राया, तुला रे, काळयेळ नाही !
राया, तुला रे, ताळमेळ नाही !
थोर, राया, तुझे रे, कुळशीळ !
वाहे झरा ग झुळझुळ वाणी;
तिथं वार्याचिं गोडगोड गाणीं :
तिथं राया तुं उभा असशील !
तिथं रायाचे पिकले मळे;
वरी आकाश शोभे निळे :
शरदाच्या ढगाचि त्याला झील
येड्यावानी फिरे रानोवना :
जसा कांही ग मोहन कान्हा !
हासे, जसा ग राम घननीळ !
गीत | - | ना. घ. देशपांडे |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | जी. एन्. जोशी |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- सप्टेंबर १९२९. |
झील | - | तेज / चकाकी. |
'शीळ' गाणं १९३१ पासून घरोघर जावून पोहोचलं. जी. एन. जोशी ह्या एका गाण्यामुळे लोकप्रिय झाले. ग्रामोफोन कंपनीनं त्यांना मानानं नोकरी दिली. पुढे त्यांनी अनेक गाणी केली. शास्त्रीय, सुगम व भावगीतांच्या पन्नासेक ध्वनिमुद्रिका (शंभर गाणी) त्यांनी १९५० पर्यंत केल्या. प्रत्येक रेकॉर्डच्या लेबलवरती 'जी. एन. जोशी, बी.ए.एल.एल.बी.' असं छापलेलं आढळतं. गंगुबाई हनगळ, सरोज बोरकर ह्यांच्याबरोबर ते द्वंद्वगीते गायले. 'डोळे हे जुल्मी गडे', 'प्रेम कोणीही करेना, कां अशी फिर्याद खोटी', 'आलात ते कशाला, प्रिय जाहला कशाला', 'फार नको वाकू जरि उंच बांधा', 'गोरी धीरे चलो', 'जाके मथुरा या कान्हाने', 'अजहून आये श्याम' ही त्यातली काही गाजलेली गाणी.
कंपनीचे अधिकारी या नात्यानं त्यांनी सुमारे चाळीस वर्षे अनेकांची ध्वनीमुद्रणं केली. त्या अनुभवांचं एक पुस्तक - 'स्वरगंगेच्या तीरी' लिहिलं. त्याचं इंग्रजी रुपांतरही प्रकाशित झालं. ह्या पुस्तकात ह्या 'शीळ' गाण्याविषयी पहिलं प्रकरण लिहिलं आहे. हे एक ग्रामीण प्रेमी जीवांचं प्रणयगीत आहे. खेडयातलं वातावरण हूबेहूब उभं केलं आहे. शहरी व ग्रामीण भागातल्या लोकांना हे गीत खूपच आवडलं. इतक्या प्रांजळपणानं ग्रामीण भागातील तरुणीनं प्रथमच आपली प्रेम भावना कवितेमधून व्यक्त केली असावी. गंमतीची गोष्ट म्हणजे हे गाणं स्त्रीच्या आवाजात मुद्रित व्हायला हवं होतं, पण झालं मात्र पुरुषाच्या आवाजात ! अर्थात स्त्रियांच्या भूमिका पुरुषांनीच करायच्या त्या काळात हे कुणाला खटकलं सुद्धा नाही.
(संपादित)
डॉ. सुरेश चांदवणकर
सौजन्य- www.marathiworld.com
(Referenced page was accessed on 28 August 2016)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.