तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ॥१॥
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी ।
दैत्या घरीं रक्षी प्रह्लादासी ॥२॥
चर्म रंगूं लागे रोहिदासा संगे ।
कबिराचे मागे विणी शेले ॥३॥
सजनकसाया विकुं लागे मास ।
मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥४॥
नरहरिसोनारा घडों फुकुं लागे ।
चोख्यामेळ्या संगे ढोरें ओढी ॥५॥
नामयाच्या जनीसवे वेची शेणी ।
धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥६॥
नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित ।
ज्ञानियाची भिंत अंगीं ओढी ॥७॥
अर्जुनाचीं घोडीं हाकी हा सारथी ।
भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ॥८॥
गौळियांचे घरीं अंगे गाइ वळी ।
द्वारपाळ बळी द्वारीं जाला ॥९॥
यंकोबाचें ऋण फेडी हृषिकेशी ।
आंबऋषीचे सोशी गर्भवास ॥१०॥
मीराबाइं साठी घेतो विषप्याला ।
दामाजीचा जाला पाडेवार ॥११॥
घडी माती वाहे गोर्या कुंभाराची ।
हुंडी मेहत्याची अंगे भरी ॥१२॥
पुंडलिकासाठीं अजुनि तिष्ठत ।
तुका ह्मणे मात धन्य त्याची ॥१३॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | स्नेहल भाटकर |
चित्रपट | - | तुका झालासे कळस |
गीत प्रकार | - | चित्रगीत, संतवाणी |
प्रह्लाद | - | हिरण्यकशिपू पुत्र. याच्या रक्षणार्थ विष्णूने नारसिंहावतार घेऊन हिरण्यकशिपूस मारिले. |
पाडेवार | - | महार. |
विदुर | - | विचित्रवीर्याच्या अंबिकानामक भार्येच्या दासीला व्यासापासून झालेला पुत्र. हा नि:पक्षपाती, न्यायी व शहाणा होता. |
शेणी | - | गोवरी, वाळलेला शेणाचा गोळा. |
संत तुकाराम आपल्या खालील अभंगातून सांगतात-
उंचनिंच कांहीं नेणे भगवंत । तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ॥
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रह्लादासी ॥
चर्म रंगूं लागे रोहिदासा संगे । कबिराचे मागे विणी शेले ॥
सजनकसाया विकुं लागे मास ।मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥
खरे तर हा अभंग फार मोठा आहे, पण उदाहरणादाखल निवडक चरण येथे दिले आहेत. देवाच्या दरबारात जातीपातीला कोणताही थारा नाही, तेथे तुमचा भक्तिभावच महत्त्वाचा आहे, असे संतांनी उच्चरवाने सांगितले आहे. प्रत्येक जातीशी कोणतातरी व्यवसाय निगडित आहे आणि आजच्या सुशिक्षित व सुसंस्कृत वातावरणातील पिढी जातीपातीला फारसे महत्व देत नसली, तरी व्यवसायनिष्ठ उच्चनीच भावना आपल्या मनातून हद्दपार करू शकली आहे, असे अनुभवास येत नाही. उलट एखाद्याच्या व्यवसायाचा उल्लेख करून त्याच्यावर टीकाटिप्पणी आजही केली जाते. भगवंताच्या दरबारातील समरसतेची काही उदाहरणे.
जुन्या काळातील कसायाचा धंदाही असाच. बर्याचशा नाटकांत आणि चित्रपटांतही 'बाप आहे का कसाई?' अशासारखे संवाद आपल्याला आढळतात. अशा वाक्यातून सदरचा व्यवसाय कनिष्ठ अथवा हीन प्रतीचा आहे, अशी भावना ऐकणार्याच्या मनावर नकळत बिंबविली जाते. अशा वेळी आपल्याला संतचरित्रांतील कथा कशा मार्गदर्शक ठरतात, ते पाहू या.
भक्त सदन अथवा सजन कसाई यांची कथा खूप प्रसिद्ध आहे. कसायाच्या घरी जन्मास आल्यामुळे त्यांना आपला कसायाचा व्यवसाय पुढे चालविणे भाग होते. त्यामुळे ते प्राप्त कर्म समजून आपला मांसविक्रीचा व्यवसाय करीत असत. त्यांच्याकडे तराजूच्या पारड्यात ठेवण्यासाठी वजनाचे माप उपलब्ध नसल्यामुळे ते शाळिग्राम स्वरूपातील महाविष्णूलाच दगड समजून मांस तोलून विकण्यासाठी त्याचा वापर करीत असत. एके दिवशी एक साधू त्यांच्या दुकानासमोरून चालला असताना कर्मधर्मसंयोगाने त्याची नजर त्या शाळिग्रामाकडे गेली. एक कसाई मांसविक्रीसाठी वजन म्हणून पवित्र शाळिग्रामाचा वापर करतो, हे पाहून त्यांना मनस्वी खेद झाला. अशा अपवित्र ठिकाणी तो शाळिग्राम असता कामा नये या भावनेने त्यांनी सजन कसायास तो दगड मागितला. संताने आपल्याकडे काही मागावे, हा भावनेने आनंदित झालेल्या सजन कसायाने मागचा-पुढचा विचार न करता त्या साधूकडे तो शाळिग्राम ताबडतोब सोपविला.
