A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्या मनात कुणीतरी लपलं

तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग
किती जरी आजवर जपलं ग

कधी न दिला डोळ्याला डोळा
स्वभाव अगदी साधा भोळा
कसा सुचावा भलता चाळा
परि दैव खुदुखुदु हसलं ग

कसा धरावा सखे भरवसा
पळे न कुठवर बाई ग ससा
प्रीतपारधी येईल सहसा
कसं अचुक सावज फसलं ग

मदनदूत पिटतील डांगोरा
मनोगते ही सांगति चोरा
मनमोरा नाचसी माजोरा
कुणि नव्हेच बाई अपलं ग

तेच नाव ओठांवर यावे
तेच बोल कानांत घुमावे
तेच रूप नयनांत भरावे
ते गुपित अम्हांला कळलं ग !
राजाभाऊंनी लिहिलेल्या 'हसले मनि चांदणे', 'माझिया माहेरा जा' या दोन गीतांबद्दल स. ह. देशपांडे व मंगला गोडबोले लिखित पुलंवरील समग्रदर्शनच्या दुसर्‍या खंडात 'संगीत' या विषयासंबंधी लिहिताना म्हटले आहे की,

'तुझ्या मनात कुणितरी हसलं गंड हे आणखी एक सुंदर गीत. प्रसन्नतेच्या भावस्थितीनुसार याची लय द्रुत आहे. या भावस्थितीला अनुकूल अशी 'पंजाबी पहाडी' रागाची बैठक गीताला दिलेली आहे. ही चाल पूर्वसंस्कारांतून आलेली आहे. 'एकला नयनाला विषय' (स्वयंवर) आणि 'मजवरी तयांचे प्रेम खरे' (संशयकल्लोळ) या नाट्यपदांची पार्श्वभूमी या चालीमागे आहे. वरील दोन्ही चाली मा. कृष्णरावांच्याच. पहिली चाल गायकीकडे झुकलेली, दुसरी देवलप्रणीत प्रासादिकतेकडे वळलेली. या दोन्ही चालींचा मनोज्ञ संगम प्रतिभेच्या स्तरावर या ठिकाणी पुलंनी केला आहे. यातील तानलडी जितक्या कल्पक व मनोहर आहेत तितक्याच चालींमध्ये व्यामिश्रतेचे सौंदर्य (Complexity) निर्माण करणार्‍या आहेत. कडव्यांची चाल-बदल भावानुकूल आहे. या गीताला माणिकबाईच योग्य होत्या.
(संपादित)

गंगाधर महाम्बरे
'कविश्रेष्ठ राजा बढे- व्यक्ती आणि वाङ्मय' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.