गिरिराजांचे देह निखळूनी
गजांगशा त्या शिळा उचलुनी
जलांत द्या रे जवें ढकलुनी
सेतुबंधने जोडुन ओढा समीप लंकापुरी
फेका झाडें, फेका डोंगर
पृष्ठीं झेलिल त्यांना सागर
ओढा पृथ्वी पैलतटावर
वडवाग्नी तो धरील माथीं सेतू शेषापरी
रामभक्ति ये दाटुनि पोटीं
शततीर्थांच्या लवल्या पाठी
सत्कार्याच्या पथिकासाठीं
श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी
नळसा नेता सहज लाभतां
कोटी कोटी हात राबतां
प्रारंभी घे रूप सांगता
पाषाणाच हे पहा लीलया तरती पाण्यावरी
चरण प्रभुचे जळांत शिरतां
सकळ नद्यांना येइ तीर्थता
आरंभास्तव अधीर पूर्तता
शिळा होउनी जडूं लागल्या, लाट लाटांवरी
गर्जा, गर्जा हे वानरगण !
रघुपती राघव, पतितपावन
जय लंकारी, जानकिजीवन
युद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी
सेतू नच हा क्रतू श्रमांचा
विशाल हेतु श्रीरामांचा
महिमा त्यांच्या शुभनामाचा
थबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी
बुभुःकारुनी पिटवा डंका
विजयी राघव, हरली लंका
मुक्त मैथिली, कशास शंका
सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वराविष्कार | - | ∙ सुधीर फडके ∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
राग | - | मिश्र धून |
गीत प्रकार | - | गीतरामायण, राम निरंजन |
टीप - • गीतरामायण. • प्रथम प्रसारण दिनांक- १२/१/१९५६ • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- समूहगान. |
क्रतु | - | यज्ञ. |
जव | - | वेग / घाई. |
नील (नळ) | - | एक वानर. सुग्रीवाचा एक सेनापती. विश्वकर्मा पुत्र. |
पृष्ट(ष्ठ) | - | पाठ. |
भेर | - | मोठा नगारा. नौबत. |
मैथिली | - | सीता (मिथिला नगरीची राजकन्या). |
लंकारी | - | राम. लंकेचा अरि(शत्रु). |
लवणे | - | वाकणे. |
वडवाग्नी (वडवानल) | - | समुद्रातला अग्नी. |
शेष | - | पृथ्वी डोक्यावर तोलून धरणारा सर्पांचा राजा. |
सांगता | - | पूर्णता. |
त्यावेळी आकाशवाणीवर आणखी एक कर्तबगार वरिष्ठ अधिकारी होते. त्यांचं नाव कृ. द. दीक्षित. आकाशवाणीत येण्याचे आधी ते कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते. केवळ संगीत आणि साहित्य यांची आवड म्हणून ते आकाशवाणीच्या नोकरीत आले होते. आकाशवाणी हे असं क्षेत्र आहे की जिथे तुम्ही नुसते अभ्यासात निपुण असून किंवा नुसतं कलाकार असून भागत नाही. तुम्हाला कार्यक्रम निर्मितीची क्षमता हवी. त्यावेळी तशी क्षमता असणारी बरीच माणसं या माध्यमात काम करीत होती. मुख्य म्हणजे त्यांच्या कामात नेकी होती. अर्थकारण दुय्यम होतं.
कृ. द. दीक्षितांनीही 'गीतरामायणाची' कल्पना उचलून धरली. ह्या सगळ्यांचे मित्र सुधीर फडके यांच्यावर 'गीतरामायणाच्या' संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी टाकण्यात आली. चांगले संगीतकार म्हणून श्रोते त्यांना ओळखू लागले. केंद्राधिकार्यांची 'गीतरामायणाच्या' सूचनेला मान्यता मिळाली आणि कार्यक्रमाची जुळवाजुळव सुरू झाली.
१९५४ च्या रामनवमीपासून पुढील पूर्ण वर्षभर 'गीतरामायण' हा कार्यक्रम चालू राहणार होता. रामकथेवरची ५६ गीतं त्यात सादर होणार होती, आठवड्याला एक याप्रमाणे. एकच गाणं आठवड्यातून दोनदा लागे. कार्यक्रमाचा आवाका फार मोठा होता. अनेकांचं सहकार्य त्यात अपेक्षित होतं. विविध प्रसंग, विविध पात्रे, विविध मूड्स, या सगळ्यांची यथायोग्य दखल घ्यायला हवी होती. काम तसं अवघड होतं. अनेक अडचणीही आल्या. पण आकाशवाणीवरील कर्मचार्यांच्या निष्ठेने आणि श्रमाने आणि विशेषतः रामकृपेने निर्मितीचा झपाटा सातत्याने टिकला.
दर आठवड्याला एक अलौकिक गाणं लिहिणं हे जितकं अवघड तितकंच अवघड, किंबहुना जास्त अवघड होतं, गाणं मिळाल्यावर त्याला चाल लावणं, मधलं संगीत भरणं, योग्य गायकाची निवड करून त्याला गाणं शिकवून सिद्ध करणं आणि यशस्वी रीतीने ध्वनिमुद्रण करणं आणि त्याचं प्रक्षेपण करणं. माडगूळकरांकडून दर आठवड्याला गाणं मिळवणं हे फार मोठं दिव्य होतं. त्या गाण्यावर प्रक्षेपणाच्या आधी किती प्रक्रिया कराव्या लागतात याची त्यांना जाण निश्चित होती. पण त्याकडे ते सोयीस्कररीत्या कानाडोळा करीत.
