A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
श्रीराम जय राम

संहारुनि अरि, रघुकुलदीपक
आले हो श्रीराम
म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम

सजवा वेशी, सजवा द्वारे
पृथ्वीवर गगनाचे तारे
रघुविजयाचे गंधित वारे
नभधरणीचा कणकण घोषी
प्रभुरामाचे नाम

रघुपति आले, सीता आली
आज अयोध्या पावन झाली
गुलाल उधळा लक्ष्मणभाळी
बंधुत्वाची अमोल मूर्ती
सोबत जन विश्राम
अरि - शत्रु.
रामराज्याभिषेकाच्या निमित्ताने

रामायणाची गोडी अवीट आहे. रामायण वाचताना वारंवार विचार यायचा की कैकेयी अशी अचानक का बदलली ? केवळ सवतीमत्सर ? मग तो श्रीरामाच्या यौवराज्याभिषेकाच्या प्रसंगापर्यंत कुठं होता? यौवराज्याभिषेकाची वार्ता ऐकून श्रीरामाचे तोंड भरून कौतुक करणारी, हातातील सुवर्णालंकार बक्षीस देणारी ती कैकेयी? विचारांतील या संघर्षानेच रामायणाचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा दिली. 'संगीत सवतीमत्सरा'पासून ते पं. सातवळेकर लिखित 'श्रीरामायण महाकाव्य' आणि 'वाल्मीकि रामायण' यांचा प्रथम, समग्र अभ्यास पुन्हा सुरू केला. त्यानंतर रामायणावरील आणखी किती एक ग्रंथ वाचले, समजावून घेतले. 'आनंदरामायण', 'आध्यात्म रामायण', 'तिब्बती रामायण', 'सिंहली रामायण', 'पद्मपुराण', 'ब्रह्म पुराण', 'महाभारत', 'महावीर चरितम्', 'सत्योपाख्यानम्', 'दशरथ कथानम्', 'पउमचरिअ', 'सेरीराम', 'अनामकम् जातक', 'श्रीरामचरित मानस', 'कृत्तिवासी रामायण', 'मेघनाद वध', 'महिषासुर', 'वयं रक्षामः', इ. अशाच आणखी काही ग्रंथांचा अभ्यास व विचार सुरू होताच. दरम्यान माझी या विषयावरील नियती ही लघुकथा १९७२ च्या 'धनुर्धारी'मध्ये प्रसिद्ध झाली आणि त्यावर आधारीत 'नियती' ही एकांकिका १९७३ च्या रामनवमीला, ऑल इंडिया रेडिओ, मुंबई केंद्रावरून ध्वनिक्षेपित झाली. सौ. लीलावती भागवत यांनी कैकेयीची भूमिका अप्रतिम सादर करून त्या श्रुतिकेतील विचार श्रोत्यांच्या काळजाला स्पर्श करील, असा परिणामकारक केला. सौ. सुमन पांगे यांनी मंथरेची भूमिका केली होती. दरम्यान आमचे मित्र श्री. भार्गवराम पांगे यांनी 'नियती'वर तीन अंकी संगीत नाटक, सहकार मनोरंजन मंडळीसाठी मी लिहावे, असा आग्रह केला.

संगीत नाटकाची कल्पना मला एकदम आवडली. किर्लोस्कर, देवल, खाडिलकर या मराठी संगीत नाटकाच्या आद्यत्रिमूर्तींना वंदन करून व आमचे स्‍नेही श्री. विद्याधर गोखले यांच्या शुभेच्छा व ग्रंथ सहाय्य घेऊन मी लिखाणाला सुरुवात केली. नाटक लिहून पूर्ण झाल्यावर त्याचे वाचन सौ. सुमन पांगे, श्री. भार्गवराम पांगे व श्री. वा. य. गाडगीळ यांनी आणखी काही बहुमोल सूचना दिल्या. त्यानंतर अर्थातच पुनर्लेखन, पुनर्वाचन झाले. या नाटकाचे लेखन मी त्वरित पूर्ण करावे म्हणून 'धनुर्धारी'चे श्री. दाजी सापळे यांनी विशेष प्रोत्साहन दिले. श्री. मोहन वाघ व आशालता यांच्या आत्मीयतेनेच या नाट्यलेखनाला सजावट लाभली. तसंच या नाट्य विषयाला परिपोषक अशी अर्थपूर्ण, भावपूर्ण गीते लिहून अभिजात गीतकार श्री. शांताराम नांदगांवकर यांनीही बहुमोल मदत केली आहे, त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.

या नाटकासाठी सर्वतोपरि मदत करणारे माझे सर्व सुहृद व मला उत्तेजन देणारे माझे रसिक वाचक या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते.
(संपादित)

ललिता बापट
'कैकेयी' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- प्रिया प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख