A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वेद अनंत बोलिला

वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाचि साधिला ॥१॥

विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावें ॥२॥

सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतुकाचि निर्धार ॥३॥

अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हाचि होत ॥४॥
वेदाने अनंत गोष्टी सांगितल्या आहेत, पण त्या सार्‍यांचा सारांश हाच की विठोबाला शरण जावं आणि निष्ठेने त्याचेच गुण गावे. सर्व शास्त्रांचा अभ्यास केल्यावर शेवटी हाच निर्धार पक्का होतो. तुकाराम महाराज सांगतात की अठरा पुराणांनीही हाच सिद्धांत मांडला आहे.

तुकाराम महाराजांच्या काळात वेद हेच ज्ञान समजलं जात होतं. हे वेद संस्कृतमध्ये होते. संस्कृत ही फक्त पंडितांची भाषा होती. सामान्यांना वेद वाचण्याचा अधिकार नव्हता. आणि त्यामुळे वेदातलं ज्ञान ज्यांना माहिती आहे ते सांगतील तो देव, ते सांगतील तो धर्म, ते करायला लावतील ते कर्म अशी स्थिती होती. बहुजनांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची देवाधर्माच्या नावावर लुट होत होती. याशिवाय अनेक पुराणं रचली गेली. अनेक कर्मकांडं निर्माण करण्यात आली. त्या सर्वांचा हेतू एकच होता. आणि तो म्हणजे लोकांना भ्रामक कथा सांगून त्यांना आपलं श्रेष्ठत्व मान्य करायला लावायचं. आणि त्या बळावर स्वत: कोणतेही कष्ट न करता मजेत जगायचं. यातूनच हजारो देवांची निर्मिती झाली. वेद सामान्यांना अप्राप्य असल्याने वेदांबद्दल एक भीतीयुक्त आदर सामान्यांच्या मनात होता. कुतूहल होतं. पण ते स्वत:ला वाचता येत नसल्याने वाचणारे जे सांगतील त्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. वारकरी विचार ही सर्व कर्मकांडं नाकारतो. फक्त विठोबाचीच भक्ती करतो. सर्व जगाचा निर्मिक एकच आहे, म्हणून 'एका विठ्ठलालाच भजा' असा उपदेश तुकाराम महाराज करतात.

तुकाराम महाराजांच्या अभंगातून जे वेदशास्त्रे, पुराणांचे दाखले येतात त्यावरून तुकाराम महाराजांनी या सर्वांचा चांगला अभ्यास केला होता आणि त्यावरून आपली एक पक्की धारणा केली होती, असं स्पष्ट दिसतं. तुकाराम महाराजांच्या विचारविश्वात कर्मकांडाला स्थान नाही. अनेक ईश्वरवादाला स्थान नाही. घटपटादी विधी, दिवे पाजळणे, धूप लावणे, घंटा बडवणे, आरत्या, पूजापाठ, अभिषेक, अनुष्ठान, यज्ञयाग, नवससायास हे सर्व त्यांना निरर्थक वाटतं. म्हणून तुकाराम महाराजांनी वारंवार एक विठ्ठल तेवढा भजा. त्याचं पूजन करा. विठ्ठलाचं पूजन करण्यासाठी कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही. आपलं नैमित्तिक कर्म करत असतांना भक्तीभावाने त्याचं नाव फक्त घ्या, तरी तो तुम्हाला पावतो. त्यासाठी काहीही कर्मकांड करायची गरज नाही, असं सांगितलं आहे. संत सावता महाराजांनीही,
कांदा मुळा भाजी ।
अवघी विठाबाई माझी ॥
लसूण मिरची कोथंबीरी ।
अवघा झाला माझा हरी ॥
या शब्दांत कामातच राम पहायची शिकवण दिली आहे. संपूर्ण वारकरी धर्माची हिच शिकवण आहे.

आपल्याकडे एकीकडे देव निर्गुण, निराकार असल्याचं सांगितलं जातं आणि दूसरीकडे दगडाच्या मूर्त्या पूजल्या जातात. हजारो वर्षांपासून उच्च विचार आणि नीच आचार, हे आपल्या धार्मिक जीवनाचं व्यवच्छेदक लक्षण बनलं आहे. तुकाराम महाराज कर्मकांडात फसलेल्या अज्ञ जनांना भक्तीचा सोपा मार्ग दाखवतात. एकेश्वराचा पुरस्कार करतात.
(संपादित)

उल्हास पाटील
सौजन्य- गाथा परिवार (gathaparivar.org)
(Referenced page was accessed on 04 Nov 2021)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.