A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उसळत तेज भरे

उसळत तेज भरे गगनांत
उजळे मंदिर शिखर विराजे सोनेरी किरणांत !

गाभार्‍यातील मूर्ति चिमुकली न्हाली नव तेजात
प्रांगणातले तरु मोहरले पसरे गंध दिशांत

उत्साहाचे भरले वारे पवनाच्या हृदयात
ओढ लागली त्या तेजाची मम जीवा विरहात

हृदय परि का अजुनी माझे फिरते अंधारात?
उजळिल अंतर कधी 'निरंतर' घेउनि निजरूपात?
गीत - शांताराम आठवले
संगीत - केशवराव भोळे
स्वर- शांता हुबळीकर
चित्रपट - माझा मुलगा (१९३८)
ताल-केरवा (मात्रा- ४)
गीत प्रकार - चित्रगीत
गाभारा - देवालयात देवाची मूर्ती असते तो अंतर्भाग.
विराजणे - शोभणे.
'कुंकू' या 'प्रभात'च्या चित्रपटामध्ये तरुण नायक नव्हता. त्यानंतरच्या 'माझा मुलगा'ने तो ध्येयवादी तरुण भारताला नजर करून 'देवदास'पेक्षा वेगळा असा, महाराष्ट्रीय ध्येयवादाचा नमूना सादर केला. हे 'प्रभात'चे वेगळेपण ! कथा त्या काळचीच असल्याने तरुण सुशिक्षित लोकांमध्ये तेव्हा लोकप्रिय असलेले भावगीत व त्याचे गायन चित्रपटात घालायचे ठरले. चित्रपटाची नायिका 'नलिनी' ही स्वत: कवयित्री असल्यामुळे तिची गाणी रचताना शांताराम आठवल्यांना तिच्या स्वभावाचा, तिच्या आवडीनिवडींचा, मन:प्रवृत्तींचा, तिच्या बोलण्याचालण्याचा, तिच्या सौंदर्यदृष्टीचा पूर्ण आवाका जाणूनच तिची भावगीते लिहावी लागली. तिची चार भावगीते ही तिच्या चित्रपटाचा नायक दिवाकरावरील प्रेमाच्या चार अवस्थांची निदर्शक म्हणूनच त्यांनी रचली.

नलिनीची आत्या तिला विचारते, "काय ग नलू, दिवाकरानं एवढी काय मोहिनी घातली आहे तुला?"
"ते कुणाला ठाऊक !" विलक्षण हातवारे करीत नलिनी उद्गारते. "तेवता दिवा जशी आपल्याकडे आपली नजर खेचून घेतो त्याप्रमाणे दिवाकरांचं आयुष्य जिवंत वाटतं मला !
उसळत तेज भरे गगनांत
उजळे मंदिर शिखर विराजे, सोनेरी किरणांत !"

अशा ओघात वरील गाणे सुरू होते. दिवाकराच्या ध्येयवादाने, त्या जिवंत तेजस्वी जीवनाच्या ध्येयवादाने, तिला आकर्षून घेतलेले असते. त्या विचारात तिला ते तेज गगनात भरून पसरलेले दिसते. गाभार्‍यांतील चिमुकली मूर्ती त्या नवतेजाने न्हालेली असते. चराचरसृष्टी तिला उत्साहाने भरलेली दिसते. पण अजुनी माझे हृदय अंधारात का फिरते आहे, ते तेज माझे अंतर उजळून निजरूपांत निरंतर येऊन आत्मसात का करत नाही, हा प्रश्‍न तिला पडतो ! प्रेमाची तिसरी पायरी ती ओलांडते. आता फक्त 'स्व'ला पूर्णपणे विसरून सर्वस्वाचा त्याग करून दिवाकराशी दीप-पतंग न्यायाप्रमाणे एकरूप व्हायचे असते. त्याकरिता तिला काही प्रसंगांतून जाण्याचे दिव्य करायचे असते. दिवाकराच्या तेजाचे स्वरूप या गाण्यातील चढ्या रंगतीच्या कल्पनांनी वर्णन करून त्याला शांताराम आठवले यांनी शब्दांत साकार केले आहे. या भावगीताची रचना करण्यापूर्वी आठवले रविंद्रनाथ टागोरांचे 'गार्डनर' घेऊन सारखे वाचीत होते, मनात घोळवीत होते. मधूनमधून भा. रा. तांब्यांच्या कवितांचेही सेवन चालूच होते. या व्यासंगाचे फळ म्हणूनच काय, 'उसळत तेज भरे' व 'पाहू रे किती वाट' अशी दोन भावगीते त्यांनी रचली. प्रेम या शब्दाचा यत्किंचितही उपयोग न करता, दिव्य प्रेमाने थबथबलेली ही दोन अर्थपूर्ण भावगीते म्हणजे आठवल्यांच्या व्यासंगपूर्ण परिणत प्रतिभेची सुमधु फले होत. दोन्ही गाण्यांचे प्रसंगही तितकेच बहारीचे आणि म्हणणारे पात्र नलिनी स्वत: कवयित्री, सुशिक्षित तरुणी असल्यानेच ही रचना होऊ शकली. मला स्वत:ला 'उसळत तेज भरे' हे भावगीत फारच आवडते व त्याकाळी मैफलीत ते मी नेहमी म्हणत असे.

या गाण्याच्या चालीबद्दल शांतारामबापू म्हणाले, "बैरागी पहाटे गाणे म्हणत जातात तशी चाल हवी." मला यातून निश्चित काही बोध होईना. तेव्हा काळ्यांना आणि आठवल्यांनी ही बैराग्याची भानगड मी विचारली. ते म्हणाले, "अहो, 'सोच समझ नादान' अशी उपदेशपूर्ण गाणी बैरागी पहाटेस म्हणतात, ती म्हणायची असतील त्यांना."

दिवाकराचे तेजस्वी जीवन व्यक्त करणारी स्वररचना हवी म्हणून माझ्याजवळ असलेला मीराबाईचा भजनसंग्रह मी काढला व त्यातले 'गिरिधर झुलत राधासंग' या भजनाचे वृत्त मी निवडले. काय असेल ते असो. मला एकदम 'स्वयंवर' नाटकातल्या तिलककामोद रागातल्या 'मम सुखाची ठेव देवा' या उदात्त भावाच्या पदाची आठवण झाली आणि याच उदात्त रागात हे भजन बसवून चाल करायला मी सुरुवात केली. अर्ध्या तासात अस्ताई-अंतरा तयार झाल्यावर तो नेहमीप्रणाणे आधी आठवल्यांना म्हणून दाखवला. मग ही 'बैराग्याची चाल' लगेच शांतारामबापूंना म्हणून दाखविली. आपल्या कल्पनेबरहुकूम ती चाल झाल्याचे ते म्हणाले !

गाण्याला भजनी संप्रदायातील मणिपुरी मृदंगाची ब मंजिर्‍यांची साथ दिल्याने मंदिर, शिखर, गाभारा, मूर्ती, प्रांगण इत्यादी शब्दांबरोबर येणारी सर्व दृश्ये व भाव पूर्णपणे प्रगट होऊन त्यांच्याशी निगडित असलेले पवित्र वातावरण गायनात निर्माण होई. उत्तम कविता, त्याची रसानुकूल चाल, अनुरूप साथ, रसोत्पादक मुरक्य-तानांसह गायन, यांनी केवढे सच्चे वातावरण निर्माण करता येते याचा मी अनुभव घेतला.
(संपादित)

केशवराव भोळे
माझे संगीत- रचना आणि दिग्‍दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.