A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सूर कुठूनसे आले अवचित

सूर कुठूनसे आले अवचित पथी जाता जाता
उलगडल्या मानसी दिवाण्या स्वप्‍नधुंद वाटा

निर्विकार मन होते केवळ
तोच स्वरांचा आला परिमळ
गंधित धूसर जादू घडली क्षणी बघता बघता

रूप स्वरांचे तरल, अपार्थिव
कणाकणातुन दुखरे आर्जव
शब्दापलीकडलेसे काही अस्फुट ये हाता

त्या स्वप्‍नांच्या वाटेवरती
अकल्पिताच्या गाठीभेटी
अहेतुकाची प्रसन्‍न संगत अनाम मधुगीता

सूर भवतीचे सरले, विरले
काळजात पण अक्षय उरले
मनात ओल्या मृदुल स्वरांच्या लाटांवर लाटा
जगण्याच्या आणि अभिव्यक्तीच्या आपल्या प्रेरणा कोणत्या? असा शोध घेऊ लागलो की दोन मूलभूत अस्तित्वं समोर येतात. शब्द आणि सूर.. ह्यात आधी नंतर, पहिलं-दुसरं असं ठरवता येणं अवघड व्हावं इतक्या ह्या दोन गोष्टी परस्परात गुंतलेल्या आहेत. किंबहुना त्यांचा आपसूक विणत गेलेला आणि आजही विणला जाणारा गोफ म्हणजे आपलं जगणं ही एव्हाना एकप्रकारे अंतरीची खूण झाली आहे. पण तरीही कालानुक्रम लावायचाच ठरवला तर एक गोष्ट नक्की की अंतर्मनाला झालेला पहिला मधुर दंश हा 'स्वरा'चाच होता.. त्यानंतर अल्पावधीतच त्यामध्ये शब्द ओवले गेले.. आणि कानामागून आलेलं हे शब्द नावाचं भावंड पाहतापाहता तिखट? नाही.. कधी तिखट, कधी आंबटगोड, पण परिणामी मधुर मधुरच होत गेलं.. पण म्हणून स्वरांची मातब्बरी थोडीही उणावली नाही. शब्द नेहमीच आपला उगम असलेल्या त्या 'स्वर' नावाच्या अमूर्ततेकडे आणि त्या पलीकडे विस्तीर्ण पसरलेल्या अथांग मौनाकडे ओढ घेत राहिले..

मौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचे झाले
वितळले क्षितिज गंधात, रंगातून रूप निथळले

मौनाच्या संध्याकाळी स्पर्शाचा सुटला वारा
त्या तसल्या वादळ-प्रहरी विरघळून जाय किनारा

मौनाच्या संध्याकाळी एकान्‍त बहरुनी फुलला
हृदयाचा झाला थेंब आभाळ होउनी झरला

अनेक वर्षांनी ह्या कवितेकडे पाहताना आता अचानक जाणवतंय की माझा कलावंत आणि माणूस म्हणून झालेला आजवरचा सगळा प्रवास ह्या कवितेत सामावला आहे. जो मौनातून उगवून आला आणि मौनातच विरून जायचा आहे..

मौन हाच जर मूलभूत पाया मानला तर शब्द, सूर, रेषा, रंग हा अमूर्ताकडे जाणारा एक जिना ठरतो. जो पुन्हा अमूर्त अथांग मौनातच पोचणार आहे. पण हाच प्रवास उलटा करून पहायचा झाला तर, मौनाच्या सर्वात जवळ रंग-रेषा असतात, ज्यांच्या दृश्य रूपांत एक अबोल अरूप असतं.. त्या रेषांतूनच मग अबोल अक्षर आकार घेतं.. नंतर खरोखरच काही बोलू पहाणारे स्वर येतात, कारण त्यांना नाद, ध्वनी चिकटला आहे. मौन रूढ अर्थानं प्रकट होऊ लागल्याची ती पहिली पायरी. आणि मग येतात शब्द. कारण ते नादाला अर्थ देऊ लागतात. पण पुन्हा अर्थाचं प्रकट आणि अप्रकट विश्व हा एक प्रचंड अवकाश ध्यानी घ्यावा लागतो. कारण त्या अर्थाचे पुन्हा अनेक पापुद्रे.. 'गीतातला शब्दार्थ तू, शब्दातला भावार्थ तू, भावातला गूढार्थ तू' असा एक पुन्हा अमूर्ताकडे नेणारा प्रवास तिथेही असतोच. शिवाय मध्ये पुन्हा 'स्पर्श'नामक अरूप बोलकं मौन डोळे मिचकावीत उभं.. म्हणजे ह्या सर्व अमूर्ताला पुन्हा साक्षात मूर्ताकडे आणणारं उष्ण अस्तित्व. गंमत म्हणजे त्या रक्तामांसाच्या जाणिवेवरही अंतिम स्वामित्व 'मन' नामक अमूर्त संकल्पनेचं, म्हणजे पुन्हा ते आदिम–अंतिम तत्त्व म्हणजेही 'मौन'च असं हे सगळं उलट-सुलट रसायन आहे.

थोडक्यात, शब्द, नाद, रंग, रूप, रस, गंध आणि स्पर्श ह्यांचा अविरत चाललेला खेळ आणि कल्लोळ म्हणजे आपलं जगणं.. मात्र ही सगळी गुंतागुंत स्वीकारून आणि पचवूनही पुन्हा माझं साधसुधं म्हणणं हेच असेल की माझ्या अस्तित्वाच्या आणि आविष्काराच्या दोन मूलभूत वाटा म्हणजे शब्द आणि सूर.. कवी, गीतकार, संगीतकार ह्या माझ्या तीनही भूमिका आजवर साकार झाल्या आणि पुढेही होत राहतील त्या प्रामुख्याने ह्या दोन प्रेरणांतूनच.. त्यातील सर्वप्रथम झालेला स्वराचा दंश आणि नंतर शब्दांनी घेतलेली पकड ही मजेदार जन्म-जोड पाहताना आज असं जाणवतं की माझी कविता सखी सर्वार्थाने स्वयंभू असूनही, तिच्या कळत अथवा नकळत ती अखंड स्वरांचा वेध घेत राहिली आहे. कवी होण्याच्या दिशेकडे नुकताच वळत होतो तेव्हाची एक खूप जुनी कविता आता अचानक समोर उभी राहिली आहे.

सूर कुठूनसे आले अवचित पथी जाता जाता
उलगडल्या मानसी.. दिवाण्या स्वप्‍नधुंद वाटा

आज मी निश्चितपणे सांगेन की कुठल्याही एका क्षणापुरत्या अनुभवातून ही कविता उगवलेली नसणार.. किंवा कदाचित नकळत्या वयापासून तनामनावर पसरलेली स्वर-मोहिनी ह्या कवितेचं निमित्त करून प्रकट झाली असेल. कारण ती स्वरमोहिनी पुढेही माझ्या कविता आणि गीतातून अखंड वाहताना दिसते..
(संपादित)

सुधीर मोघे
सौजन्य- दै. लोकसत्ता (२१ जुलै, २०१३)
(Referenced page was accessed on 1 February 2017)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.