जाणवेल मीलनी कोण विरह वेदना?
असती माहिती कशी नदीस घोर वादळे?
आसवात जग बुडे; मृगजळास का कळे?
जी व्यथा नभातली, ती कथाच अंगणा !
फूलपंखी का कधी गरुडझेप घेतसे?
काजळी तमास का रंग कोण देतसे?
हृदयशून्य करील कोण मंदिरात प्रार्थना !
रजनीच्या घरी कधी होई सूर्य पाहुणा?
दिसती ना कधी कुणा अंतरातल्या खुणा
सांगते अबोली का कुणास मुग्ध भावना?
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | सोबती |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
मृगजळ | - | आभास. |
माझ्या पहिल्या गीतरचना मुरलीधराच्या कृपेने किंवा प्रसादाने श्रीकृष्णासंबंधीच्या आहेत. 'निळा सावळा नाथ', 'कंठातच रूतल्या ताना', 'जाहले धुंडूनिया गोकुळ' ही याची काही उदाहरणे. त्याकाळी 'कृष्णकवि' म्हणून लौकिक असणार्या सदाशिव अनंत शुक्ल या कवीनी मुद्दाम भेटून मला शाबासकी दिली. कवी शुक्ल हे माडगूळकरांचेही गुरू म्हणून त्यांच्याबद्दल मला फार आदर वाटत असे.
उत्कृष्ट ज्योतिषी असा लौकिक असणार्या शुक्लांनी एक दिवस मला सांगितलं, "तुम्ही लोकप्रिय होणार की नाही हे तुमच्या गाण्याच्या बाबतीत न सांगताच मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. तुम्ही तुमच्या गाण्याचा एक रसिक वर्ग निश्चितच तयार कराल."
त्यादिवसापासून माझी एक धारणा अशी झाली आहे की, माणसासारखीच प्रत्येक गाण्यांची एक कुंडली असते. माझं 'संधीकाली या अशा' हे गीत कोणे एके काळी वैभवाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या तलत महमूद या गायकाबरोबर, लता मंगेशकरांच्या आवाजात रिहर्सल होऊन केवळ रेकॉर्ड व्हायचं जे थांबलं ते पुरेपूर वीस वर्षांनंतर ध्वनिमुद्रित झालं.
तर 'सोबती' या बोलपटातील 'साउलीस का कळे' हे गीत संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे यांनी लताबाईंच्या आवाजामध्ये गाणे लिहून झाल्यावर केवळ एका आठवड्यात ध्वनिमुद्रित केलं होतं.
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
'मराठी युगुलगीते' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.