क्रमिन वाट एकाकी ब्रह्मसाधनेची
कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची
अढळ त्या ध्रुवावरती दृष्टि यात्रिकाची
मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची
स्वप्न रंगले रात्री धुंद प्रेमिकांचे
वाटते आता होते पतन या मनाचे
मृगजळात का भागे तृषा तृषार्ताची?
गीत | - | वसंत कानेटकर |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | रामदास कामत |
नाटक | - | मत्स्यगंधा |
राग | - | वृंदावनी सारंग |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
तृषा | - | तहान. |
ध्वजा कौपिनाची | - | भगवा ध्वज (रूपकात्मक अर्थ). |
पतन | - | अधोगती / नाश. |
मृगजळ | - | आभास. |
कौपिनेश्वर म्हणजे शंकर.. कौपिनं या संस्कृत शब्दाचे वेगवेगळे अर्थ..
मात्र ह्या विशिष्ट गाण्याच्या संदर्भात हे इतर व्याकरणसिद्ध अर्थ उपयोगी नाहीत, असं मला वाटतं. वसंत कानेटकर ह्यांचं हे पद त्यांच्या मत्स्यगंधा नाटकातील आहे. तो प्रसंग ध्यानी घेतला तर त्या शब्दाचा मी जो लावला आहे तो अर्थ अधिक संयुक्तिक वाटेल.
मत्स्यगंधेच्या मोहात काही काल गुरफटलेला पराशर भानावर येउन तिचा निरोप घेतो आहे आणि त्याचं ह्या प्रवासाचं मूळ उद्दिष्ट तो तिला सांगतो आहे..
'साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची..' पुढच्या ओळी ह्या दृष्टीने अधिक बोलक्या आहेत.
'कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची.. अढळ त्या ध्रुवावरती दृष्टी यात्रिकाची.. मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची..' हे रूपक ध्यानी घेतले तर देवळाचा कळस आणि त्यावरचा (संन्यस्त वृत्तीचा निदर्शक) भगवा ध्वज हाच अर्थ कवीच्या मनांत असावा असं वाटतं.
सुधीर मोघे
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.