A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उषःकाल होता होता

उषःकाल होता होता काळरात्र झाली!
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली!

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली!

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी!
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली!

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
अम्हावरी संसारची उडे धूळमाती!
आम्ही ती स्मशाने- ज्यांना प्रेतही न वाली!

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली!

उभा देश झाला आता एक बंदिशाला,
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला!
कसे पुण्य दुर्दैवी अन्‌ पाप भाग्यशाली!

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे!
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली!
गीत- सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वराविष्कार - आशा भोसले , रवींद्र साठे
अरुण दाते
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट- सिंहासन
गीत प्रकार - चित्रगीत स्फूर्ती गीत
  
टीप -
• स्वर- आशा भोसले, रवींद्र साठे, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट- सिंहासन.
• स्वर- अरुण दाते, संगीत- यशवंत देव.
पखाल - पाणी भरण्याची चामड्याची मोठी पिशवी.

 

  आशा भोसले, रवींद्र साठे
  अरुण दाते