A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वयें श्रीरामप्रभु ऐकती

स्वयें श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती

राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रुपें आकारती

ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल
वसंत-वैभव गाते कोकिल
बालस्वराने करुनी किलबिल
गायनें ऋतुराजा भारिती

फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभूषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी
संगमीं श्रोतेजन नाहती

पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहतां निजजीवनपट
प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्‍कट
प्रभुचे लोचन पाणावती

सामवेदसे बाळ बोलती
सर्गामागुन सर्ग चालती
सचिव, मुनिजन, स्त्रिया डोलती
आंसवें गाली ओघळती

सोडुनि आसन उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटिचा घडे महोत्सव
परि तो उभयां नच माहिती
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - भूप
गीत प्रकार - राम निरंजन, गीतरामायण
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १/४/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.
कुंडल - कानात घालायचे आभूषण.
राजस - सुंदर / रजोगुणी.
शैशव - बाल्य.
सर्ग - अध्याय.
स्वये - स्वत:
स्वर्धुनी - (स्वर्‌ + धुनि) स्वर्गलोकीची नदी.
सामवेद - चार वेदांतील तिसरा वेद.
त्या काळात पुणे आकाशवाणीने अनेक चांगल्या संगीतिका सादर केल्या. त्यातली एक बरीच लोकप्रिय झालेली संगीतिका 'पारिजातक'. ज्या दिवशी 'पारिजातक'चे प्रक्षेपण होणार होतं त्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी गीतरामायणाचं पहिलं गीत सादर होणार होतं. म्हणून असं ठरलं की सर्वांनी रात्री आकाशवाणीवर संगीतिका ऐकायची अन्‌ मग त्यानंतर गीतरामायणाचं पहिलं गीत रेकॉर्ड करायचं.

ठरल्याप्रमाणे सीताकांत लाड, कृ. द. दीक्षित व आम्ही सगळे जमलो. फडकेसाहेब माडगूळकरांना म्हणाले, "चला अण्णा, गाणं द्या." अण्णा म्हणाले, "गाणं माझ्याजवळ कुठे आहे? मी ते केव्हाच तुमच्याकडे पोचतं केलं आहे."

मग काय, गाणं शोधण्याची धावापळ सुरू झाली. हे सगळं रात्री बारा-साडेबारापर्यंत चाललं. शेवटी गाणं पुन्हा लिहायचं ठरलं. पण अण्णा "मी नाही पुन्हा लिहिणार" म्हणून हटून बसले. शेवटी सीताकांत लाड यांनी आण्णांना एका खोलीत डांबून ठवलं आणि सांगितलं, "गाणं लिहिल्याशिवाय बाहेर येता येणार नाही. सकाळी पावणेआठला ब्रॉडकास्ट करायचं आहे." शेवटी आण्णांना आपल्या मित्राचं म्हणणं मान्य करण्यावाचून गत्यंतरच नव्हतं.

गाणं लिहून होईपर्यंत फडकेसाहेब घरी गेले. श्रीधर (फडके) तीन-चार वर्षांचा असेल. त्याला घटसर्प झाला होता. पहाट होऊ लागली. सकाळचे पाच वाजले असावेत. गाणं हातात पडलं, 'स्वयें श्रीरामप्रभु ऐकती..'

ते शब्द वाचून बाबुजींना कल्पना सुचली की सुरुवातीला कुश आणि लव यांनी श्रीरामाला 'श्रीराम, श्रीराम' असे गाऊन वंदन केल्याचे ऐकवावे आणि मग निवेदन चालू होते. पण त्याकरता दोन मुलांचे आवाज पाहिजेत. मग सकाळी सकाळी मंदाकिनी पांडे आणि माझ्या आठवणीप्रमाणे ललितावहिनींना आकाशवाणीची गाडी पाठवून आणवलं. तोपर्यंत फडकेसाहेबांनी अस्ताईची चाल करून मला ती म्युझिशियन्सकडून वाजवून घ्यायला सांगितली व ते अंतर्‍याच्या चालीवर विचार करून ठेवला. साडेसात वाजले होते. पंधरा मिनिटांनी प्रक्षेपण चालू होणार होते. मंदा पांडेला व ललितावहिनींना 'श्रीराम'ची चाल शिकवली गेली. हे सगळं होईपर्यंत पावणेआठ वाजले. पुरुषोत्तम जोशीचे धीरगंभीर आवाजातील निवेदन चालू झाले.

निवेदन संपले.स्टुडिओतला तांबडा दिवा लागला. तानपुरे वाजायला लागले. कुशलवांची रामवंदना झाली. मग फडकेसाहेब 'स्वयें श्रीरामप्रभु ऐकती' गाऊ लागले. अतिशय सुरेल भावपूर्ण अशा त्यांच्या गायनाने सारं वातावरण प्रसन्‍न झालं. पुरेशी रिहर्सल न करताही ते सात-आठ अंतर्‍यांचं गाणं त्यांनी अतिशय तन्मयता व आत्मविश्वासानं गायलं. असा प्रतिभावान संगीतकार आणि गायक फार क्वचितच बघायला मिळतो. स्वत:ला भाग्यवान समजतो अशा लोकोत्तर कलाकाराचा सहाय्यक, वादक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली.

प्रत्येक गाणं तीन दिवस प्रक्षेपित होणार असल्याने गाणं ध्वनिमुद्रित करणं जरुरीचं होतं. पहिलं प्रक्षेपण संपल्यावर मी सर्व गीताचे नोटेशन लिहून घेतले, वादकांची रिहर्सल घेतली आणि ते गीत नंतर ध्वनिमुद्रित झालं

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

 

  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण