A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रे क्षणाच्या संगतीने

रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले
वेड वेडे घेउनी मी मागुती तव धावले

ध्यास लागे सारखा आभास होती या जीवा
अंतरी तुजला स्मरावे छंद लागे हा नवा
या जगाच्या निंदकांचे मी हलाहल प्राशिले

संपदा लाभो करी वा दैन्य कोरांटीपरी
तृप्त मी होईन नाथा दो करांच्या कोटरी
आवरीता आवरेना झिंगलेली पाऊले

ना भीती जन-नीतिची मज, तू उभा मागेपुढे
रे नको मज स्वर्ग जेथे लाभ देवाचा घडे
तारि आता तूच, माझ्या देहि भिनली वादळे
गीत - राम मोरे
संगीत - दशरथ पुजारी
स्वर- सुमन कल्याणपूर
राग - बागेश्री
गीत प्रकार - भावगीत
कोटर - झाडातली ढोली.
माझे आणखी एक कवी मित्र म्हणजे राम मोरे. त्यांची व माझी भेट झाली तेव्हा ते वयाने लहान होते. त्यांचे नाव मला संगीतकार मधुकर पाठक यांनी सुचवले. ते म्हणाले, "पुजारीजी ! तुमच्याजवळ फार फार मोठे कवी आहेत. पण हा एक छोटा कवी आहे. त्याचे काव्य तुम्ही वाचा व वाचल्यावर तुम्हाला जे वाटेल त्याप्रमाणे करा. तुम्ही तसे काव्याच्या बाबतीत दर्दीच आहात." मी म्हणालो, "मला काव्यातलं तसं फारसं कळत नाही. मी काव्य वाचतो अन्‌ मला आवडलं तर त्याला चाल लावतो."
त्यांनी मला राम मोरे यांच्या कवितांची वही आणून दिली. मी वाचायला सुरुवात केली न्‌ पहिलंच गाणं जे वाचलं ते म्हणजे-
रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले
वेड वेडे घेउनी मी मागुती तव धावले

एका तरुणीची भावना तंतोतंत शब्दांत मांडली आहे. तेही रूपक सारख्या वजनदार तालात. तीन अंतर्‍यात त्या कवीने तो भाव सुंदर प्रकारे मांडलेला आहे. शब्दही गोड, नाजूक व गोंडस असे वापरले आहेत. मला त्याचे हे काव्य खूप आवडले. त्यावेळी सुमनताईंसाठी काही गाणी रेकॉर्ड करायची होती आणि योगायोगाने हे गाणं हाती पडलं. त्याला चाल लगेच लावली. काव्य चांगलं असलं तर त्याला चाल लावायला वेळ लागत नाही. मला चाल लगेच सुचली. बागेश्री रागात चाल बांधलेली आहे. संपूर्ण गाणं बागेशी रागाच्या बाहेर गेलं नाही व रूपकचा ठेका. सुमनताईंनी या गाण्याचं सोनं केलं. एक अत्यंत मधूर गीत म्हणून या गाण्याचा उल्लेख करावा लागेल. अशा पद्धतीने राम मोरेंचे पहिले गाणे रेकॉर्ड झालं. त्यानंतर त्यांची बरीच गाणी मी रेकॉर्ड झाली. 'हा उनाड अवखळ वारा', 'बरस रे घना' ही त्यांची गाणी उषा मंगेशकर यांनी गायली आहेत. एका नवीन रेकॉर्ड कंपनीत ही गाणी रेकॉर्ड झाली.

बहुतेक सर्व कवींना त्यांचं गीत लवकरात लवकर व चांगल्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड व्हावं असं वाटतं. मग ते संगीतकाराचा पिच्छा पुरवतात. राम मोरे यांनी मला तो त्रास अजिबात दिला नाही. सुरुवातीला त्यांना जरा भीतीच वाटत होती की पुजारींसारखे प्रसिद्ध व उत्तम संगीतकार त्यांचं गाणं रेकॉर्ड करतील का? पण त्यांची गाणी चांगली होती. ते स्वभावाने अगदी गरीब होते. त्यांनी खूप मेहनत घेतली होती म्हणून त्यांची गाणी रेकॉर्ड झाली. शब्दांचा व कल्पनांचा साठा जमवणारा शब्दसृष्टीचा राजा- तो कवी, आणि निरनिराळे सूर, निरनिराळ्या चाली निरनिराळ्या तालात मांडण्याची ज्याच्यात कुवत आहे- तो संगीतकार. असा सर्वसाधारण सिद्धांत.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.