A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रात्र आहे पौर्णिमेची

रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा
जाणिवा थकल्या जिवाच्या एकदा ऐकून जा

निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा

पाखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा

अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा
शांताराम नांदगांवकर हे फार चटपटीत कवी आहेत. त्यांच्याकडे काव्याचा प्रचंड साठा आहे. मी त्यांची बरीच गाणी रेकॉर्ड केली. रेडिओवर गायलो, कार्यक्रमात गायलो. पण एका गाण्याचा इतिहास मजेशीर आहे. डोंबिवलीच्या एक कवयित्री सौ. अनुराधा साळवेकर यांची माझी ओळख नव्हती पण एका कार्यक्रमात त्यांनी त्यांचं एक कवितेचं पुस्तक मला प्रेझेंट केलं आणि म्हणाल्या, "बघा, तुम्हाला यातली गाणी आवडली तर !" त्या पुस्तकातले एक गीत मला आवडले. शब्द चांगले होते.
चांदणे ते तेच मधुबन ती निशा शरदातली
संगतीला नाही कान्हा आज राधा एकली

मी त्याला चाल लावली. एच.एम.व्ही.त जाऊन तेथल्या प्रोड्युसरला ऐकवली. त्यांना काव्यातलं कितपत कळत होतं कोण जाणे पण त्यांना ते गाणं काही पसंत पडलं नाही मग मी ते गाणं तसंच बाजूला ठेवलं. रूपकमधली इतकी चांगली चाल झाली असूनही त्या गाण्याचा रेकॉर्ड होण्याचा योग नव्हता याचं मला फार वाईट वाटत होतं.

शांताराम नांदगांवकर यांची बरीच गाणी मजजवळ होती व त्या गाण्यांनाही वाट सापडत नव्हती. ते नेहमी माझ्याज जवळ येऊन बसायचे. म्हणायचे, "पुजारी, माझं एखादं तरी गाणं घ्या ना तुम्ही हातात. तुम्ही काही आमच्याकडे लक्ष देत नाही." मी त्यांना म्हणालो, "नांदगांवकर, हे बघा, तुम्ही घाई करू नका बुवा. जेव्हा वेळ येईल तेव्हा अवश्य तुमचं गाणं करू." तरी पण ते माझा पिच्छा सोडेनात. शेवटी एक दिवस मी त्यांना म्हंटलं, "तुमच्याकडे रूपकच्या वजनातलं एखादं काव्य आहे काय? मी तुम्हाला एक चाल ऐकवतो त्यावर तुम्ही गाणं रचून द्याल?

माझ्या मनात बरीच वर्षे, जवळजवळ चार वर्षे, अनुराधा साळवेकर यांच्या गीतावर बेतलेली चाल घोळत होतीच. त्या चालीबरहुकुम शब्द लिहून घ्यायचे वा गाणं तयार करायचे हे माझ्या तत्त्वात बसत नव्हतं. तरी पण मी दोन दृष्टीने विचार केला. चालीवर बरोबर वजनाचे शब्द लिहिणं हे सगळ्यांना जमतं असं नाही. तसं जर नांदगांवकरांना जमलं तर आपली चांगली चाल वाया जाणार नाही. पण नांदगांवकर या परीक्षेत १०० टक्के उत्तीर्ण झाले. त्यांनी एक फार सुंदर काव्य लिहून माझ्यापुढे ठेवले-
रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा
जाणिवा थकल्या जिवाच्या एकदा ऐकून जा

मी म्हंटलं, "नादगांवकर, वा ! तुमचा जवाब नाही. अगदी हवं तसं काव्य तुम्ही दिलेलं आहे."
'चांदणे ते तेच मधुवन' या गाण्याकरता जी चाल तयार केली होती ती या शब्दांना अगदी फिट्ट बसली. या गाण्याचं सुमनताईंच्या आवाजात रेकॉर्डिंग झालं. माझ्या कल्पनेपेक्षाही सरस झालं. खूप लोकप्रिय झालं. आधी चाल व नंतर शब्द या पठडीतलं हे माझं एकुलतं एक गाणं असावं. पण मी ते मुद्दम केलं नाही. त्या गाण्याचा योगच तसा असावा.

शांताराम नांदगांवकरांची१०-१२ गाणी तरी एच.एम.व्ही.साठी किंवा रेडिओ प्रोग्रॅमसाठी वापरली. त्यातली उल्लेखनीय गाणी म्हणजे-
मुरलीधर घनश्याम सुलोचन..
मी नयनस्वप्‍न वेडा..
ही नव्हे चांदणी ही तर मीरा गाते..

प्रथम काव्य की सुरावट? आधी चाल तयार करावी, मग कवीकडून त्याकरिता कविता लिहून घ्यावी- हे योग्य की अयोग्य याची चर्चा नेहमीच चालते. अर्थात हे प्रत्येक संगीतकाराने ठरवावे. मी मात्र आधी काव्य व नंतर त्यावर अनुरूप चाल, या मताचा आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. माझी विचारसरणी अशी आहे की समजा माझ्याकडे एखादी कविता आहे. त्यावर चाल करायची आहे तर ती मेहनत संगीतकाराची असते. ते करताना बर्‍याच गोष्टींचा विचार होत असतो. आता आम्ही आधी चाल केली व नंतर कवीने त्यात शब्द बसवले तर ती मेहनत कवीची झाली. मी काय केलं? तयार काव्यावर चाल केली तर त्या चालीचे गुणधर्म, वैशिष्ट्य, त्याकरता घेतलेले कष्ट यात संगीतकाराचं कसब दिसेल. या सर्व गोष्टींचा विचार करता काव्यावरती चाली बांधणे ही उचित गोष्ट आहे. एखाद्या ओळीला आधी ठरवलेल्या चालीपेक्षा निराळ्या पद्धतीने गायलं तर श्ब्दांना चांगला उठाव मिळेल असं जर आपल्याला वाटलं तर तसा बदल आपण करू शकतो.

कधीकधी कवी कविता लिहिण्याच्या ओघात कविता लिहून जातात. पण त्यात काही त्रुटी राहून जातात. कधी मात्रांची संख्या कमीजास्त तर कधी शब्दांची द्विरुक्ती. अशा वेळी कवीकडून काव्य सुधारून घ्यावं लागतं. चालीवर बांधलेले शब्द जर व्यवस्थित जुळले तर ऐकायला बरं वाटेल पण तो योगायोगाचा भाग झाला. काही वेळा असा विसंगतपणा दिसून येतो की चालीकरता शब्दांची ओढाताण झालीये किंवा चुकीचं म्हटलं गेलं आहे. ज्या ठिकाणी थांबायला पाहिजे तिथे जर थांबलं नाही तर फार विचित्र वाटतं. असे प्रकार पुष्कळ वेळेला घडतात. तुमच्या चालीचे वजन व ठेका पाहून कवीला शब्द मोजावे लागतात. म्हणजे गाण्याचे सर्व श्रेय कवीला जाते. म्हणून म्हणतो , संगीतकाराने काव्यावरतीच चाल बांधावी.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली

  इतर संदर्भ लेख