सुरेख वेणी घालून तिच्यावर केवडा माळावा.. अशी साश्रूंगाराची क्रीडामालिका येथे गुंफली गेली आहे. एवढे झाल्यावर ती 'स्व' कडून 'तू' कडे वळते. नुसती वळते नव्हे तर -

आणिक तुझिया लाख स्मृतीचे
खेळवीत पदरांत काजवे,
उभें राहुनी असें अधांतरिं
तुजला ध्यावें, तुजला ध्यावें
अशा रीतीने प्रणयातील पूर्वस्मृतींशी खेळत त्याच्याच - आपल्या प्रियकराच्या ध्यानात निमग्‍न होते.

शेवटच्या कडव्यातील 'अधांतरि' हा शब्दप्रयोग अनेक आस्वादकांना वेगवेगळ्या स्वरूपाचे अर्थदान करताना दिसतो. प्रणयोत्सुक नवोढेने आपले 'मी'पण सोडले आहे आणि अपेक्षित असा प्रणयक्षण अद्यापि यावयाचा आहे, या दरम्यानचा अवकाश 'अधांतरि' या शब्दाने टिपला आहे, असे म्हणता येईल.

"इंदिराबाईंच्या प्रेमकवितेत प्रियकराचे चित्र नेहमीच धूसर, अस्‍पष्ट असते. त्यांची कविता मुख्यत: केंद्रित होते ती 'प्रेयसी'वर" हा प्रा. रमेश तेंडुलकरांचा अभिप्राय याही कवितेला जसाच्या तसा लागू होतो.

या कवितेत ऋतुचक्र फिरवलेले असले तरी शिशिर ऋतू येत नाही. याचे एक अत्यंत अन्वर्थक उत्तर डॉ. म. सु. पाटील यांनी शोधिलेले आहे. ते लिहितात, "येथील 'मी'ला आपले धरतीशी असलेले नाते जणू अंतर्ज्ञानाने प्रतीत होते. आपल्याला निसर्गाची इतकी ओढ का, याचा अन्वयार्थ 'मी'ला नव्याने लागतो. पुढे वर्षा, शरद, हेमंत, वसंत आणि ग्रीष्म या ऋतूंच्या बदलत्या चक्रानुसार 'मी'ची बदलती रूपे येतात. ती 'मी' एकीकडे स्त्री आहे आणि दुसरीकडे धरतीही आहे. ऋतुपरत्वे ती चिरसुंदरी नवनवीन रूपात नटते. ती चिरयौवना आहे. म्हणूनच येथे शिशिर आणि त्याची पानगळ येत नाही."

अर्थात 'मृण्मयी'च्या अर्थनिरूपणाची ही एक दिशा आहे. खरे तर ही कविता आपल्या स्वत:मध्ये अनेक अर्थ घेऊन उभी आहे. ती बहुप्रसवा माती आहे, खरोखरच मृण्मयी आहे, हेच खरे. म्हणूनच या कवितेचे 'मृण्मयी' हे शीर्षकदेखील या कवितेच्या सौंदर्याचा एक घटक आहे. सौंदर्यदानासाठी समुत्‍कंठित झालेली शुद्ध भावकविता म्हणून मराठी कवितेमध्ये 'मृण्मयी'चे स्थान फार वरचे आहे.
(संपादित)

डॉ. दत्तात्रय पुंडे, डॉ. स्‍नेहल तावरे
त्रिदल- बालकवी, कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या निवडक कविता
सौजन्य- स्‍नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.