A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सावळाच रंग तुझा

सावळाच रंग तुझा, पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या, वीज खेळते नाचरी !

सावळाच रंग तुझा, चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या, नाग खेळती विखारी !

सावळाच रंग तुझा, गोकुळीच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या, नित्य नादते पावरी !

सावळाच रंग तुझा, माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंद्र पाहू केव्हा उगवतो?

सावळाच रंग तुझा, करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या, झालो गडी बंदीवान !
पावरी - बासरी.
विखारी - विषारी.
आषाढाचे दिवस.. कोल्हापूरच्या रंकाळा तलावातील रम्य परिसर.. सूर्याने केव्हाच काढता पाय घेतलेला.. पण मागे रेंगाळलेल्या काही चुकार किरणांमुळे सार्‍या परिसरावरच फिकट गुलाबी रंगाचा मुलामा चढलेला.. हवेत अर्थातच सुखद गारवा पसरलेला. रंकाळ्याच्या एरवी शांत असणार्‍या पाण्यात काही लाटा उमटत होत्या. किनार्‍यावर त्या थडकताच अंगावर उडणारे तुषार मनाला सुखवून जात होते. दूरवर अंधुक प्रकाशात धूसर दिसणारी संध्यामठाची देखणी इमारत अधिकच सुंदर दिसत होती आणि या भारलेल्या वातावरणात दोन तरुण झपाझपा पावले टाकीत चालताना भावी आयुष्याचे मनोरे रचत होते..

एवढ्यात त्या दोघांचे लक्ष समोरून आपले यौवन सावरीत येणार्‍या एका सावळ्या पण अतिशय देखण्या अशा तरुणीकडे गेले. ती आपल्याच तंद्रीत स्वतःशीच लाजत त्या दोघांकडे केवळ एक चोरटा कटाक्ष टाकत पुढे निघून गेली. योगायोगाने तेवढ्यात आकाशातही झपकन वीज चमकून गेली. त्या दोघांपैकी काहीशा उंच आणि स्थूल तरुणाने दुसर्‍याकडे पाहून केवळ एक स्मित करून म्हटले, ''हा घे, तुझ्या नव्या भावगीताचा मुखडा..

सावळाच रंग तुझा
पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या
वीज खेळते नाचरी !

ते दोन तरुण म्हणजे पुढे मराठी चित्रपट आणि भावगीत सृष्टीत 'अद्वैत' ठरलेले दिग्गज ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडकेच होते.

श्रीधर माडगूळकर

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.