देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा ह्मणे मज विठ्ठल सांपडला ।
ह्मणोनी कळिकाळां पाड नाहीं ॥४॥
गीत | - | संत नामदेव |
संगीत | - | राम फाटक |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
राग | - | आसावरी, जोगिया, अल्हैय्याबिलावल |
गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |
कळिकाळ | - | संकट. |
निधान | - | खजिना / स्थान. |
पाडव | - | महत्व / किंमत / पक्व. |
'परंपरा' किंवा अशाच कुठल्याशा शीर्षकाखाली आकाशवाणीच्या शास्त्रीय संगीत विभागातर्फे शास्त्रीय संगीतावर आधारलेली दोन गीतं आठवड्यातून एकदा सकाळी सादर व्हायची. अशाच एका कार्यक्रमाकरिता पंडित भीमसेन जोशी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. एक गाणं माझे सहकारी अरविंद गजेंद्रगडकर स्वरबद्ध करणार होते, व एक गाणं मी करणार होतो. गीत निवडून चाल लावायची होती. वाचता वाचता मला काव्यविहारींची एक रचना बरी वाटली. दोन किंवा तीन अंतरे होते. मोठी रचना असली, तरी शब्द आणि आशय चांगला होता. म्हणून मी ती कविता स्वरबद्ध करायचं ठरवलं. चाल बांधली. मधल्या पूरक स्वरावलीही तयार केल्या. पंडितजी आले की त्यांना गाणं सांगायचं, नंतर वादकांकडून ते बसवून घेऊन ध्वनिमुद्रित करायचं अशी एकंदर ठराविक पद्धतीची योजना होती. पुण्याला आल्यावर मी प्रथमच पंडितजींना असं गाणं सांगणार होतो. तसा त्यांचा आणि माझा गेल्या २०/२२ वर्षांचा स्नेह होता. त्यांच्या बरोबरच्या सांगीतिक चर्चा, उठबस, मला नवीन नव्हतं. गाणं साकार व्हायला अडचण कुठलीच नव्हती.
रिहर्सलच्या दिवशी भीमसेन आले. गजेंद्रगडकरांनी मला सांगितलं, की मी माझं गाणं आधी सांगतो, तास अर्ध्या तासाने तुम्ही स्टुडिओत या व तुमचं गाणं त्यांना सांगा.
मी गाणं लिहिलेला कागद काढला आणि स्वररचना नेमकी आठवू लागलो. का कोणास ठाऊक माझा विचार बदलला. भीमसेनांच्या आवाजात आणि ढंगात हे काव्य कितपत वठेल याचा मला संदेह वाटला. मनात लगेच निर्णय घेतला, की गाणं बदलायचं. ते तसं सोपं नव्हतं. गाणं निवडणं यापासूनची प्रक्रिया सुरू व्हायची होती. हातातला कागद बाजूला ठेवला. माझ्या ऑफिसमधून उठून मी खालच्या मजल्यावर असलेल्या लायब्ररीत गेलो. सगळीच घाई होती. आमच्या अग्रवालबाईंना विनंती केली, की मला एखादं गाण्याचं पुस्तक द्या. मीही शेल्फवरची पुस्तके पाहू लागलो. समोर 'सकल संतगाथा' दिसली. मी ती काढली. तिथेच खुर्चीवर बसून वाचू लागलो. चार ओळींच्या एका अभंगाने माझं लक्ष वेधलं. प्रथम पंक्ती होती 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल.' सगळा अभंग वाचला. सोपा आणि साधा होता. शब्दांना ओघ होता. अभंग स्वरबद्ध करायचं मुक्रर केलं. आणि मुखडा गुणगुणायला लागलो. ते गुणगुणणं म्हणजेच अभंगाच्या पहिल्या पंक्तीची चाल. थोडक्यात, पहिली ओळ मी जी वाचली, तीच चालीत आणि मला वाटलं भीमसेनांच्या आवाजाला, ढंगाला, गायकीला ही चपखल बसेल. बरं अभंगाच्या चारच ओळी असल्याने गाणं शिकायला आणि विशेष म्हणजे नटवायला भरपूर वाव असणार. अभंग उतरून घेतला. स्वररचना सुचलेली विसरू नये म्हणून सतत म्हणत राहिलो. बाईंना पुस्तक परत दिलं आणि स्टुडिओकडे जायला निघालो. पहिली ओळ म्हणणं चालू होतं.
निऽनि साऽसासा-/ गग रे साऽ सासा-
तीऽर्थ विऽठ्ठल क्षेऽत्र विऽठ्ठल
'क्षेत्र विठ्ठल' म्हणताना माझ्या गळयातून 'ल'वरची जी एक छोटी हरकत गेली-
रे रेसा निसानि धनि
ती तर मला खास भीमसेनांकरिता आहे, असं वाटलं.
मुखडा झाला, पण सगळा अभंग स्वरबद्ध व्हायचा होता, एक नंबरच्या स्टुडिओत गेलो. शेजारी नंबर दोनचा स्टुडिओ होता. मधली भिंत म्हणजे पूर्ण काच होती. त्या स्टुडिओत गजेंद्रगडकर भीमसेनांना चाल सांगताना दिसत होते. पंडितजींचं तोंड पहिल्या स्टुडिओकडे होतं. मी आत आल्यावर माझी आणि त्यांची नजरानजर झाली. खुणेनंच त्यांनी मला काय विचारायचं ते विचारलं, म्हणजे "चाल झाली आहे का? मला लगेच सांगणार ना?" वगैरे. मीही खुणेने "गाणं तयार आहे, सांगतो" म्हटलं. काही मिनिटांत चालीचा आराखडा तरी तयार व्हायला पाहिजे होता. पेटी गजेंद्रगडकरांकडे होती. एक नंबरमध्ये एक छोटा ऑर्गन होता. मी स्टुलावर बसून ऑर्गनवर बोटे टाकली. मुखड्याला साजेसा पहिला अंतरा तयार झाला. मध्य सप्तकातल्या स्वरांनी दुसर्या अंतर्याला आकार आला. तिसरा अंतरा तार षड्जाला स्पर्श करून तिये स्थिरावला. सर्वसाधारणपणे अभंगाला आकार आला. पण तो आराखडा होता. त्याता सफाई आणायची होती. म्हणून पुन्हा पुन्हा म्हणू लागलो.
