चांद येई अंबरी
चांदराती रम्य या, संगती सखी प्रिया
प्रीत होई बावरी
मुग्ध तू नि मुग्ध मी, अबोल गोड संभ्रमी
एकरूप संगमी
रातराणीच्यामुळे, श्वास धुंद परिमळे
फुलत प्रीतीची फुले
प्रणयगीत हे असे, कानी ऐकू येतसे
गीती शब्द ना जरी
सांजरंगी रंगुनी, न कळताच दंगुनी
हृदयतार छेडुनी
युगुलगीत गाउनी, एकरूप होउनी
देऊ प्रीत दावुनी
प्रणयचित्र हे दिसे, रंगसंगती ठसे
कुंचला नसे जरी
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | अरुण दाते, लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | युगुलगीत, शब्दशारदेचे चांदणे, भावगीत |
कुंचला | - | रंग देण्याचा ब्रश. |
तलत महमूद आणि लताच्या आवाजात त्या गीताची काही वर्षांपूर्वी एच्.एम्.व्हीत तालीम झाली. आणि संपामुळे ते गाणे जे दृष्टिआड झालं, ते परवा दोन दशकांनंतर ध्वनिमुद्रित झालं. आजही ते नवं वाटतं हे कर्तुत्व मात्र नि:संशय समर्थ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांची ! माझ्या गीतरचनांमधील स्फूर्तीही ही अशी परभावांची ! ती आपलीशी करण्याचा माझा प्रयत्न असतो, एवढंच !
माझ्या पहिल्या गीतरचना मुरलीधराच्या कृपेने किंवा प्रसादाने श्रीकृष्णासंबंधीच्या आहेत. निळासावळा नाथ, कंठातच रुतल्या ताना, जाहले धुंडुनिया गोकुळ ही याची काही उदाहरणे. त्याकाळी कृष्णकवि म्हणून लैकिक असणार्या सदाशिव अनंत (स. अ.) शुक्ल या कवीनी मुद्दाम भेटून मला शाबासकी दिली. कवी शुक्ल हे माडगूळकरांचेही गुरू म्हणून त्यांच्याबद्दल मला फार आदर वाटत असे. उत्कृष्ट ज्योतिषी असा लौकिक असणार्या शुक्लांनी एक दिवस मला सांगितलं, "तुम्ही लोकप्रिय होणार की नाही हे तुमच्या गाण्याच्या बाबतीत न सांगता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही तुमच्या गाण्याचा एक रसिक वर्ग निश्चितच तयार कराल."
त्या दिवसापासून माझी एक धारणा अशी झाली आहे की, माणसासारखीच प्रत्येक गाण्याची एक कुंडली असते. माझं 'संधीकाळी या अशा' हे गीत कोणे एके काळी वैभवाच्या आणि लोकप्रियतेच्या शोखरावर असलेल्या तलत महमूद या गायकाबरोबर, लता मंगेशकरांच्या आवाजात रिहर्सल होऊन, केवळ रेकॉर्ड व्हायचं जे थांबलं, ते पुरेपूर वीस वर्षांनंतर ध्वनिमुद्रित झालं.
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
सौजन्य- चित्ररंग, दिवाळी अंक (१९६७)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.