गाणं मागण्यासाठी जाणंही तसं अवघड होऊन बसे. प्रभाकर जोग त्यांचेकडे आलेले दिसले, की अण्णा म्हणत, "आला रामाचा दूत" वगैरे. पण गाणं ज्या वेळी लिहून पूर्ण होई त्यावेळी मात्र वाचणारे कृतार्थ होत. अण्णांची कविता होतीच तशी अलौकिक. ते सिद्धहस्त कवी होते. शब्दप्रभू होते. याची ठायीठायी प्रचिती येई. त्यांच्या कविश्रेष्ठतेचा कळस म्हणजे 'गीतरामायण.' त्याच्या नुसत्या वाचनानेही अनेकांना अलोट आनंद होतो. त्यातल्या कवित्वाचा रसास्वाद घेण्याची क्षमता मात्र तुमच्यात हवी. विविध प्रसंग, विविध भाव, विविध स्वभावचित्रं, अण्णांनी अतिशय प्रभावीपणे रेखाटली आहेत. कुठल्या गाण्याला कुठलं वृत्त वापरावं याची त्यांना स्वाभाविक जाण होती. "ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा" किंवा "जोड झणि कार्मुका सोड रे सायका, मार ही त्राटिका रामचंद्रा", "राम जन्मला ग सखी" अशी गाणी त्याची साक्ष म्हणून देता येतील. पहिल्या गाण्याला द्रुत एकताल, दुसर्या गाण्याला जलद झपताल, आणि तिसर्या गाण्याला जलद दादरा, किती भाववाही वाटतात.
'गीतरामायणा'तल्या पहिल्याच गाण्याचे वेळी झालेला गोंधळ सर्वज्ञात आहे. मी त्याचा एक साक्षीदार आहे.
रामनवमीच्या आधी सादर झालेल्या 'पारिजात' ह्या संगीतिकेतल्या गाण्यांची तालीम माणिकबाई वर्माच्या घरी, मला वाटतं नारद मंदिराच्या बोळीत, चालली होती. संगीतिकेमध्ये मी होतो नारद, तर फडके होते कृष्ण. मला आठवतं त्याप्रमाणे त्याच बैठकीत गीतरामायणातलं पहिलं गाणं ('स्वये श्री रामप्रभू ऐकती' याच्याआधी लिहिलेलं) मी आणि संगीतिकेतले आणखी एक कलाकार बबनराव नावडीकर या दोघांनी वाचलं होतं. माडगूळकरांच्या हस्ताक्षरातलं. पुढे काय झालं, भगवान जाणे. गाणं हरवलं असावं. बर्याच वादावादीनंतर अण्णांना रेडिओ ऑफिसमधील एका खोलीत बसवून लाडांनी "स्वये श्री रामप्रभू ऐकती" हे लौकिकार्थाने पहिलं ठरलेलं गाणं लिहून घेतलं, ही हकिगत अनेकांनी अनेकांकडून असंख्य वेळा ऐकली आहे. म्हणून त्याबद्दल जास्त ऊहापोह करीत नाही. मथितार्थ इतकाच, की अण्णांकडून गाणं मिळवणं हे एअक दिव्य होतं.
शास्त्रीय संगीताच्या बैठकीवर आधारलेल्या स्वररचनांनी 'गीतरामायण' सादर होणार होतं. फडके यांनी काव्याला जबरदस्त न्याय देऊन उत्तम चाली बांधल्या आणि गाण्याला अनुरूप आवाजात ध्वनिमुद्रित केल्या.
मला 'गीतरामायणात' खूप गायला मिळालं. माझ्यातल्या गुणांना खूप वाव मिळाला याचा मला अतीव आनंद झाला. मी 'गीतरामायणा'तील पाच गाणी गायली. सेतू बांधारे मधील नऊ पैकी तीन अंतरे; दुसरे तीन, तीन अनुक्रमे बबनराव नावडीकर आणि चंद्रकांत गोखले यांनी गायलेले आहेत. माझी इतर चार एकट्याने गायलेली गाणी म्हणजे, 'ज्येष्ठ तुझा पुत्र', 'जोड झणि कार्मुका', पळविली रावणे सीता’ आणि ’प्रभो मज एकच वर द्यावा’. पहिली दोन आहेत विश्वामित्राच्या तोंडी, तिसरे आहे जटायूच्या तोंडचे, आणि चौथे आहे हनुमानाच्या तोंडचे. या सगळ्या गाण्यांची गुणवत्ता श्रेष्ठ दर्जाची होती. लोकांनी त्यांचं स्वागतही भरपूर केलं. (टीप- आकाशवाणीवरील प्रथम प्रसारणातील गायन.)
(संपादित)
राम फाटक
'माझी स्वरयात्रा' या राम फाटक लिखित पुस्तकातून.
सौजन्य- राजहंस प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.