तुझेच चिंतन करितो अनुदिन
एक तुझा मज ध्यास !
या प्राणांच्या क्षितिजावरती
भाग्यवती तू उषा उमलती
मम हृदयीच्या विरहतमाचा
करसी सहज निरास !
किती करावी प्रिये प्रतीक्षा?
प्रणायांधाला का ही शिक्षा?
दिशांदिशातुन अवकाशातुन
तुझे मधुर आभास !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | अरविंद पिळगांवकर |
नाटक | - | वासवदत्ता |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
अनुदिन | - | दररोज. |
उषा | - | पहाट. |
तम | - | अंधकार. |
निरास | - | दूर करणे. |
नंतर पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांची गाठ पडली. १९६७ साली ते संगीत वासवदत्ता नाटक करत होते. नायिका होत्या सुहासिनी मुळगावकर. त्यामुळे त्यांना कोणीतरी उंच नायक हवा होता, म्हणून माझी निवड झाली आणि नशिबाने मला पहिल्या नाटकात उभे केले ते अभिषेकीबुवांनी. त्यामुळे नाट्यसंगीत कसं गावं, ते बांधेसूद कसं असावं हे सुरुवातीपासूनच शिकायला मिळालं. आता जे म्हटलं जातं की परंपरा न मोडता अभिषेकींनी त्यात नावीन्य आणलं. तर ते कसं बघा-
जेव्हा 'नाथ हा माझा' हे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं पद गायलं जातं, तो यमन आहे, हे आपल्याला माहीत आहे. पूर्वी भूप, यमन, बागेश्री आदि सगळे प्रचलित रागच वापरले जायचे. नंतर अनवट राग ही यायला लागले. पण अभिषेकीबुवांनी सुरुवात केली ती यमन पासूनच. पुढे त्यांनी वेगळे प्रयोग केले. 'देवाघरचे ज्ञात कुणाला' या पदात त्यांनी सम ठेवलीय ती तीव्र मध्यमावर ठेवलीय. प्रथम त्यावरती थोडी टीका झाली विद्वानांच्या कडून. कारण गांधार-निषाद वादी संवादी, म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या तिथे सम हवी. पण अभिषेकीबुवांनी आकर्षक काय वाटेल याचा विचार करून तीव्र मध्यमावर सम ठेवली आणि ती लोकप्रिय झाली. म्हणजे त्यांनी वेगळी वाट निवडली. त्यामुळे साचेबंद जे काही झालं होतं की यमन म्हणजे असाच, भूप असाच गायचा, तर त्याला त्यांनी वेगळं वळण दिलं. असंच त्यांनी प्रत्येक रागात केलं. म्हणजे खमाज असेल, सारंग असेल, तुम्ही त्यांच्या रचना पाहिल्या तर त्याच्यामध्ये हे जाणवेल की राग जरी तेच असले तरी ते गाताना नावीन्य लक्षात येतं. आणि काही काही चाली तर अशाही झाल्यात की काय गावं याचा प्रश्न पडतो. पण बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की त्या प्रत्येक गाण्याला शास्त्रीय संगीताची डूब आहे. गायक कलाकार जर चांगला गाणारा असेल तर त्यांना त्या गाण्यातल्या नेमक्या जागा सापडतातच आणि कसं गाणं फुलवावं हे लक्षात येतं.
मला एक लक्षात आलंय की की जुन्या पद्धती प्रमाणे रागानुसार विस्तार करत अभिषेकीबुवांची पदं गाता येत नाहीत. त्याची बांधणीच वेगळी असल्याने ते जसं बांधलंय तसंच ते तुम्ही गायलात तर सुटेबल होतं. नाहीतर काय होतं, रचना वेगळ्या तर्हेची आणि त्याचा परिपोष राग विस्ताराप्रमाणे, जुन्या पद्धतीने होतो ते जरा विसंगत वाटतं. त्यामुळे अभिषेकीबुवांच्या चाली गाताना हे खूप लक्षात ठेवलं पाहिजे. राग जरी तोच असला तरी त्याच्यात त्यांनी काय वेगळेपणा दाखवलंय ते लक्षात घेऊन गायलात, तर ते गाणं यशस्वी होणारच. त्यामुळे त्यांचं जे एक आकर्षण आहे, ते पुढच्या पिढीपर्यंत पोचले आहे, असं मला वाटतं.
