A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उजळू स्मृती कशाला

उजळू स्मृती कशाला अश्रूंत दाटलेली?
सांगू कशी कहाणी स्वप्‍नात रंगलेली?

आतूर लोचनांचे ते लाजरे बहाणे
मौनात साठलेले हितगूजही दिवाणे
नाती मनामनाची भाषेविनाच जुळली

ते फूल भावनेचे कोषात आज सुकले
संगीत अंतरीचे ओठी विरून गेले
हृदयास जाळणारी आता व्यथाच उरली

तू दाविलेस सखया मज चित्र नंदनाचे
उधळून तेच गेले संचित जीवनाचे
आता कुठे किनारा? माझी दिशाच चुकली !
नंदन - पुत्र / इंद्राचे नंदनवन.
संचित - पूर्वजन्मीचे पापपुण्य.
हितगूज - हिताची गुप्‍त गोष्ट.
खाजगी ध्वनिमुद्रिकांसाठी लिहिता लिहिता चित्रपटगीतांच्या क्षेत्रातही माझा प्रवेश झाला तो एका योगायोगानेच. 'आम्ही जातो अमुच्या गावा' या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांनी गाणी लिहिली आहेत. संगीतकार सुधीर फडके यांनी त्यांची पाच गाणी ध्वनिमुद्रित केली. एकच गाणं राहिलं होतं. पण खेबुडकर अचानक आजारी पडले. त्यामुळे त्यांच्याकडून गाणं मिळणं शक्यच नव्हतं. ठरलेलं ध्वनिमुद्रण रद्द करता येत नव्हतं. चित्रपटाचे दिग्दर्शक कमलाकर तोरणे अस्वस्थ झाले. त्यांना काय वाटले कुणास ठाऊक. ते माझ्याकडे आले नि त्यांनी माझी गाण्यांची वही मागितली. बराच वेळ ते वही चाळत होते. अचानक त्यांना एक गाणं सापडलं. त्यांनी ते पुन्हा पुन्हा वाचलं नि म्हणाले, "वंदनाबाई, हे गाणं मला लिहून द्या. माझ्या चित्रपटातल्या प्रसंगाला अगदी अनुरूप आहे."
मी विचारलं, "कुठला प्रसंग?"
पण ते न सांगताच ते घाईघाईने म्हणाले, "उद्याच रेकॉर्डिंग आहे बॉम्बे लॅबला. तुम्ही आलंच पाहिजे बरं का !"
मी काही बोलण्यापूर्वीच ते निघून गेले.

दुसर्‍या दिवशी खरंच माझ्या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं. सुधीर फडक्यांची भावमधुर चाल आणि आशा भोसलेंची बहारदार रसीली गायकी यांचा अपूर्व संगम होता तो !

उजळू स्मृती कशाला अश्रूंत दाटलेली?
सांगू कशी कहाणी स्वप्‍नात रंगलेली?

मध्यंतरी बराच काळ निघून गेला. एका सुप्रभाती मला ती शुभवार्ता समजली. 'आम्ही जातो अमुच्या गावा' या चित्रपटातल्या माझ्या त्या गाण्याला त्या वर्षीचं उत्‍कृष्ट गीताचं पारितोषिक मिळालं होतं. चित्रपटातलं माझं पहिलंच गाणं नि त्याला सर्वोत्‍कृष्ट गाण्याचं पारितोषिक? माझ्या आयुष्यातली अगदी आघटित घटना ! अर्थात थोर संगीतकार सुधीर फडके आणि स्वरकिन्‍नरी आशा भोसले यांच्या प्रतिभेची पुण्याईची मला हे यश देऊन गेली हेच खरं.
(संपादित)

वंदना विटणकर
'हे गीत जीवनाचे' या गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.