शांत मला झोपू दे, नाथा !
थकले पाउल, थकले पैंजण
पुरे पुरे मज झाले नर्तन !
निळी जांभळी नीज राजसा, लोचन हे व्यापू दे !
नको थांबवू सूर परंतू
तंतुवाद्य ते छेड तुझे तू
तुझ्या गळ्यातील प्रीती आता अंगाई गाऊ दे !
| गीत | - | ग. दि. माडगूळकर |
| संगीत | - | दत्ता डावजेकर |
| स्वर | - | मोहनतारा अजिंक्य |
| चित्रपट | - | पेडगांवचे शहाणे |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
प्रत्येक संगीत दिग्दर्शकाची वैशिष्ट्ये हेरून त्यापैकी अनुकरणीय गोष्टींचा त्यांनी आपल्या प्रतिभेमध्ये संग्रह करून ठेवला व सुयोग्य वेळी त्याचा उपयोगही केला. 'चित्रपट' हे श्राव्य माध्यमाबरोबरच दृश्य माध्यमही आहे या गोष्टीचा त्यांनी विसर पडू दिला नाही. चित्रपटातील काही गीते ही त्यांच्या उत्कृष्ट चालींमुळे चिरंतन ठरतात, तर काही गीते दृश्य माध्यमामुळे केवळ त्या प्रसंगाबरोबरच उठावदार वाटतात. चित्रपट संगीताच्या या मर्यादाही त्यांनी लक्षात ठेवल्या.
दत्ता डावजेकरांनी फक्त चित्रपटांनाच संगीत दिलं नाही, तर त्यांनी भावकविता, भक्तिगीते, समूह गीते, प्राचीन संतांच्या रचना, लोकगीते, इ. अनेक प्रकारच्या गीतांना चाली दिल्या. या गीतांमध्ये केवळ श्राव्य माध्यम असल्याने शब्द, अर्थ व सूर एकजीव होण्याची आवश्यकता भासली.
प्रत्येक संगीत दिग्दर्शकाची खुबी अगर वैशिष्ट्य तो गीताला चाल कशी लावतो यावरच अवलंबून असते. चाल लावण्याची प्रक्रिया ही प्रातिनिधिक व सर्जनात्मक असल्याने ती शब्दामधून व्यक्त करणे ही गोष्ट अतिशय अवघड आहे.
निसर्गामध्ये आपण झाडावर फूल फुलताना पाहतो. वास्तविक हे विधान पूर्ण सत्य व्यक्त करीत नाही. एक तर आपण फूल उमलण्यापूर्वी कळी असताना पाहतो किंवा फूल अर्धवट उमललेले अगर पूर्ण उमललेले पाहतो. परंतु कळीचे फुलात रूपांतर होत असताना त्या कळीला ज्या विविध अवस्थांमधून जावे लागत असेल त्या सर्व अवस्थांचा आपल्याला परिचय असणे ही गोष्ट फार कठीण आहे.
गीताच्या चालीबाबतही असेच आहे. प्रत्येक संगीतकाराचा अनुभव वेगळा असतो. सर्वसामान्यपणे शास्त्रीय संगीतामधील एखादा राग निवडून व त्या रागाचे शुद्ध स्वरूप टिकवून त्या रागामध्येच चाल बांधण्याची प्रक्रिया बहुतेक संगीत दिग्दर्शक टाळतानाच आढळतात. कारण त्यामध्ये स्वतःच्या निर्मितीचा खराखुरा आनंद मिळत नसावा.
काही संगीत दिग्दर्शकांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात गीतांना चाली देणं ही गोष्ट त्रासदायक, कष्टकारक व प्रयत्नसाध्य होत असावी. नेहमी नवीन चाली कुठून आणणार? हा प्रश्न तर त्यांना कायमच सतावत असेल. तसे जगात एकदम नवीन व मूलभूत असे काहीच नसते. बर्याच गोष्टी अनुभव पूर्वानुभवावर अधिष्ठित असतात. काही लक्षात राहिलेली स्वरवलये त्यांच्या डोक्यामध्ये भ्रमण करीत असणार. योग्य प्रसंग लक्षात आल्यावर ती त्या प्रसंगावर चालून जात असतील व चाल लागत असेल. तर काही संगीत दिग्दर्शकांच्या मते चांगले गीत हे स्वतःची चाल घेऊनच संगीत दिग्दर्शकाला येऊन भेटते व त्यामुळे त्याला चाल लावायला कोणतेच कष्ट पडत नाहीत. आणि त्यामुळे ती चाल त्या गीताच्या 'मूड'ला योग्य न्याय देत असते. तर काही संगीत दिग्दर्शक पार्श्वगायक अगर पार्श्वगायिका यांच्या गाण्याचा वकूब लक्षात घेऊन चाल देतात.
दत्ता डावजेकर गीताला चाल देताना 'शब्दां'ना चाल देत. त्यांच्या म्हणण्यानुसार शब्दाच्या अर्थाबरोबर चाल विविध वळणे घेत विकसत असते. ते शब्दाचा अर्थ व हस्वदीर्घत्व याकडे ते योग्य ते ध्यान देत.
सर्वात कमी वेळात चाली देणारा म्हणूनही त्यांचा लौकिक होता. आणि नोटेशन तर त्यांच्या डोक्यातच असे. तुमच्या हसण्याचेही ते चटकन नोटेशन मध्ये रूपांतर करू शकत !
(संपादित)
सौजन्य- श्री भारत बुक डेपो, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












इतर संदर्भ लेख