A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सर्वात्मका सर्वेश्वरा

सर्वात्मका सर्वेश्वरा
गंगाधरा शिवसुंदरा
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा

आदित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता
अनुदारता दुरिता हरा
गीत - कुसुमाग्रज
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार- पं. जितेंद्र अभिषेकी
रामदास कामत
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - ययाति आणि देवयानी
राग - भैरवी, कोमल रिषभ आसावरी
गीत प्रकार - नाट्यसंगीत, प्रार्थना
अनुदार - कोता, क्षुद्रबुद्धी.
आदित्य - सूर्य.
आर्य - श्रेष्ठ / पूज्य.
दुरित - पाप.
शिव - मंगल, कल्याणकारी.
कच-देवयानीच्या आख्यानावरील 'विद्याहरण' हे नाट्याचार्यांचे (कृ. प. खाडिलकर) नाटक विख्यातच आहे. त्याच्या पुढील, म्हणजे ययाति-देवयानीच्या कथाभागावर प्रस्तुत नाटक लिहिले आहे. महाभारतातील मूळ कथानक संक्षिप्त आणि स्थूल असले तरी कल्पकतेला आणि नवीन अर्थशोधाला आव्हान देण्याचे त्यातील सामर्थ्य अपार आहे.

'विद्याहरण'नंतर श्री. वि. स. खांडेकरांनी असा फार मोठा प्रयत्‍न आपल्या 'ययाति' या कादंबरीत केला आहे. या कादंबरीनेच या नाट्यलेखनास स्फूर्ती आणि पुष्कळसा आधारही दिला आहे. त्याबद्दल भाऊसाहेब खांडेकरांचा आणि प्रथमपासून प्रेरणा आणि सहाय्य दिल्याबद्दल श्री. मो. ग. रांगणेकरांचा मी ऋणी आहे.

या नाटकासाठी महाभारतातील मूळ कथानकात काही महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. नाटकासाठी जे कार्यवाही सूत्र मी गृहीत धरले त्याच्या परिपोषासाठी हे बदल मला आवश्यक वाटले. पौराणिक कथा या बहुतांशी काल्पनिक कथा असतात. लेखकाने त्यातील आपल्याला उत्कटतेने जाणवेल असे सूत्र घेऊन त्याच्याशी सुसंगत असा नवा तपशील त्याच्याभोवती उभारावा, अथवा मुळात असलेला परंतु विसंगत असा तपशील गाळावा, बदलावा, यात काहीही वावगे नाही आणि नवीनही नाही. कालिदासासारख्या कविकुलगुरूनेच ही स्वातंत्र्याची सनद नाट्यक्षेत्रासाठी मिळवून ठेवली आहे.
(संपादित)

वि. वा. शिरवाडकर
'ययाति आणि देवयानी' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

  इतर संदर्भ लेख

 

  पं. जितेंद्र अभिषेकी
  रामदास कामत