मज वेड लाविले तू सांगू नको कुणाला !
एकान्त पाहुनीया जे तू मला म्हणाला,
ऐकून लाजले मी सांगू नको कुणाला !
चंद्रा ढगांतुनी तू हसलास का उगा रे?
वाकून खालती अन् का ऐकलेस सारे?
जे ऐकले तुवा ते सांगू नको कुणाला !
वार्या तुझी कशाने चाहूल मंद झाली?
फुलत्या फुला कशाला तू हासलास गाली?
जे पाहिले तुवा ते सांगू नको कुणाला !
हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून
पाण्या अशीच ठेवी छाया उरी धरून
धरलेस जे उरी ते सांगू नको कुणाला !
हा लाजरा शहारा पाहील काय कोणी?
करतील का चहाडी हे लाल गाल दोन्ही?
गालांत रंगले जे सांगू नको कुणाला !
गीत | - | वसंत अवसरे |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके |
चित्रपट | - | अवघाचि संसार |
राग | - | तिलककामोद, देस |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
अगदी प्रारंभीच्या काळात सुधीर फडके या मातबर संगीत दिग्दर्शकाबरोबर मी चार-पाच चित्रपटांसाठी गीते लिहिली. त्याच सुमारास वसंत पवार यांच्या संगीत दिग्दर्शनाखालीही मी काही चित्रपटांचे गीतलेखन करत होते. नीटसे स्मरत नाही; पण 'अवघाची संसार', 'साता जन्माचा सोबती', हे पवारांचे चित्रपट होते; तर 'माझी आई', 'सोनियाची पावले', 'कलंकशोभा' यांचे संगीत सुधीर फडके यांनी दिले होते. गाणी लिहून झाली. ती ध्वनिमुद्रितही झाली आणि नेमकी याचवेळी फिल्म सेन्सॉर बोर्डाची सदस्य म्हणून माझी नेमणूक करण्यात आली. ही नेमणूक पाच वर्षांसाठी होती. या काळात मी मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन, संवादलेखन, वगैरे काही करायचे नव्हते. त्याला माझी अर्थातच काही हरकत नव्हती, कारण गीते मी अधून मधून कधी तरी लिहीत असे. पण ज्या चित्रपटांतल्या माझ्या गीतांचे आधीच ध्वनिमुद्रण देखील होऊन बसले होते, त्यांचे काय करायचे? मी सेन्सॉर बोर्डाचे सदस्यत नाकारले; पण बोर्डाचे अध्यक्ष एम्. डी. भट यांनी मी तसे करण्याची काही आवश्यकता नाही, असे मला सांगितले.
ते म्हणाले, "ज्या चित्रपटांची गीते आधीच लिहून झालेली आहेत, त्यांच्या क्रेडिट टायटलमध्ये तुम्ही एखादे टोपणनाव घेऊन ते द्या. या चित्रपटांच्या पॅनलवर परीक्षक म्हणून तुम्हाला घेतले जाणार नाही, याची काळजी बोर्ड घेईल." 'सागरिका' किंवा 'चित्रलेखा' असे काही तरी टोपणनाव घ्यावे, असे मी मनाशी ठरवत होते. इतक्यात आमचे एक कौटुंबिक मित्र आणि हितचिंतक डॉ. वसंत अवसरे यांनी त्या कामासाठी आपले नाव द्यावे, असे मला सुचवले. डॉक्टर भलतेच हौशी होते. त्यांच्या सूचनेस मी संमती दिली. योगायोग असा की 'अवघाचि संसार', 'साता जन्माचा सोबती' अशा चित्रपटांली गाणी खूपच लोकप्रिय झाली. 'गीतकार- वसंत अवसरे' या नावाचा खरा इतिहास असा आहे.
पुढे ऐंशी सालानंतर पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डावर माझी निवड झाली. या वेळी सदस्यांनी चित्रपटांशी संबंध ठेवू नये, हा नियम काढून टाकण्यात आला होता. फक्त आपण ज्या चित्रपटासाठी गीते लिहिली असतील, त्याच्या पॅनेलवर आम्हाला घेत नसत. मी गीते लिहिलेले तीन चित्रपट या काळात सेन्सॉरकडे परीक्षणाला आले होते. ते म्हणजे 'भुजंग', 'माळावरचे फूल' आणि 'महानंदा'. अर्थात त्यांचा परीक्षकांत मी नव्हते, हे सांगायला नको.
(संपादित)
शान्ता शेळके
'चित्रगीते' या गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.