A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राम जन्मला ग सखी

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती !

दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला ग सखी राम जन्मला

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला

राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं
दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला

पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
'काय काय' करित पुन्हां उमलल्या खुळ्या
उच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला

वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं
गेहांतुन राजपथीं धावले कुणी
युवतींचा संघ कुणी गात चालला

पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें
हास्याने लोपविले शब्द, भाषणें
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला

वीणारव नूपुरांत पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला

दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला

बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं
सूर, रंग, ताल यांत मग्‍न मेदिनी
डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र मांड
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- ६/५/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुमन माटे, जानकी अय्यर, कालिंदी केसकर.
आतपांत - (आतप- ऊन्ह) प्रखर उन्हांत.
गेह - घर.
जधीं - जेव्हां, ज्या दिवशी.
दुंदुभि - नगारा, एक वाद्य.
दिग्गज - पृथ्वी तोलून धरणारे आठ हत्ती / नरश्रेष्ठ.
धेनु - गाय.
मेदिनी - पृथ्वी.
रव - आवाज.
वात - वायु.
शेष - पृथ्वी डोक्यावर तोलून धरणारा सर्पांचा राजा.
गीतरामायणाची सगळी गीते माडगूळकरांनी आधीपासून लिहिलेली नव्हती. पहिल्या गीताच्या प्रक्षेपणानंतर पुढची पाच-सात गाणी त्यांनी लिहिली. पण चित्रपटांच्या कामामुळे त्यात खंड पडू लागला. दर आठवड्याला एक गीत ब्रॉडकास्ट व्हायचं असल्यामुळे गाणं वेळेवर मिळणं आवश्यक असायचं.

त्या काळात मी फडकेसाहेबांचा सहाय्यक होतो. त्यामुळे माझ्यावर वादकांच्या रिहर्सल्स‌ घेण्याबरोबर माडगूळकरांकडून गाणे घेऊन येण्याची नवीनच जबाबदारी पडली. एक गीत रेकॉर्ड झाल्यावर एक-दोन दिवस वाट पाहून माडगूळकरांकडे गाणे आणण्याकरता मी निघायचो. जुन्या पुणे-मुंबई हायवेवर, वाकडेवाडीजवळ, त्यांच्या 'पंचवटी' या बंगल्याच्या फाटकात लांबून मला आलेलं पाह्यलं की अण्णा जोरात म्हणायचे, "आला रे आला, रामाचा दूत आला ! आता हा काही गाणं घेतल्याशिवाय जायचा नाही !"

मी आत गेलो की मला बसायला सांगून, घरात जाऊन, गाणं तयार असेल तर आणून द्यायचे आणि नसलं तर "थांबा, लिहून देतो." असं म्हणून थोड्या वेळाने गाणं लिहून माझ्या हातात द्यायचे.

ग.दि.मा आणि फडकेसाहेब, ही अत्यंत प्रतिभावंत मंडळी होती. ते दोघेही नेहमी हेच सांगत की, गीतरामायण आम्ही केलं नाही, ते झालं. परमेश्वरानं ते आमच्याकडून करून घेतलं.

माडगूळकर म्हणायचे, "श्रीरामाची भक्ती आमच्या घराण्यातच होती. घरातल्या संस्कारातूनच मला गीतरामायणाचं काव्य सुचत गेलं. ते केलं नाही, होत गेलं."

फडकेसाहेब म्हणायचे, "प्रत्येक गीत भारतीय संगीतातील रागावर करावं असं प्रथमपासून डोक्यात होतं. पण प्रत्येक गीताला योग्य तो राग सुचत जावा हा एक चमत्कारच होता. तो माझ्या स्वररचनेतून व्हावा अशी श्रीरामाचीच इच्छा असावी."

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण