A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥

चरणकमळदळू रे भ्रमरा ।
भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥

सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥

सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वराविष्कार- लता मंगेशकर
रामदास कामत
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• स्वर- लता मंगेशकर, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर.
• स्वर- रामदास कामत, संगीत- ???.
विद्‍गद - चतुर / जाणकार.
सुमन - फूल.
भावार्थ-

अवगुण सोडून देण्याबद्दल उपदेश येथे ज्ञानेश्वरांनी केला आहे. पण हा उपदेशही ज्ञानेश्वरांनी किती काव्यात्‍मक केला आहे पहा. ज्या भ्रमराला उपदेशून ते बोलताहेत, तो भ्रमर कसा? तर त्याच्या विहरण्यालाही एक नाद आहे. हा नादही अतिशय नाजूक असा आहे. अर्थात या नादामधून त्याचे स्वच्छंद विहरणे साकारून जाते.

परमेश्वराच्या चरणकमळाचा भोग निश्चिंतपणे घे. त्याच्या गंधामध्ये तू दंग होऊन जा. या गंधाचा तू जाणकार आहेस. असे भाग्य लाभलेल्या सुंदर भ्रमरा, विठ्ठल हाच या जगाचा एकमेव त्राता आहे हे लक्षात घे आणि त्याच्या चरणकमळावर लीन हो.

मानवी मनाला भ्रमर कल्पिणे यातच ज्ञानेश्वर प्रतिभेचे वेगळेपण सामावले आहे.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  लता मंगेशकर
  रामदास कामत