A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शोधिशी मानवा राउळी

शोधिशी मानवा राउळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी

मेघ हे दाटती कोठुनी अंबरी?
सूर येती कसे वाजते बासरी?
रोमरोमी फुले तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी दूर ती पंढरी

गंध का हासतो पाकळी सारुनी?
वाहते निर्झरी प्रेमसंजीवनी
भोवताली तुला साद घाली कुणी
खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी

भेटतो देव का पूजनी अर्चनी?
पुण्य का लाभते दानधर्मातुनी?
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी?
गीत - वंदना विटणकर
संगीत - श्रीकांत ठाकरे
स्वर- महंमद रफी
राग - मालकंस
गीत प्रकार - भावगीत
निर्झर - झरा.
राऊळ - देऊळ.
संजीवनी - नवजीवन / मेलेला प्राणी जिवंत करणारी विद्या.
संगीतकार श्रीकांत ठाकरे एकदा मला गमतीने म्हणाले, "कसले तुम्ही मराठी कवी ! नुसती दळुबाई गाणी लिहिता. तेच शब्द नि त्याच रचना. हिंदी कवी बघा कसे चालीवर गाणी लिहितात. म्हणून त्याच्या रचना नवीन वाटतात."
मी म्हटलं, "मला नाही आवडत चालीवर गाणी लिहायला."
त्यावर ते पटकन्‌ म्हणाले, "चालीवर लिहिता येत नाही म्हणून सरळ सांगा ना !"
मग मात्र मी चिडले नि म्हणाले, "कोण म्हणतं लिहिता येत नाही म्हणून? मी देते तुमच्या चालीवर गाणं लिहून ! बघू या कसं जमतं ते !"
श्रीकांतजींनी मला मालकंस रागातली एक चाल ऐकवली. चाल म्हणजे काय? नुसते सूरच. त्या सुरात शब्दांचे मोती गुंफायचे होते. ते म्हणाले, "या चालीवर भक्तीगीत पाहिजे मला. पण नेहमीसारखं नको. काहीतरी वेगळं लिहा."

बापरे ! चालीचं बंधन. विषयाचं बंधन. म्हणजे हे तर शुद्ध गणितच झालं की ! इथं कल्पना सुचणार कशा नि काव्य उमलणार कसं? पण आव्हान तर स्विकारलं होतं. आता माघार नाही. कल्पना खूप सुचत होत्या पण चालीच्या कुंपणात त्या बसेनात. मात्र श्रीकांतजींची सुरावट फार छान होती. ती पुन्हा पुन्हा ऐकताना मी त्याच्यातल्या भावरसाशी एकरूप झाले आणि साक्षात्कार व्हावा तशा मला ओळी सुचत गेल्या.

शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी

मुखडा ऐकताच श्रीकांतजी म्हणाले, "छान ! पुढं लिहा."
पुढचं काम सोपं होतं. मला चालीचा सूर सापडला होता. मी भराभर वेगवेगळ्या कल्पनांची पाच-सहा कडवी लिहिली. त्यातली तीन कडवी निवडली आणि चालीवर लिहिलेलं माझं पहिलं गाणं जन्माला आलं ! तोपर्यंत गाणं कोण गाणार हे मला माहित नव्हतं. पण थोर गायक महंमद रफी माझं गाणं गाणार आहेत आणि त्यांचं हे पहिलंच मराठी गाणं आहे असं मला श्रीकांतजींनी सागितलं, तेव्हा मी अक्षरश: भारावून गेले ! ते माझे अत्यंत आवडते गायक ! स्वप्‍नात सुद्धा ही कल्पना येणं शक्य नव्हतं. पण श्रीकांतजी ठाकरे यांच्यामुळे हे स्वप्‍नापलीकडचं स्वप्‍न प्रत्यक्षात आलं ! रफीजींनी पहिलं मराठी गाणं गायलं, ते माझं आणि तेही आधी तयार असलेल्या चालीवर रचलेलं माझं पहिलं गाणं !
(संपादित)

वंदना विटणकर
'हे गीत जीवनाचे' या गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.