"प्रसंगाला परिपोष होईल एवढंच गायचं. जास्त गाऊ नका. आपली विद्वत्ता गाण्यात दाखवायची नाही. थोडासा इकडेतिकडे विस्तार करून ७-८ मिनिटात गाणं संपवायचं." बहुतेक सर्व ठरवूनच असायचं. पहिले काही प्रयोग जरा चाचपड असत. मग अंदाज येतो आणि समजतं कोणतं गाणं किती फुलावायचं ते. काही गाणी भावगीतांप्रमाणे असतात, १-२ कडव्यांची. ती तितपतच गायची. बाहेर मैफलीत तुम्ही विस्ताराने गा. पण नाटकात नाही. कारण मग नाट्य प्रयोग थांबून राहतो. म्हणजे नाटक मागे पडून गायन पुढे येते. पूर्वी असे होत असे. अभिषेकीबुवांनी असं ठरवलं की प्रसंगाला उचित तेवढंच गायचं व ते इतकं परिणामकारक झालं पाहिजे की त्या प्रसंगाला त्यातून उठाव यावा. स्टेजवर तुम्ही एकटेच आहात तर थोडं इकडेतिकडे चालू शकतं पण भोवती ५/६ पात्रं आहेत आणि तुम्ही एकटेच गात बसलात तर ते कंटाळवाणं होण्याची शक्यता असते. त्यामुळे आटोपशीर आणि परिणामकारक गायन महत्त्वाचं आहे.
आता नवीन मुलांना आम्ही हेच शिकवतो. तुमचं बैठकीचं गाणं कितीही तयारीचं असलं तरी इथे मात्र फरक पडतो. उभं राहून गाण्यात आवाजाची फेक कशी पाहिजे, हातवारे कसे करायचे ते शिकवावं लागतं. कारण बैठकीत आपण जसे हातवारे करतो, डोळे मिटून गातो तसं इथे रंगभूमीवर चालत नाही. हे पथ्य इथे फार पाळावं लागतं.
एक मुख्य गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नाट्यसंगीत ज्याला म्हणतात, त्यात नाट्य असते. काहीतरी आपण सांगायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यातूनच कथानक पुढे जाते. माझ्या मनात आत्ता काय आहे, ते मी जर बोलता बोलता गायला लागलो, तर कसं होईल तसं हे नाट्यसंगीत असतं. थोडी अन्-नॅचरल स्थिती आहे. त्या पदातून कोणता भाव गेला पाहिजे, याची जाण असावी लागते. 'युवती मना' किंवा 'चंद्रिका ही जणू' गातानाचा भाव, 'कधी भेटेन वनवासी रामचंद्राला' हे पद गाताना उपयोगाचा नाही. हळुवार पद्धतीची गाणी हळुवारपणे, तर वीरश्रीयुक्त गाणी जोरकसपणे गाता यायला हवीत. त्यात भाव महत्त्वाचा असतो, तुमची तयारी दाखवून उपयोग नसतो. नाहीतर त्या पदाचा रंग बिघडण्याची शक्यता असते. हे जाणूनच नाट्यसंगीत गायला हवे.
(संपादित)
अरविंद पिळगांवकर
संगीत रंगभूमीचा मागोवा- स्वरनाट्य रसगंगा (अर्चना साने, यशश्री पुणेकर)
(शतकोत्तर रौप्य महोत्सव, विशेष प्रकाशन)
सौजन्य- भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.