अंधार रातीचा कुठं दिसंना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव, केली कशी करणी?
सख्या रे, घायाळ मी हरिणी
काजळकाळी गर्द रात अन् कंप कंप अंगात
सळसळणार्या पानांनाही रातकिड्यांची साथ
कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावुनी
गुपित उमटले चेहर्यावरती भाव आगळे डोळ्यांत
पाश गुंतले नियतीचे रे तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवुनी
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | भास्कर चंदावरकर |
स्वराविष्कार | - | ∙ लता मंगेशकर ∙ रवींद्र साठे ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | सामना |
राग | - | सोहनी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
तेव्हापासून आजपर्यंत कविवर्य सुरेश भटांच्या शब्दांत थोडा बदल करून-
'तसे किती काटे रुतले आमुच्या गतीला
तुझा सूर केवळ राही सदा सोबतीला..'
असा लताबाईंचा स्वर आपणा सार्यांच्या जगण्याला अमृतसंजीवन देत आलाय.
१९७४ च्या सुमारास डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शन करीत असलेल्या 'सामना' या चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाला उपस्थित राहायची संधी मिळाली. मुंबईत बांद्रा (पश्चिम) येथे असलेल्या मेहबूब स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण व्हायचं होतं. संगीतकार भास्कर चंदावरकरांनी दोन गाण्यांचं ध्वनिमुद्रण करायचं योजलं होतं. चार तासांच्या शिफ्टमध्ये (प्रादेशिक) चित्रपटाची दोन गाणी करण्याची मराठी चित्रपटसृष्टीला मुभा होती. त्यानुसार 'या टोपीखाली दडलंय काय?' आणि 'सख्या रे, घायाळ मी हरिणी..' या दोन गाण्यांचं ध्वनिमुद्रण करायला वाद्यवृंद संयोजक इनॉक डॅनियल्सजी त्यांच्या वाद्यवृंदासह सज्ज होते. प्रथम 'या टोपीखाली दडलंय काय?' या गाण्याचं ध्वनिमुद्रण सुरू झालं..
मी पहिल्यांदाच चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिग अनुभवत होतो..
ताज्या दमाचा पार्श्वगायक रवींद्र साठे, गायिका उषा मंगेशकर यांच्या गायनासह श्रेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागूही गाण्यात काही मजेदार संवाद म्हणणार होते.. आयत्या वेळी एक-एक शब्द (कोकिळा आणि कबूतर) म्हणायला चित्रपटाच्या दृश्यातल्या जमावातल्या कुणा दोघांकरिता अस्मादिक आणि दिग्दर्शक जब्बार पटेलही त्या ध्वनिमुद्रणात सहभागी झाले. गाण्याचा संगीतकारांना अपेक्षित असा अप्रतिम टेक झाला.
पुढल्या गाण्याची तयारी सुरू झाली. 'सख्या रे, घायाळ मी हरिणी..' हे गाणं लताबाई गाणार होत्या. परंतु काही कारणानं कुठल्याशा हिंदी चित्रपटाच्या त्यांच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण लांबल्यामुळे त्यांनी 'पायलट' (तात्पुरत्या) गायकाकडून गाण्याचं वाद्यवृंदासह ध्वनिमुद्रण करण्याची सूचना टेलिफोनद्वारा दिली. आयत्या वेळी मग अतिशय शीघ्र ग्रहणशक्ती असलेल्या पार्श्वगायक रवींद्र साठेला संगीतकार चंदावरकरांनी गाण्याची चाल शिकवली आणि रवींद्र साठेनं पहिलाच टेक ओके गायला.
