A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सोनियाचा दिवस आजि

सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहिला ।
नाम आठवितां रूपीं प्रकट पैं झाला ॥१॥

गोपाळा रे तुझें ध्यान लागो मना ।
अणु न विसंबें हरी जगत्रयजीवना ॥२॥

तनु मनु शरण तुझ्या विनटलों पायीं ।
बाप रखुमादेवीवराविना आनु नेणें कांहीं ॥३॥
पैं - निश्चय्यार्थक.
विनटणे - तल्लीन होणे.
मूळ रचना-

गोपाळा रे तूझें ध्यान लागो मना ।
आनु न विसंबें हरी जगत्र-जीवना ॥२॥

सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहला ।
नाम आठवितां रूपीं प्रगट पैं झाला ॥१॥

तनु मनु शरण विनटलों तूझा पाईं ।
रखुमादेवी-वरावांचुनी आनु नेणें कांहीं ॥३॥

भावार्थ-

इतर सर्व आधार सोडून दिल्यामुळे, ईश्वराचें ध्यान लागण्याला आता काहीच अडचण उरली नाही. आजचा दिवस फार भाग्याचा आहे. आज नाम-स्मरणाबरोबर त्याचा अर्थही प्रगट झाला आहे. मुखाने नाम घ्यावयाचे, म्हणजे त्याबरोबर आपले शारीरिक जीवन आणि मानसिक चिंतन ईश्वराच्या च्गरणी वहावयाचे. मन, वाणी आणि शरीर, तिन्ही अंगे ईश्वरी प्रेमाने भरून काढावयची. आज माझी तशी भावना झाली आहे. म्हणून आता तुझेच ध्यान लागो, असे मी त्याला वृद्ध निश्चयाने म्हणत आहे.

आचार्य विनोबा भावे
ज्ञानेश्वरांची भजनें
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा

  इतर भावार्थ