A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रंगा येईं वो येईं

रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं ।
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥

वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी ।
तुझा वेधु माझे मनीं ॥२॥

कटि कर विराजित मुगूट रत्‍नजडित ।
पीतांम्बरू कासिला तैसा येइ का धांवत ॥३॥

विश्व-रूपे विश्वं-भरे कमळ-नयनें कमळाकरे वो
तुझे ध्यान लागो बाप रखुमादेवीवरे वो ॥४॥
कटि - कंबर.
किठाई - ’कृष्णाई’चे एक रूप.
रंगण - रिंगण / फेर / मंडल / अंगण / सभा.
रंगा - रंगणात.
वेधु - ध्यास.
भावार्थ-

हे माझे आई ! तू माझ्या हृदयात येऊन रहा. प्रेमरूप वैकुंठात राहणे तुला आवडते, असे मी ऐकले आहे. आणि माझ्या हृदयात तुझ्या प्रेमाशिवाय काहीच नाही. म्हणून तिथे तू अवश्य येऊन रहा. तू या विश्वाची जननी आहेस. तू स्वत:च विश्व-रूपिणी आहेस. विश्वाचे भरण करणारी तूच आहेच. कमलवत्‌ निर्लिप्त नेत्रांनी तू ह्या विश्वाचे कौतुक पाहणारी साक्षि-रूपिणी आहेस. निर्लिप्ततेची तर तू खाणच आहेस. माझ्या हृदयात राहण्याने तुला तर लेप लागणारच नाही आणि मी मात्र तुझ्या स्पर्शाने तुझे ध्यान लागून त्‍वद्रूप होऊन जाईन.

आचार्य विनोबा भावे
ज्ञानेश्वरांची भजनें
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.