त्यानंतर काही दिवसांनी अखेरीस तो क्षण आला.. मेहबूब रेकॉर्डिग स्टुडिओच्या लोखंडी जिन्याच्या पायर्या चढून लताबाई ध्वनिमुद्रणाच्या दालनात प्रवेशल्या. त्या क्षणाला त्या गाण्याविषयी त्यांना काही म्हणजे काहीच ठाऊक नव्हतं.. सुहास्य मुद्रेनं सर्वानी केलेल्या स्वागताचा स्वीकार करत त्यांनी गाण्याचे शब्द स्वत:च्या अक्षरात कागदावर लिहून घेतले. आणि रवींद्र साठेनं गायलेलं गाणं त्या अत्यंत एकाग्रतेनं ऐकत गेल्या. ऐकत असतानाच त्या पुढ्यातल्या गाण्याच्या (कागदावरल्या) ओळींवर सांकेतिक खुणा करत गेल्या. गाणं संपलं. तसं म्हणाल्या, ''चला, टेक करूयात..'' मी पाहतच राहिलो..
गाण्याच्या आरंभीच्या तालमुक्त चार ओळी ('हा महाल कसला.. रानझाडी ही दाट.. वगैरे) रवींद्रनं केवळ व्हायब्रोफोन आणि स्पॅनिश गिटार यांच्या सुट्या सुरांच्या लडींसह आणि गाणं वाजवणार्यांच्या (नार्वेकरसाहेब) व्हायोलिनच्या साथीनं गायल्या होत्या. रवींद्रचा आवाज वगळून केवळ व्हायब्रोफोन आणि स्पॅनिश गिटारच्या साथीनं त्या आता गाणार होत्या..
सुरुवातीच्या तालविरहित मुक्त पद्धतीनं गायलेल्या-
'हा महाल कसला.. रानझाडी ही दाट..
अंधार रातीचा.. कुठं दिसंना वाट
कुन्या द्वाडानं घातला घाव.. केली कशी करनी..
सख्या रे.. सख्या रे..
सख्या रे, घायाळ मी हरिणी..'
यातल्या शेवटच्या ओळीतल्या 'घायाळ मी हरिणी..'च्या 'णी'वर ध्वनिमुद्रित तबल्याची सम अत्यंत स्वाभाविकपणे- म्हणजे जणू काही त्या क्षणी साथ करत असलेल्या तबल्याची सम यावी तशी आली आणि त्या पुढेपुढे गात राहिल्या. शब्दाशब्दांतला भाव.. दोन शब्दांमधल्या विरामात लपलेला भाव स्वरांकित करत, त्या गाण्याला संजीवन देत त्यांनी आपल्या परिसस्पर्शानं त्या गाण्याचं त्यांनी सोनं केलं..
टेक संपल्यावर उपस्थित सर्व मंडळी भारावून गेली होती. कुठल्याशा तांत्रिक कारणास्तव ध्वनिमुद्रक टागोरसाहेबांनी लताबाईंना आणखी एक टेक देण्याची विनंती केली. आणि दुसरा टेकही त्या अगदी तंतोतंत पहिल्या टेकसारखाच (म्हणजे खरं तर त्याला हल्लीच्या कॉम्प्युटरच्या भाषेत 'कट-पेस्ट' म्हणता येईल !) गाऊन गेल्या. हे.. हे सगळं अशक्य होतं.. अतर्क्य होतं. म्हणजे पंधरा मिनिटांपूर्वी काहीच माहिती नसलेलं गाणं कुणीतरी एका.. फक्त एकाच श्रवणात आत्मसात करून त्याच्यामध्ये आपल्या अलौकिक प्रतिभेनं प्राण फुंकून त्या गाण्याला हजारांनी, लाखांनी गुणून त्याला सर्वोत्कृष्टतेचा दर्जा प्राप्त करून देऊ शकतं- हे मी प्रथमच अनुभवत होतो. ध्वनिमुद्रक टागोरसाहेबांचं समाधान होताना त्या गायलेलं गाणं न ऐकताच (कारण गातानाच त्यांना माहीत होतं, की ते सर्वोत्तमच होणाराय !) सर्वाचा निरोप घेऊन गेल्यासुद्धा..
(संपादित)
आनंद मोडक
सौजन्य- दै. लोकसत्ता (५ मे, २०१३)
(Referenced page was accessed on 21 May 2015)
Print option will come back soon