A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सकल चराचरिं या तुझा असे

सकल चराचरिं या तुझा असे निवास ॥

पाषाणाच्या अससि जरी मूर्तिमधीं ।
उपलहृदयिं वससि खास ॥
गीत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी
स्वराविष्कार- मास्टर दीनानाथ
पं. जितेंद्र अभिषेकी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - भावबंधन
राग - बिहाग
ताल-पंजाबी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
उपल - दगड.
'भावबंधन' हे गडकर्‍यांचे रंगभूमीवर आलेले शेवटचे संपूर्ण नाटक. या नाटकाच्या लेखनाची सुरवात गडकर्‍यांनी १९१८ साली केली होती. या नाटकाच्या शेवटच्या प्रवेशाचे लेखन गडकर्‍यांनी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या दिवस पूर्ण केले. 'भावबंधन' नाटक पूर्ण करण्याच्या बाबतीत काळपुरुष आणि लेखणी यांच्यात जणू काही शर्यतच लागली होती. ती अखेर गडकर्‍यांनी जिंकली. 'भावबंधन' नाटकाच्या शेवटच्या प्रवेशांना अशा रीतीने मराठी साहित्यात एक निराळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

'गंधर्व नाटक मंडळी'साठी गडकरी 'एकच प्याला' नाटक लिहित होते, ते १९१७ सालच्या डिसेंबर महिन्यात पूर्ण झाले. 'एकच प्याला' नाटकाचा शेवटचा मजकूर ज्या लेखनिकाने लिहिला त्याचे नाव चिंतामणराव कोल्हटकर. त्याचवेळी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दुसरी फाटाफूट होऊन चिंतामणराव, मास्टर दीनानाथ आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी १-१-१९१८ रोजी स्वतःच्या 'बलवंत संगीत नाटक मंडळी'ची स्थापना केली. गडकर्‍यांचे 'भावबंधन' नाटक आपल्याला मिळणार या एकमेव आधारावरच या नटांनी नवीन नाटयसंस्था स्थापना करण्याचे धाडस केले होते. 'भावबंधन'चे लेखन शक्य तितक्या लवकर हातावेगळे करायची उमेद गडकर्‍यांना वाटत होती. पण १९१८ सालच्या एप्रिल महिन्यापासून कफ, खोकला, ताप आणि संधिवात या विकारांनी त्यांना अधिकच पछाडले आणि त्यात कफक्षयाची भर पडली ! 'भावबंधन' नाटक पूर्ण करण्यासाठी गडकर्‍यांनी, जणू काही, काळाशी शर्यतच आरंभिली होती. औषधी उपायांचा उपयोग होईना म्हणून त्यांचे वडील बंधू सीतारामपंत यांनीही यांना सावनेर येथे नेण्याचे निश्चित केले; 'भावबंधन' नाटकाप्रमाणेच गडकर्‍यांच्या जीवनाचा शेवटही त्यावेळी जवळ आला होता !

सावनेरच्या प्रवासात गडकर्‍यांची आणि तात्यासाहेब कोल्हटकरांची अचानक भेट झाली. गडकर्‍यांच्या आयुष्यातील ते शेवटचे सुखाचे क्षण होते. सावनेर येथे गेल्यापासून त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि २३-१-१९१९ रोजी गडकरी मरण पावले ! त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या चोवीस तासांत 'भावबंधन' नाटकाचा शेवटचा मजकूर त्यांनी त्यांच्या लेखनिकांकडून लिहून घेतला.

'पुण्यप्रभाव' नाटकात गडकर्‍यांच्या तेजस्वी प्रतिभेचे दर्शन घडल्यानंतर ते एकापेक्षा एक सरस अशी नाटके लिहितील अशी रसिकांची अपेक्षा असल्यामुळे, त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच अखिल महाराष्ट्र हळहळला. 'एकच प्याला' आणि 'भावबंधन' ही नाटके रंगभूमीवर येणार आहेत हे रसिकांना समजल्यावर त्या नाटकांची ते एखाद्या चातकाप्रमाणे मार्गप्रतीक्षा करू लागले. १९१९ मार्च महिन्यात 'गंधर्व नाटक मंडळी'च्या रंगभूमीवर आलेले 'एकच प्याला' नाटक पाहणे हा एक रोमांचकारी अनुभव असल्यामुळे, 'भावबंधन' नाटकाचा प्रयोग पहायला असंख्य रसिक कमालीचे उत्सुक होते. 'भावबंधन' नाटकाला लाभली तशी भावनात्मक पार्श्वभूमी दुसर्‍या कोणत्याही मराठी नाटकाला लाभली नाही. १९१९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात 'भावबंधन' नाटक 'बलवंत संगीत' मंडळीच्या रंगभूमीवर येताच, कनकय्या नायडूंचे षट्कार पहायला जमावी तशी उत्सुक रसिकांची गर्दी बलवंतांच्या रंगमंदिरात जमू लागली.

तो सोहळा पहायला गडकरी मास्तर मात्र हयात नव्हते ! 'पुण्यप्रभाव' नाटकाच्या पुण्यातील पहिल्या प्रयोगाच्या वेळी गडकर्‍यांना झालेला आनंद हा त्यांच्या नाटकाने त्यांना दिलेल्या आनंदाचा उच्चांक होता. 'एकच प्याला' आणि 'भावबंधन' या नाटकांचे प्रयोग जर यांनी पाहिले असते तर त्यांचा आनंद गगनात मावला मावला नसता, कदाचित त्यांची प्रकृतीसुद्धा सुधारली असती !
(संपादित)

वसंत शांताराम देसाई
'गडकर्‍यांची नाट्यसृष्टी' या वसंत शांताराम देसाई लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सोमैया पब्लिकेशन्स प्रा. लि., मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मास्टर दीनानाथ
  पं. जितेंद्र अभिषेकी