A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रुसली राधा रुसला माधव

रुसली राधा, रुसला माधव, रुसलें गोकुळ सारें ।
कुंजवनीं लतिकाही रुसल्या तरूवरि जणुं अनुरागें ॥

किति काळ असा धरुनि अबोला ।
रुसुनि बैसली मोहन-राधा ।
कोणी वदावें आधीं नकळे ॥
अनुराग - प्रेम, निष्ठा.
नाटक बसवण्यापूर्वी

पुष्कळदां आपण पाहातों कीं, मुळांत चांगल्या असलेल्या नाटकाचा जेव्हां प्रयोग केला जातो, तेव्हां तो कंटाळवाणा होतो. विशेषतः व्यावसायिक कंपन्या करीत असलेल्या नाटकांचे प्रयोग जेव्हां ॲमेच्युअर्स संस्था करतात, तेव्हां तर हा दोष ठळकपणे दिसून येतो. खरें म्हटलें, तर एखादें साधारण नाट्यगुण असलेलें नाटकहि, दिग्दर्शनाच्या कौशल्यामुळे, रंगभूमीवर प्रेक्षणीय वाटतें. उलट, ही दिग्दर्शनाची दृष्टि नसेल, तर चांगल्या नाटकाचीहि माती होते. यासाठीं ॲमेच्युअर्स संस्थांना मार्गदर्शन व्हावें, म्हणून कांहीं एकांकिकांची, दिग्दर्शनाच्या सूचनांसह, पुस्तकें प्रसिद्ध करण्याची अभिनव योजना अंमलांत आणण्यांत येत आहे.

'नाटक बसवणें' म्हणजे काय, याची खरोखरच कांहीं जुन्या नटश्रेष्ठांना देखील नीटशी जाणीव असलेली दिसत नाहीं. 'नाटक बसवणें' म्हणजे नक्कल तोंडपाठ करणें, शब्दोच्चार स्पष्ट करणें आणि 'पिट' पर्यंत ऐकूं जाईल एवढ्या मोठ्यानें बोलगे, यापेक्षां त्यांना जाणीव असलेली दिसत नाहीं. फार फार तर शब्दांतील आशयाप्रमाणें हातवारे केले म्हणजे झाले. या बाबतींत जुन्या तालीम मास्तरांच्या अनेक नवलकथा मी ऐकलेल्या आहेत. अर्थातच, जुन्या नाटकांत पात्रे संवादापेक्षां संभाषणच जास्त बोलत असल्यामुळे, हीं संभाषणे चोख पाठ करून घेणें, हेंच तालीममास्तराचें मुख्य काम असे. नाटककारानें जें लिहिलें आहे तें प्रेक्षकांपर्यंत पोचवणें, एवढेच नटाचें काम. अर्थातच, पूर्वीच्या नाटकांचा भर त्यांतील संगीतावर असल्यामुळे पात्रें काय बडबडतात, इकडे प्रेक्षक सहसा मनापासून लक्ष देत नसत. त्यांच्या अभिनयाकडेहि त्यांचें लक्ष नसे. लक्ष असे ते अमूक एक नट अमुक गाणें कसें म्हणतो याकडे. यामुळे पूर्वी होऊन गेलेल्या अनेक गायक नटांनीं संगीताच्या जोरावरच आपले नांव केलें हे दिसून येईल. 'महाराष्ट्र नाटक मंडळी'सारख्या गद्य कंपन्यांत मात्र संगीताची उणीव भरून काढण्यासाठी अभिनयादि इतर गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावें लागे. पण त्यावेळचीं नाटकें पाहिलेल्या प्रेक्षकांना, त्यावेळचे गद्य नट आवाज 'लावण्या'ची कसरतच जास्त करीत असत, हे आठवत असेल. त्यामुळे 'नाटक बसवणें' या बाबतींतील या गद्य नाट्यसंस्थांची व्याख्याही परिपूर्ण नव्हती.

जेव्हां सामाजिक नाटकांचा जमाना सुरू झाला- विशेषतः विदेशी नाटकांची छाप आपल्या नाटककारांच्या नाटकांवर आणि त्यांतही, संवादपद्धतीवर पडूं लागली, तेव्हांच 'नाटक बसवण्या'च्या आणखी कांहीं क्लृप्त्या आहेत, हें उपलब्ध झालें; व पूर्वी रंगभूमीवर आलेलीं पात्रे खिळे ठोकलेल्या येशु ख्रिस्ताप्रमाणे एकाच जागीं खिळून उभीं राहात, तीं आतां ह्या नवीन पद्धतीच्या नाटकांतून रंगभूमीवर मोकळेपणाने वावरूं लागलीं. त्यामुळे रंगभूमीवर जास्त जिवंतपणा आला. नाटककारानें जें प्रत्यक्ष लिहिलेलें नाहीं, तें रंगभूमीवर दिसून येऊन प्रयोगांत जास्त जिवंतपणा दिसूं लागला, त्यांत सजीवता आली. पात्रांची ऊठबस, दोन पात्रे बोलतांना त्यांच्या संवादांतील आशयाप्रमाणें त्यांची होणारी हालचाल, इतर पात्रें तेथें असल्यास त्यांच्यावर होणारे परिणाम हें सर्व पाहातांना प्रेक्षकांना त्या पात्रांबद्दल आत्मीयता वाहूं लागली. पूर्वी पात्रे बोलतांना क्वचितच एकमेकांकडे पाहात. प्रेक्षकांसमोर तोंड करून जणूं काय त्यांनाच उद्देशून तीं बोलत. अलिकडच्या नाटकांत जास्त स्वाभाविकता आली. ह्या स्वाभाविकतेचा तुच्छतापूर्वक उल्लेख करणारी कांहीं जुनीं खोडे आजही दिसून येतात. परंतु, यांचीं मतें किती बुरसलेलीं आहेत, हें त्यांच्याशीं नाट्याबद्दल दहा मिनिटें बातचीत केली, तर सहज दिसून येते. नाटक हे कृत्रिमच असले पाहिजे, हीच या जुनाट लोकांची कल्पना. त्यामुळें, आजकालच्या सामाजिक नाटकांत येणार्‍या सामाजिक समस्याही त्यांना नाट्याला पोषक वाटत नाहींत. परंतु, आतां जो हा नवीन नाट्यप्रकार रंगभूमीवर निर्माण झाला आहे, त्यांत पिछेहाट होण्याचा सुतराम् संभव नाहीं. नाटक हे रंगभूमीवरील केवळ करमणुकीचे साधन नसून त्याचा जीवनाशीं आतां घनिष्ट संबंध जडला आहे. नाटकांतून जीवन प्रकट करण्याचा आधुनिक नाटककारांचा उद्देश सफल होत चालला आहे. अशा वेळींच हीं नाटकें लोकांसमोर जास्त स्वाभाविक स्वरूपांत ठेवणें, ही नाट्य-दिग्दर्शकावरील जबाबदारी वाढली आहे. मूळ नाटकांतील जिवंतपणा तितक्याच किंबहुना कंकणभर जास्त जिवंत स्वरूपांत प्रेक्षकांसमोर मांडण्याची त्याच्यांत कुवंत पाहिजे. ही कुवत अंगी येण्यासाठीं नित्य नवीं नवीं नाटके बसवण्याचे त्याने प्रयत्‍न केले पाहिजेत. चांगलीं बसवलेलीं इतरांची नाटकें लक्षपूर्वक पाहिली पाहिजेत. नाटककार नाटकांत प्रत्येक बारीक सारीक गोष्ट लिहीत नसतो. ती दिदर्शकानें कौशल्यानें टिपून घेतली पाहिजे. त्याचा आशय आपल्या दिदर्शन कौशल्यानें प्रेक्षकांना दाखवला पाहिजे. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे नाटककाराने आपला जीव ओतून तयार केलेल्या बाहुलीला सुंदर वस्त्रालंकारांनीं नटवून प्रेक्षकांपुढे तिला ठेवली पाहिजे. या बाबतींत 'नाट्यनिकेतन' च्या नाट्यप्रयोगांची नेहमींच प्रशंसा होते. हीं नाटकें कशी बसवली जातात, हे पाहाण्याची अनेक प्रेक्षकांना उत्कंठा असते. ती जरी पूर्ण करतां आली नाहीं, तरी त्यांना या एकांकिकेच्या शेवटीं दिलेल्या ठोकळ सूचनांवरून त्याची थोडीफार कल्पना येईल. विशेषतः, नाटके बसवूं पाहाणार्‍या ॲमेच्युअर नाट्यसंस्थांना त्यामुळे थोडेफार मार्गदर्शन होईल. नोटेशनचीं पुस्तकें वाचून जसें गातां येणार नाहीं, तसेंच ह्या दिग्दर्शनाच्या सूचना वाचून नाटक बसवतां येईल असेही नाहीं. परंतु, ज्याला थोडीफार नाट्यदृष्टि आहे, त्याला मात्र त्यांतून कांहीं कल्पनांचा पुरवठा होईल. नाटक कसें बसवावें, याची साधारण तरी कल्पना यावी, म्हणून प्रथम कांहीं एकांकिकाच दिग्दर्शनाच्या सूचनांसह प्रसिद्ध करण्यांत येणार आहेत. व हा प्रयत्‍न यशस्वी झाल्यास नंतर मोठीं संपूर्ण नाटकें प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. या परिश्रमांचा कांहीं उपयोग झाला, तर लेखकाला श्रमपरिहाराचें समाधान लाभेल.
(संपादित)

मोतीराम गजानन रांगणेकर
'तुझं माझं जमेना' या एकांकिकेच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- वि. र. बाम (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.