A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्या नभाला गडे किनारे

तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही !
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही !

जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा,
खुली व्यथांची सताड दारे अजून काही !

तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही !

गडे मला सांग तूच माझीतुझी वदंता
विचारते गाव हे बिचारे अजून काही !

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची,
रणात आहेत झुंजणारे अजून काही !

विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही !
गीत - सुरेश भट
संगीत -
स्वर- सुरेश भट
गीत प्रकार - कविता
वदंता - अफवा.
जीवनातल्या दु:खाच्या गदारोळात कवीच्या जीवनात दोनच अद्भुत घटना घडत असतात की, ज्या कवीच्या जगण्याला, तसाच शब्दांना खोल अर्थ देऊ शकतात. पहिली म्हणजे क्रांती आणि दुसरी प्रीती. क्रांती आणि प्रीती या दोनच मूल्यांवर कवीची (सुरेश भट) निस्सीम श्रद्धा आहे. येणार्‍या उज्‍ज्‍वल भविष्याच्या दिशेने त्याने मान उंचावली आहे. प्रेम नावाची एक विलक्षण शक्ती जीवनात लाभते या जाणिवेने त्याचे अंत:करण नेहमीच दरवळलेले आहे. क्रांतीवरचा विश्वास आणि प्रीतीची ओढ या दोन भावनांमुळे सुरेश भटांच्या गझलेमधले काळेकुट्ट दु:ख पुन्हा पुन्हा उजळून निघते आहे. या दोन भावनांमुळेच त्यांची गझल एकसुरी झालेली नाही. पुन्हा पुन्हा कवीची जीवनावरची श्रद्धा त्याला दु:खाच्या गुंताड्यातून सोडवून बाहेरच्या शुद्ध मोकळ्या हवेत आणते आहे. हा एक प्रकारचा त्यांच्या आत्म्यातला अंधारप्रकाशाचा खेळच चाललेला आहे आणि तो त्यांच्या प्रत्येक गझलेमधून प्रकर्षाने प्रगट झाला आहे. हा आत्मिक संघर्ष हाच त्यांच्या गझलचा खरा प्राण आहे. त्यामुळेच त्यांच्या एकाच गझलमध्ये एकाच वेळी अनेक भावनांची विविधरंगी चित्रे आपणाला पाहावयास सापडतात.

'अजून काही' ही संपूर्ण गझल या दृष्टीने विचारात घ्यावयास काही हरकत नाही. (तसे पाहायचे झाले तर त्यांची प्रत्येक गझल या दृष्टीने विचारात घ्यायला काही हरकत नाही.)
या एका सरळ, साध्या, सुगम अशा गझलमध्ये सुरेश भटांचे संपूर्ण व्यक्तित्व प्रतिबिंबित झाले आहे. त्यात प्रेमाच्या मधुर आठवणी आल्या आहेत. कवीच्या वाट्याला दु:ख, पराभव आणि फसवणूक आली आहे. पुन्हा पुन्हा जगून आणि लढून पाहण्याची ईर्षा आली आहे. ज्या मूल्यासाठी माणूस जगतो त्या मूल्यांवरची निस्सीम श्रद्धाही आली आहे. प्रत्येक द्विपदी ही एक स्वतंत्र भावना आहे. जी गझलरचनेत सुरेश भटांना अभिप्रेत आहे. एका कल्पनेकडून दुसर्‍या कल्पनेकडे स्वैर संचार आहे आणि तरीही समग्र गझल मिळून त्यांच्यातील आशावादाचा एक एकसंध परिणाम आला आहे. हा एकसंध परिणाम साधण्यात ज्या अनुक्रमाने सुरेश भट आपल्या द्विपदींची गझलेत बांधणी करतात त्या अनुक्रमाचा वाटा फार मोठा आहे. त्यांनी जिचा आग्रहाने पुरस्कार केला ती प्रतीकांची भाषाही येथे आली आहे. 'सणाणती बंडखोर वारे', 'फुलांचा सुरूच हेका', 'विझायचे राहिले निखारे',..

गझलचे रूप, आकार, भाषा, डौल कसा असायला हवा ते वानगीसाखल दिलेल्या या एका गझलेत संपूर्णपणे प्रत्ययास येते.
(संपादित)

शिरीष पै
'सुरेश भट ह्यांची निवडक कविता' या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर

  इतर संदर्भ लेख