ते नयन बोलले काहीतरी
ते नयन बोलले काहीतरी
मी खुळी हासले खुळ्यापरी
निळ्या नभापरी किंचित निळसर
नयन बोलके आणिक सुंदर
बघता बघता मीही क्षणभर
झाले ग बावरी
क्षण माझे मज मलाच न कळे
वसंत नयनी कधी दरवळे
तनुकोमल या वेलीवरले
फूल फुले अंतरी
मला हवे जे अतिमोहक ते
कसे अचानक जुळुनी येते
सांगाया मज लाज वाटते
संभ्रमांत क्षणभरी
मी खुळी हासले खुळ्यापरी
निळ्या नभापरी किंचित निळसर
नयन बोलके आणिक सुंदर
बघता बघता मीही क्षणभर
झाले ग बावरी
क्षण माझे मज मलाच न कळे
वसंत नयनी कधी दरवळे
तनुकोमल या वेलीवरले
फूल फुले अंतरी
मला हवे जे अतिमोहक ते
कसे अचानक जुळुनी येते
सांगाया मज लाज वाटते
संभ्रमांत क्षणभरी
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |
रमेश अणावकर यांच्याबद्दल व त्यांच्या गीताबद्दल बरंच काही सांगण्यासारखं आहे. त्यांची व माझी पहिली भेट वसंत प्रभूंच्या घरी झाली. वसंत प्रभूंची तब्येत त्या वेळी ठीक नव्हती. मी त्यांना भेटायला गेलो होतो. ते मला म्हणाले, "पुजारी, मी एक कवी तुमच्या हाती सोपवणार आहे. तो कवी म्हणजे रमेश अणावकर. तो माझा अत्यंत आवडीचा कवी आहे. तो लिहितो फार छान. मी त्याची दोन गाणी रेकॉर्ड केली आहेत व लता मंगेशकर व आशा भोसले यांनी गायली आहेत. पण आता मी थकलोय. माझी तब्येत बरोबर नसते. तुम्हाला माहितीच आहे की, तब्येतीचा व स्वरांचा फार जवळचा संबंध असतो. मला हवे ते स्वर मिळत नाहीत. त्यांना मी बोलावण्याचा प्रयत्न करतो पण ते येत नाहीत. तेव्हा हा माझा कवी मी तुमच्या ताब्यात देतो. त्याला मी योग्य संगीतकाराकडे देते आहे याचा मला आनंद होतोय. माझ्यासाठी तुम्ही त्याची गाणी स्वरबद्ध करून ती रेकॉर्ड करा."
"तुम्ही काळजी करू नका. मी त्यांच्या गीतांना जरूर चाली देईन. ज्याअर्थी तुमच्यासारखा मुरलेला संगीतकार सांगतो आहे तर त्यांचं काव्य नक्कीच चांगलं असणार."
मी त्यांचं रेकॉर्ड केलेलं पहिलं गाणं म्हणजे-
ते नयन बोलले काहितरी
मी खुळी हासले खुळ्यापरी
ते सुमन कल्याणपूरच्या आवाजात रेकॉर्ड केलं. त्यांच्या गीतांचा अनोखा ढंग आहे. अर्थाच्या दृष्टीनेही त्यांचं काव्य अतिशय चांगलं असतं.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.