साधूने पवित्र गंगाजलाने तो शाळिग्राम स्वच्छ करून त्याची आपल्या देवघरात स्थापना केली. पण त्याच रात्री भगवंताने त्याला स्वप्नातून दृष्टान्त दिला. भगवंत म्हणाले, "आपण मला माझ्या भक्ताकडून आणून येथे का बरे ठेवले आहे? मी माझ्या भक्ताच्या संगतीला यामुळे वंचित झालो आहे. जेव्हा जेव्हा माझा भक्त मांस तोलण्यासाठी मला हातात घेत असे, तेव्हा तेव्हा त्याच्या हाताच्या स्पर्शाने मला आनंद होत असे. त्याच्या मुखातून नामसंकीर्तन ऐकून मला ब्रह्मानंद होत असे. मला तुझ्याकडे मुळीच चैन पडत नाही. मला ताबडतोब माझ्या भक्ताच्या स्वाधीन कर !"
साधूमहाराजांनी ताबडतोब आपल्या देवघरातून तो शाळिग्राम उचलला आणि सजन कसायाकडे जाऊन त्याच्याकडे पुन्हा सोपविला. सजन कसायाने त्याला याचे कारण विचारले, तेव्हा साधू महाराज म्हणाले, "सजना, हा साक्षात भगवंत आहे ! त्याला तुझीच संगती आवडते, त्यामुळे मी त्याला पुन्हा तुझ्याकडे आणले आहे."
या सजन कसायाच्या कथेत आणखी चमत्काराचे वर्णन आहे, पण त्याचा उल्लेख येथे करण्याचे कारण नाही. भगवंताचे दुसरे भक्त सावता माळी यांची कथा प्रसिद्धच आहे. आपल्याला संत रोहिदास चांभार माहीत आहेत, पण संत रामदास चांभार हे महान भगवद्भक्त गोदावरीच्या तिरावरील कनकावती नगरीत राहत होते. ज्याप्रमाणे सजन कसाई मांसविक्रीसाठी भगवान शाळिग्रामाचा वजनाप्रमाणे उपयोग करीत, त्याचप्रमाणे आपल्या हत्यारांना धार लावण्यासाठी रामदास चांभार शाळिग्राम दगड म्हणून वापरत असत. गावातील पंडिताने त्यांचे कृत्य पाहून तो दगड मागून नेला व आपल्या देवघरात त्याची स्थापना केली.
पण भगवंताने पंडिताच्या स्वप्नात जाऊन त्यांना दृष्टान्त दिला. भगवंत म्हणाले, "पंडितजी, तुमची ही अवडंबरयुक्त पूजा मला नको आहे. माझा भक्त आपली हत्यारे धार लावण्यासाठी माझा उपयोग करतो तीच मला त्याने निष्कपट भावनेने केलेली पूजा वाटते. मला माझ्या भक्ताचा वियोग सहन होत नाही. मला पुन्हा रामदास चांभाराच्या दुकानात नेऊन त्याच्या स्वाधीन करा !"
पंडिताने तो शाळिग्राम रामदास चांभाराच्या स्वाधीन करून सांगितले की, "हा साधा दगड नसून साक्षात भगवंत आहे. त्याच्याच इच्छेने मी हा परत करीत आहे."
हे ऐकून रामदास चांभारांनी शाळिग्रामाची देवघरात स्थापना केली आणि ते म्हणाले, "हे भगवंता, मी नीच जातीतील माणसाने तुझी उपेक्षा केल्यामुळे तू मला दर्शन न देता केवळ त्या ब्राह्मणास दर्शन दिले ! तू सुद्धा माझी उपेक्षा केलीस याचा मला खेद होतो. मला माझ्या अपराधांची क्षमा कर."
आपल्या भक्ताचे हा शोक आणि खेद पाहून भगवंताने त्याला दर्शन दिले. भगवंत म्हणाले, "रामदास ! मी आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करीत नाही. तू जातीचा चांभार असलास तरी तू ब्राह्मणच नव्हे, तर देवतांसाठीही पूज्य आहेस !"
वाचकहो ! या लेखातील कथा आपणास चमत्कार वाटतील, पण मला तसे वाटत नाही. कारण या सर्व कथांतून भगवंत स्वमुखाने सांगतो, "मला कोणत्याही प्रकारचा उच्चनीच भेदभाव मान्य नाही. ज्याचा भाव आणि भक्ती महान आहे, तोच माझा महान भगवद्भक्त आहे, एवढेच मी जाणतो."
अशी अगणित उदाहरणे आपल्याला सापडतात. ही उदाहरणे समाजासमोर ठेवून समरसतेची रेषा अधिक ठळक आणि वृद्धिंगत करणे, हेच समाजसंघटक संतांनी आपले जीवनकर्तव्य मानले होते, हेच खरे !
(संपादित)
सौजन्य- साप्ताहिक विवेक (२१ मे, २०२१)
(Referenced page was accessed on 30 June 2025)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.