A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उघड्या पुन्हा जहाल्या

उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या
फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या

येऊ कशी निघोनी पाऊल अडखळे
विरहात वेचिताना घटना सुखातल्या

उठता तरंग देही हळुवार भावनांचे
स्मरतात त्या अजुनी भेटी वनातल्या

हासोनिया खुणावी ती रात रंगलेली
तू मोजिल्यास होत्या तारा नभातल्या
शोभा गुर्टू यांचं रेकॉर्डिंग करायचं ठरलं. त्यावेळी त्यांच्या प्रोग्रॅमची एक टेप कुठून तरी हस्तगत केली. निवांत वेळी ती लक्षपूर्वक मी ऐकली. या बाईच्या गळ्यातून काय निघेल याचं निरीक्षण केलं. एका उर्दू गजलला मी केलेली तर्ज काणेकरांना ऐकवली. मूळ गजलचे शब्द असे होते. 'महका है जखम जखम हवाएं है मनचली । बरसा है तेरी याद का सावन गलीगली' काणेकरांनी या मिटरवर गाणं लिहिलं 'उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या । फुलवी तुझ्या स्मृतीच्या कलिका मनातल्या'.

उर्दूवाली गजल काफियावाली होती म्हणून त्यांनी तशी लिहिली. या गजलला गैर-मुरद्दीफ गजल कहते है. जिच्यात रदीफ नसतो.

शोभाताईंची पहिलीच मराठी गजल खूप गाजली.

रेकॉर्डची एक बाजू साडेसहा मिनिटांची झाली की दुसरी बाजू तीन-तीन मिनिटांची असते. दुसर्‍या बाजूला, 'छेडिले ग, माझ्या मनी न होते' नि 'बोल कन्हैया का रूसला राधेवरी'.

ही रेकॉर्ड स्टॉक संपेपर्यंत खपली नि दुसरी-तिसरी ऑर्डर बुक्ड् झाली.
(संपादित)

श्रीकांत ठाकरे
'जसं घडलं तसं' या श्रीकांत ठाकरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- चिनार पब्लिशर्स, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.