शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा?
भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | मीना खडीकर |
स्वर | - | योगेश खडीकर, रचना खडीकर, शमा खळे |
गीत प्रकार | - | बालगीत |
ढोपर | - | गुडघा. |
एकदा टीव्हीवर कविवर्य मंगेश पाडगांवकरांनी एक बालकविता वाचली. मला ती प्रचंड आवडली. तिचं सुरेख गाणं होऊ शकतं असं वाटून गेलं. मी लगेचच मंगेशरावांना फोन केला आणि ती कविता मागितली, त्यांनी आनंदानं दिली. ते गाणं अजूनही गाजतं आहे. 'सांग सांग भोलानाथ.
'पिरपिर पावसाची', 'एऽ आई मला पावसात जाऊ दे', 'ये रे ये रे पावसा रुसलास का' या गाण्यांचीही रेकॉर्ड निघाली. ही सारी पावसातली बालगीतं. लहान मुलांची गाणी लहान मुलांनीच गायली पाहिजेत असा माझा हट्ट होता. ही कल्पना तेव्हा नवीन होती. बालगीतंही मोठी माणसंच गायची. योगेश, रचना (मीनाताई मंगेशकर-खडीकर यांची मुले) हे घरचे बालगायक होतेच. शिवाय श्रीनिवास खळ्यांची मुलगी शमासुद्धा गायली.
माझी बालगीतं खूप लोकप्रिय झाली. मराठीतच नव्हे, तर गुजरातीत आणि बंगालीतही त्यांचे अनुवाद झाले. तेव्हा लहान असलेला, आजचा तरुणांच्या आवडीचा गायक 'शान' अणि त्याची बहीण बंगाली रेकॉर्डसाठी गायले. गुजराती रेकॉर्डसाठी 'साधना सरगम' आणि इतर बालकलाकार गायले.
कमीतकमी गाणी गाऊन जास्तीतजास्त काळ गाजत राहण्याचा विक्रम करणारे गायकही आमच्या घरात आहेत; 'योगेश आणि रचना'.
(संपादित)
मीना मंगेशकर-खडीकर
'मोठी तिची सावली' (शब्दांकन- प्रवीण जोशी) या पुस्तकातून.
सौजन्य- परचुरे प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.