पहिल्या गाण्याची तालीम संपली होती. म्हणून मी उठलो आणि नंबर दोनच्या स्टुडिओत गेलो. पंडितजी चाल शिकण्याच्या मूडमध्ये होते. तालीम सुरू झाली. अभंग सांगतासांगता चालीला आणखी डौल पायला लागला. स्वरालंकार जास्त पक्के होऊ लागले, पंडितजींच्या भरदार, घुमारेदार आणि गहिर्या आवाजाने तर स्वर जास्त जास्त जिवंत होऊ लागले. अभंग सांगायला तसा खूप वेळ लागला नाही. एक तर गाणं अगदीच लहान होतं. शास्त्रीय संगीताची बैठक आणि चौकट नेटकी होती. आणि विशेष म्हणजे पंडितजींना अभंगाची चाल भिडली असावी. आपल्याला आवडणारी चाल आपण त्यामानाने लवकर आत्मसात करतो. तसंच काहीसं झालं असावं. रिहर्सल संपली. भीमसेन खूष दिसते. अनुभवामुळे त्यांना गाण्याच्या यशाचा अंदाज आला असावा. मला म्हणाले, "रामभाऊ, तुम्ही चाल फारच अप्रतिम बांधली आहे. मी त्याचं काय करतो बघा."
पुढे काय झालं हे मी सांगायचं कारण नाही. पंडितजीनी तो अभंग आपल्या कार्यक्रमात गायला सुरुवात केली. एच.एम.व्ही. ची ध्वनिमुद्रिका बाहेर आल्यावर तर या गाण्याच्या लोकप्रियतेचा वेग फारच झपाट्याने वाढला. पंडितजींच्या कार्यक्रमाचा तो एक अविभाज्य भाग व्हायला लागला. खर्या मूडमध्ये पंडितजी तो ज्यावेळी गातात त्यावेळी तो अभंग श्रोत्यांना निराळ्या विश्वात घेऊन जातो. बाताबरण धुंद होतं. गायक आणि श्रोते दोघेही विठ्ठलमय होतात. मला वाटतं या अभंगाच्या शब्दांना आणि स्वरांना जी लय साधली आहे, ती त्या धुंदीचं गुपित असावं. पंडितजींचा आविष्कारही तसाच मोलाचा.
प्रसिद्ध संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांची मी एकदा आकाशवाणीकरिता मुलाखत घेतली होती. मुलाखतीनंतर आम्ही इकडचं, तिकडचं बोलत होतो. 'तीर्थ विठ्ठल'ची ध्वनिमुद्रिका नुकतीच बाहेर आली होती. त्या संदर्भात हृदयनाथ मला महणाले, "तुमची ती ध्वनिमुद्रिका उत्तम आहे, खूप गाजते आहे. ध्वनिमुद्रिका बाहेर आल्यावर पहिल्या महिन्यातलीच विक्री नेत्रदीपक आहे."
आणखी एक प्रसंग असाच मजेदार आहे. सुधीर फडके यांचा मुलगा श्रीधर. त्याचं लग्न होतं. ७६ साल असावं. लग्नसमारंभाला संगीतातले अनेक मान्यवर हजर होते. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरही होत्या. स्टेजवर वधूवरांना लोक भेटत होते. सदिच्छा देत होते. मी स्टेजवरच होतो. योगायोगाने लताबाई स्टेजवर माझ्याशेजारी आल्या. मी त्यांना नमस्कार केला आणि माझी स्वतःची ओळख करून दिली. लताबाई म्हणाल्या, "मी तुम्हाला ओळखते, विशेषतः तुमच्या 'तीर्थ विठ्ठल' या अभंगामुळे. चाल फारच अप्रतिम वठली आहे." असं म्हणून त्यांनी अभंगाची पहिली ओळ चक्क गुणगुणली. माझ्या सांगीतिक जीवनातला तो एक अनमोल क्षण होता.
हा अभंग केवळ महाराष्ट्राचा किंवा केवळ भारताचा राहिलेला नाही. पंडितजींच्या विश्वसंचारामुळे आणि त्या ध्वनिमुद्रिकेच्या विश्वप्रचारामुळे तो सगळ्या राष्ट्रांचा झाला आहे. भाषा कळत नसूनही तो श्रोत्यांना मोहून टाकतो. १९९८ साली भीमसेन अमेरिकेत आले होते. मीही तिथे होतो. आम्ही एके ठिकाणी जेवायलाही बरोबर होतो. त्या वेळी पंडितजींचे तबला साथीदार नाना मुळे गप्पा मारताना म्हणाले, "आम्ही आत्ताच हॉलंडमध्ये कार्यक्रम करून आलो. कार्यक्रमाला बरीच डच मंडळी हजर होती. त्यांचेकडून आम्हाला लेखी फर्माइश आली. 'TIRTH VITHTHAL, KSHETRA VITHTHAL.
(संपादित)
राम फाटक
'माझी स्वरयात्रा' या राम फाटक लिखित पुस्तकातून.
सौजन्य- राजहंस प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.