A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी

सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
विसरुनी गेले देहभान

गोजिरे हे रूप पाहुनिया डोळा
दाटला उमाळा अंतरी माझ्या
तुकयाचा भाव पाहुनी निःसंग
तारिले अभंग तूच देवा

जगी कितीकांना तारिलेस देवा
स्वीकारी ही सेवा आता माझी
कृपाकटाक्षाचे पाजवी अमृत
ठेव शिरी हात पांडुरंगा
एच.एम.व्ही.तल्या रेकॉर्डिंग क्षेत्रात संगीत दिग्‍दर्शक व गायक म्हणून अशा काही जोड्या तयार झाल्या होत्या. अर्थात त्या जोड्या त्यांच्या गाण्यांच्या लोकप्रियतेच्या आधारावर होत गेल्या व त्या जोड्यांची नवीन रेकॉर्ड केव्हा बाहेर येते याची रसिक उत्‍कंठतेने वाट बघत. वसंत प्रभू - लता मंगेशकर, सुधीर फडके - आशा भोसले, यशवंत देव - सुधीर फडके या जोड्यांच्या बरोबरीने आणखी एक लोकप्रिय जोडी होती ती म्हणजे दशरथ पुजारी-सुमन कल्याणपूर. सुमनताईंनी गायलेली माझ्या चालीची ४०-५० गाणी तरी लोकांच्या ओठी होती. सुमन कल्याणपूर हे त्यांचं लग्‍नानंतरचं नाव. लग्‍नाआधी त्या सुमन हेमाडी होत्या.

'सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले' व त्या रेकॉर्डच्या पाठीमागे 'नंदाघरी नंदनवन फुलले' ही दोन्ही गाणी त्यांनी खूपच सुंदर गायलेली आहेत.. लग्‍नाआधी किमान चार-पाच वर्षे. त्या गाण्यातील सुरेलपणा व मुलायमपणा यांमुळे ती गाणी कोणालाही आवडण्यासारखी आहेत. त्यानंतर त्यांना मराठी व हिंदी चित्रपटांत पार्श्वगायनाची संधी मिळाली. त्यांच्या गाण्याबद्दल मला एकच सांगायचं आहे की त्यांचा आवाज गोड तर आहेच पण त्यामध्ये भाव प्रकट करण्याची महान शक्ती आहे. त्या गाताना इतक्या तल्लीन होऊन गात असत की त्यांचं लक्ष आजूबाजूला कुठेही नसायचं. फक्त त्या गाण्यामध्ये, त्या स्वरांमध्येच ! गायकांनी स्वरांशी कशी इमानदारी ठेवायला हवी याचा तो आदर्श आहे. आतापर्यंत त्यांनी गायिलेली सर्व गाणी अप्रतिम आहेत. भावनात्मक व चालीला न्याय देईल अशा आवाजात म्हटलेली आहेत. शब्दावर कुठे जोर द्यायचा, कुठं हलकेच म्हणायचा याबद्दल त्यांच्या मनातल्या कल्पना पक्क्या आहेत. त्यांच्या गाण्याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम असायचा की हे गाणं लता मंगेशकर यांनी गायिलेलं असावं इतकं दोघींच्या आवाजात साधर्म्य होतं.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख