पानावरच्या दंवबिंदूपरि
त्रिभुवन हें डळमळलें ग !
तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढांसळले, सुर कोसळले
ऋषि, मुनि, योगी चळले ग !
ऋतुचक्राचे आंस उडाले
आभाळातुन शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळीं तळमळले ग !"
हृदयीं माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला भिडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरलें ग !
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | सलील कुलकर्णी |
स्वर | - | सलील कुलकर्णी |
अल्बम | - | संधीप्रकाशात |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |
टीप - • काव्य रचना- २८ नोव्हेंबर १९४७. |
आंस | - | गाडीचा कणा, अक्ष. |
गिरी | - | पर्वत, डोंगर. |
दिग्गज | - | पृथ्वी तोलून धरणारे आठ हत्ती / नरश्रेष्ठ. |
पंचानन | - | सिंह. |
मीन | - | मासा. |
सुर | - | देव. |
का भामिनी उगीच राग?
शाळेत असताना अभिषेकीबुवांचं हे गाणं ऐकलं. मी बुवांचा भक्त आहेच, पण हे गाणं ऐकताना बुवांच्या गाण्याबरोबरच त्यातल्या शब्दांनी सुद्धा माझं लक्ष वेधून घेतलं होतं. कवी होते बा. भ. बोरकर.
नंतर काही वर्षांनी कॉलेज मध्ये असताना श्रीकांत पारगावकरांकडून, आनंद मोडकसरांनी संगीतबद्ध केलेलं,
डाळिंबीच्या डहाळीशी नको वार्यासवे झुलू
सदाफुलीच्या थाटात नको सांजवेळी फुलू
हे गाणं ऐकतांना,
नको घुसळू पाण्यात खडीसाखरेचे पाय
नको गोठवू ओठांत दाट अमृताची साय
या ओळींनी मी वेडा झालो. पुन्हा एकदा कवी- बा. भ. बोरकर.
मग मात्र मी झपाटल्यासारखा बोरकरांची कविता वाचायला लागलो आणि बोरकरांनी माझ्या मनाचा कायमचा ताबा घेतला. बाकीबाब म्हणजेच बा. भ. बोरकर ह्यांनी लिहिलेल्या प्रेमकवितेची मराठी काव्यविश्वात एक स्वतंत्र जागा आहे आणि माझ्या संगीतरचनांमध्ये बोरकरांच्या कवितांचा माझ्या मनात एक खास कप्पा आहे. बोरकरांची कधीही प्रत्यक्ष भेट न होता सुद्धा या रचनांमधून आमच्या खूप वेळा गप्पा होतात, असं वाटत राहतं.
बोरकरांच्या अनेक प्रेमकवितांची गाणी करण्याचा आनंद मी घेतला आणि आजही घेतोय, पण मी स्वरबद्ध केलेली बोरकरांची पहिली प्रेमकविता म्हणजे,
तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या दवबिंदुपरी त्रिभुवन हे डळमळले गं
प्रत्येक कवितेमधला कुठलातरी एक शब्द संगीतकाराचं बोट धरून त्याला आपल्या कवितेच्या महालात घेऊन जातो. या कवितेत माझ्यासाठी 'गं' ह्या अक्षरानी तो प्रवास सुरु केला. संगीतकाराला कवितेतल्या अक्षरांचा आकार (फॉन्ट) कळणं फार महत्वाचं आहे. कुठल्या शब्दांत किती वजन लपलं आहे, कोणतं अक्षर थोडंसं ताणलं तर कवितेचा डौल अजून वाढेल, कोणत्या अक्षरावर ठेहराव घेतला तर कवितेचा अर्थ अधोरेखित होऊ शकेल. ह्यासाठी भाषेवर प्रेम असणं किंबहुना भाषेचं वेड असणं खूप उपयोगाचं ठरतं. एका सुंदर स्त्रीच्या सुंदर डोळ्यांच्या सुंदर पापण्या हलल्या नंतर अख्ख विश्व डळमळलं, एखाद्या पानावरचा दवबिंदू थरथरावा तसं. बोरकर असाही अर्थ सांगत की 'दल हलले' म्हणजे अख्ख सैन्य चालून आलं अंगावर आणि मग-
तारे गळले वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले गिरी ढासळले
सुर कोसळले, ऋषी मुनी योगी चळले गं
ह्यातील दिग्गज आणि पंचानन म्हणजे काय ह्याविषयी अनेक वर्ष संभ्रम होता, जो दादरच्या एका कार्यक्रमात एका काकांनी 'दिग्गज आणि पंचानन' म्हणजे सिंह आणि हत्ती असा अर्थ सांगून कमी केला. जंगलातले प्राणी वळून वळून बघायला लागले.
ऋतुचक्राचे आस उडाले
आभाळातून शब्द निघाले
आवर आवर आपुले भाले, मीन जळी तळमळले गं
अशी सगळीच चक्र कोलमडून गेलेली असताना,
हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला भिडली
दो हृदयांची किमया घडली, पुनरपि जग सावरले गं
दोन हृदयांची भेट झाली आणि मगच सगळ्या त्रिभुवनांत चालू असलेला हा गोंधळ थांबला. इतकी समृद्ध शब्दकळा असली की स्वररचना सुद्धा स्वाभाविकपणे एखाद्या बंदिशीसारखी सुचते, किंबहुना ते शब्दच तुम्हाला त्या वाटेवर घेऊन जातात.
ह्या कवितेइतकीच माझी लाडकी असलेली बोरकरांची मधुराभक्तीची एक प्रेमकविता म्हणजे,
माझ्या कानी बाई वाजे अलगूज
सांगो जात तुज गुज सांगता न ये
अलगूज म्हणजे पावा. कृष्णाच्या प्रेमात वेडीपिशी झालेली राधा, तिला कानांत सतत कृष्णाची मुरली ऐकू येतीये, पण कोणाला कशी कळणार? आणि कोणाला काय सांगणार?
अशी अवस्था !!
देखावे ते डोळा दिसें बाई निळे
सोज्ज्वळें कोवळे वाचे वानिता न ये
सगळं निळं दिसतंय, सगळीकडे त्याचाच भास.. त्याचंच अस्तित्व जाणवतंय सतत सगळीकडे पण तो हातालाही लागत नाही आणि सोडत सुद्धा नाही आणि कोणाला सांगतासुद्धा येत नाही, कारण तो जाणवतोय फक्त तिला.
सुखानेही असा जीव कासावीस
तरी हा परीस दुरी सारता न ये
कासावीस करणारं सुख.. आनंद फक्त अनुभवता येतो.. पण कितीही कासावीस झालं तरी राधेला हवाहवासा वाटतो तो कृष्ण आणि आपल्या सगळ्यांना सुखाने कासावीस करणार्या या बोरकरांच्या प्रेमकविता !!
(संपादित)
सलील कुलकर्णी
सदर- कवितेचं गाणं होताना
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाईम्स (२ एप्रिल, २०१७)
(Referenced page was accessed on 08 August 2025)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.