A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांज ये गोकुळी

सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळ्याची जणू साउली

धूळ उडवीत गाई निघाल्या
श्यामरंगात वाटा बुडाल्या
परतती त्यासवे
पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राउळी

पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले
चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली

माउली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्‍यावरी
वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी
गीत- सुधीर मोघे
संगीत - श्रीधर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट- वजीर
राग- पूर्वा कल्याण
गीत प्रकार - चित्रगीत
राऊळ - देऊळ.
कविवर्य गदिमांच्या मृत्युनंतर पुढच्याच वर्षी, त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाला आम्ही मुंबई दूरदर्शनवरून एक अनोखा कार्यक्रम सादर केला होता. निर्माता अर्थातच अरुण काकतकर. बाबूजींच्या घरी जुनी कागदपत्रं पहात असताना, गदिमांच्या हस्ताक्षरातील काही अप्रकाशित गीतं सापडली. काही कारणाने ध्वनीमुद्रित न होता बाजूला राहिलेली.. एक कल्पना आली की बाबुजींकरता केलेली ती गाणी श्रीधरने स्वरबद्ध करायची आणि त्यावरच आधारित कार्यक्रम करायचा.. आणि तो केलाही.. 'कोवळे काव्य इथे जन्मते' असं त्याचं शीर्षक होतं. त्यामध्ये एक सुंदर गाणं होतं 'जाग रघुनंदना, कोकिळा बोलते..' ती चाल खूपच छान झाली होती.त्याची ध्वनिमुद्रिका निघण्याची शक्यता दिसू लागली होती. पण त्या जोडीला एखादं नवं गाणं हवं म्हणून अस्मादिकांची योजना झाली. बोलताबोलता अजित सोमणने चांगली कल्पना सुचवली, 'गदिमांचं गाणं भूपाळीसारखं पहाटेचं आहे. तू संध्याकाळ का घेत नाहीस?' मला ती गोळी बरोबर लागली. श्रीधरने चालीचा एक फक्त मुखडा तयार केला. तोही सायंकालीन स्वरांची छाया असलेला. त्या स्वरांच्या अनुरोधाने मला मुखडा सुचला आणि पुढचं काव्य मी माझ्या अंदाजाने लिहिलं..

सांज ये गोकुळी..
सावळी.. सावळी..
सावळ्याची जणू साउली..

धूळ उडवीत गाई निघाल्या
श्यामरंगात वाटा बुडाल्या
परतती त्यासवे
पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राउळी..

माउली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्‍यावरी
वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी

मुळात ही दोनच कडव्यांची कविता होती. कित्येक दिवस श्रीधर ती तशी गातही होता. मग त्याला वाटू लागले की रेकॉर्डसाठी ही खूपच लहान आहे. ह्यात आणखी एक तरी अंतरा पाहिजे. त्यामुळे त्याने माझ्यामागं टुमणं लावलं - 'तिसरा अंतरा पाहिजे' म्हणून ! मी त्याला म्हंटलं, "तिसरा की दुसरा की पहिला ते तू सांगू नको. एक अधिक अंतरा पाहिजे एवढंच मी बघणार."

एखादं पूर्ण केलेलं डिझाईन वाढवायचं तर कुठे जागा आहे हे त्या कलाकारालाच कळणार. माझ्या एकच ध्यानी आलं, इथे दोन कडव्यांच्या मध्ये जागा आहे.. पण खरं तर कुठेच घुसायला जागा नाही अशी ही घट्ट वीण आहे. असं काहीतरी मध्ये यायला हवं की स्वत:लाही कळणार नाही की मुळात मध्ये नव्हतं म्हणून. तेव्हा मी वाट पाहत राहिलो. अगदी खरं सांगायचं तर वाट पाहण्याचा विचारही मनातून काढून टाकला. फक्त मनाची कवाडं उघडी ठेवली आणि एके दिवशी कुठूनतरी सरसरून ओळी आल्या..

पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दात रेघ
होई डोहातले
चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली..
(संपादित)

सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे
सौजन्य- शुभदा मोघे

  इतर संदर्भ लेख


मध्यंतरी आकाशवाणी नाशिक केंद्रावर एक प्रदीर्घ मुलाखत ध्वनिमुद्रित झाली. मुलाखत घेतली होती कविमित्र किशोर पाठक आणि एक तरुण कवी, या दोघांनी. बोलण्याच्या ओघात किशोरने 'सांज ये गोकुळी' या कवितेला आणि विशेषत: त्यातील 'माउली सांज.. अंधार पान्हा' या ओळीला दिलखुलास दाद दिली. 'चांदणे- पान्हा हे सुचु शकतं पण अंधार पान्हा? क्या बात है..' जिची अपूर्वाई वाटत राहावी अशी ही दाद आणि तीही सहप्रवासी कविकडून.. संतोष.. परम संतोष.. एक खरं की अशी दाद हा स्वत: कवीला नवा शोध नसतो पण नवी जाग नक्की असते. आपण जातायेता प्रकाशाचे तराणे गातो पण हृदयंगम काळोखाचे गाणे आपल्या काळजात का फुलत नाही? अशी एक हुरहूर आत खोलवर ठुसठुसत असायची ती एकदम निमाली.
जाणवलं की 'सांज ये गोकुळी' हे तर काळोखाचंच तरल सुंदर गाणं आहे.

सावळ्याची साउली भासणारी सावळी सावळी सांज..
श्याम रंगात बुडालेल्या वाटा..
काजळाची दाट रेघ तशी पर्वतराजी..
डोहातले सावळे चांदणे..
दाही दिशांतून जमू लागलेल्या सावळ्या चाहुली..
.. आणि मग तो,
सांज-माउलीचा अनावर अंधार-पान्हा..
(संपादित)

सुधीर मोघे
कविता सखी
सौजन्य- परम मित्र पब्लिकेशन्‍स्‌, ठाणे
सौजन्य- शुभदा मोघे

  इतर संदर्भ लेख

अक्षरलेखन - भालचंद्र लिमये

( 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. )

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  आशा भोसले